आपल्या बाजूला अनेक घडामोडी घडत असतात. याच गोष्टी चित्रपटाच्या रुपात मांडल्या जातात. त्यामुळेच की काय सिनेमा समाजाचा आरसा असतात. समाजात घडणाऱ्या चांगल्या वाईट गोष्टींपासूनच या सिनेमांच्या कथा प्रेरित असतात. अशाच एका सत्य घटनेवर आधारित एक संवेदनशील कथा दिग्दर्शिका मेघना गुलजार रसिकांच्या भेटीला घेऊन आल्या आहेत. तलवार, राजी या सिनेमांनंतर मेघना गुलजार 2005 साली घडलेली एक सत्य घटना रुपेरी पडद्यावर घेऊन आल्यात ज्या घटनेनं भारतात एक नव्या मोहिमेला जन्म दिला. ही घटना म्हणजे अॅसिड हल्ला पीडित लक्ष्मीची कहाणी. मेघना गुलजार यांच्या छपाक या सिनेमातून रुपेरी पडद्यावर याच लक्ष्मीला अभिनेत्री दीपिका पादुकोण हिनं जिवंत केलं आहे.
'छपाक'ची कथा सुरु होते अॅसिड हल्ला पीडित मालती (दीपिका पादुकोण) हिच्यापासून जी आपल्या घराची जबाबदारी सांभाळण्यासाठी नोकरीच्या शोधात आहे. अॅसिड हल्ल्यामुळे तिचा बदललेला चेहरा पाहून कुणीही तिला नोकरी देण्यासाठी तयार होत नाही. चेहऱ्यावरील अनेक सर्जरी झालेल्या मालतीची त्यावेळी एक पत्रकार मुलाखत घेते आणि त्याच अॅसिड हल्ला पीडितांसाठी एक सामाजिक संस्थेचा सदस्य असलेल्या अमोल (विक्रांत मैसी) याच्याशी भेट होते. या भेटीनंतर मालतीसुद्धा या संस्थेशी जोडली जाते. या संस्थेसाठी काम करत असताना मालतीला तिच्यासारख्या अॅसिड हल्ला पीडित अनेक तरुणी भेटतात. त्यांच्या जीवनातील वेदना, त्यांनी सोसलेला त्रास मालतीच्या समोर येतो. या तरुणींचा संघर्ष पाहून मालतीला तिच्या आयुष्यात घडलेली ती घटना आठवते आणि सिनेमाची कथा फ्लॅशबॅकमध्ये जाते.
मालती एक हसतमुख तरुणी जी भावी आयुष्याची सुंदर स्वप्न पाहत असते. गायिका बनण्याचं तिचं स्वप्न असतं. मालती एका मुलींच्या शाळेत शिकत असते. तिच्या शाळेच्या शेजारी मुलांचीही शाळा आहे. या शाळेत शिकणारा राजेश (अंकित बिष्ट) तिला आवडत असतो. मात्र दोघांच्या या नात्याला नजर लागते. बशीर खान नावाचा एका टेलर तरुणाचा जीव मालतीवर जडतो. तो तिला फोनवर रोमँटिक मेसेज पाठवू लागतो. मात्र या सगळ्याकडे मालती दुर्लक्ष करते. एके दिवशी मालती आणि राजेश फिरत असल्याचे बशीर पाहतो. हे पाहून बशीरच्या मनात द्वेष निर्माण होतो. एके दिवशी आपल्या कुटुंबीयांपैकी एका सदस्याकडे अॅसिडची बाटली सोपवतो. ती सदस्य हेच अॅसिड मालतीच्या चेहऱ्यावर फेकते. यानंतर मालतीचं जीवनच पालटतं.
अॅसिड हल्ल्यानंतर सर्जरीमुळे झालेला चेहरा पाहून मालती भेदरते. जीवनच उद्धवस्त झाल्याची भावना निर्माण झाल्याने ती नटून थटून सजण्याच्या सगळ्या वस्तू गुंडाळून ठेवून देते. त्याच दरम्यान तिची वकील अर्चना (मधुरजीत सरघी) मालतीला उभारी देण्याचा प्रयत्न करते. अॅसिड हल्ला करणाऱ्यांना आत्मविश्वास तोडायचा होता ही बाब अर्चना मालतीला पटवून देते. तिची ही गोष्ट मालतीलासुद्धा पटते आणि हल्लेखोरांचे मनसुबे उधळून लावण्याचा निर्धार करते. अर्चनाकडून मिळालेल्या प्रेरणेतून नवी लढाई आणि संघर्ष करण्याचा निर्णय घेते. अॅसिडवर बंदी आणण्यासाठी ती न्यायालयात याचिका दाखल करते आणि याच संघर्षामधून ती स्वतःची नवी ओळख निर्माण करते. तिचा हा संघर्ष कसा आहे? तिला कोणकोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो? तिच्या या संघर्षात कुणाकुणाची तिला साथ लाभते या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवायची असतील तर 'छपाक' सिनेमा पाहायला लागेल.
'छपाक' चित्रपटामध्ये मालतीची भूमिका दमदारपणे साकारत अभिनेत्री दीपिका पादुकोण हिनं संवेदनशीलपणा दाखवून दिला आहे. छपाकचा आत्मा दीपिका आहे असं म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. अॅसिड हल्ल्यानंतरचा संघर्ष, वेदना, विविध भावना दीपिकाने आपल्या सहजसुंदर अभिनयाने रुपेरी पडद्यावर दमदारपणे उतरवल्या आहेत. जगण्याची हिंमत आणि डोळ्यांमधील चमक कुणाच्याही मनात नवी उमेद आणि प्रेरणा निर्माण करते. अमोलची भूमिका साकारणाऱ्या विक्रांत मैसीने आपल्या भूमिकेला पुरेपूर न्याय दिलाय. गंभीर, जिद्दी सामाजिक संस्थेचा मालक त्यानं मोठ्या खुबीने साकारला आहे. त्याच्या भूमिकेची लांबी आणखी मोठी असती तर असं राहून राहून वाटतं. दीपिका आणि विक्रांतची केमिस्ट्री जबरदस्त असल्याचे दिसून येते. वकीलाच्या भूमिकेत मधुरजीत सरगीने दमदार भूमिका साकारलीय. इतर कलाकारांनीही त्यांच्या वाट्याला आलेल्या भूमिकांना न्याय दिला आहे.
तलवार आणि राजी या सिनेमानंतर दिग्दर्शिका मेघना गुलजार यांनी संवदेनशील विषय हाताळण्यात आपला हातखंडा असल्याचं छपाकमधून सिद्ध केले आहे. अॅसिड हल्ला पीडितेच्या वेदना असो किंवा जगण्याची नवी उमेद या दोन्ही गोष्टींना मेघना गुलजार यांनी आपल्या दिग्दर्शनाच्या कौशल्यामधून दाखवून दिल्या आहेत. सिनेमाची सिनेमॅटोग्राफी आणि एडिटिंग या दोन्ही गोष्टी जबरदस्त आहेत.
सिनेमातील दीपिकाचा प्रोस्थेटिक मेकअपसुद्धा तितकाच खास म्हणावा लागेल. कारण या मेकअपने दीपिकाने साकारलेल्या मालतीच्या भूमिकेला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे. शंकर-एहसान-लॉय यांचं संगीत असलेले सिनेमाचं शीर्षक गीत छपाक काळजाचा ठाव घेणारं ठरतं. सिनेमाचं संगीत प्रेरणादायी वाटतं.
सिनेमा पाहता पाहता कथा तुमच्या काळजाला भिडेल आणि डोळ्यातून टचकन पाणीही येईल. अॅसिड हल्ल्यासंदर्भात आजवर माहिती नसलेल्या गोष्टीही हा सिनेमा पाहताना उलगडत जातील. मसाला मनोरंजन तुम्ही शोधत असाल तर हा सिनेमा त्या पठडीतला नाही. अॅसिड हल्ला पीडितांच्या वेदना जाणून घेण्यासाठी 'छपाक' हा सिनेमा नक्की पाहा. कारण हा सिनेमा फक्त एक कथा नाही. यातून काही गंभीर प्रश्नही उपस्थित करण्यात आले आहेत.