Join us

टेक ऑफ न घेता हवेत अधांतरी तरंगणारं विमान, कसा आहे करीना-तब्बू-क्रितीचा CREW? 

By देवेंद्र जाधव | Published: March 29, 2024 10:58 AM

करीना कपूर खान - तब्बू - क्रिती सेननचा बहुचर्चित Crew सिनेमा रिलीज झालाय. सिनेमा पाहायचा विचार करताय तर त्याआधी हा Review वाचा

Release Date: March 29, 2024Language: हिंदी
Cast: करीना कपूर खान, तब्बू, क्रिती सेनन, कपिल शर्मा, दिलजीत दोसांज, तृप्ती खामकर आणि इतर
Producer: एकता कपूरDirector: राजेश कृष्णन
Duration: २ तास ३ मिनिटंGenre:
लोकमत रेटिंग्स

वाचक मित्र, मैत्रिणींनो! एकीकडे मल्याळम इंडस्ट्री किंवा साऊथ सिनेमा कथानकाच्या बाबतीत खूप पुढे गेलाय. जिथे सिनेमा संपल्यावर कलाकार वैगरे नंतर आधी कथा डोक्यात घोळते. तर दुसरीकडे बॉलिवूड मात्र गंज लागलेल्या वस्तूंना वरवर तेलमालीश करून पॉलिश करण्याचा प्रयत्न करत आहे. वरवर कितीही चांगली वाटली तरी वस्तू आतून पोकळ असल्याने कालांतराने त्यातली चकाकी निघून जाते. असो! Crew सिनेमा पाहून हेच जाणवतं. याआधी घासून गुळगुळीत झालेली कथा Crew मध्ये असल्याने काही मजा येत नाही. आणि निराशा पदरात पडते. 

कथानक:Crew च्या कथानकाबद्दल सांगायचं तर, ज्यांनी ट्रेलर पाहिलाय त्याच्या लक्षात आलं असेल. तीन एअर होस्टेस. प्रत्येकीच्या काही आर्थिक समस्या आहेत. वरवर कितीही आनंदी असल्या तरीही आर्थिक विवंचना प्रत्येकीला भेडसावत आहे. अचानक प्रवास करताना त्यांच्या कंपनीतल्या एका सहकाऱ्याचा मृत्यू होतो. त्याचा मृतदेह उचलताना या तिघींना दिसतं की, त्या सहकाऱ्याने शर्टाच्या आत सोन्याची बिस्कीटं लपवली आहेत. पुढे घटना अशा घडतात की तिघीही जणी एका मार्गाने झटपट श्रीमंत होतात. पण पैशांच्या राशीत लोळणाऱ्या या तीनही एअर होस्टेस पोलिसांच्या तपासात सापडतात. मग पुढे काय घडतं? तिघींना पोलीस अटक करणार का? पोलिसांना तपासात काय सापडतं? याची गमतीशीर कहाणी म्हणजे Crew 

दिग्दर्शनCrew चं दिग्दर्शन केलंय राजेश कृष्णन. दिग्दर्शन जरी चांगलं असलं तरीही सिनेमा अजून चांगला खेळवता आला असता. मुळात खूप दिवसांनी बॉलीवूडमध्ये तीन महिला केंद्रस्थानी असून कॉमेडी करणार होत्या. परंतु त्याचाही पुरेपूर वापर दिग्दर्शकाला करता आला नाही. याशिवाय कपिल शर्मा, दिलजित दोसांज हे दोनही कलाकार विशेष भूमिकेत असले तरीही त्यांच्या कॉमिक टायमिंगचा वापर केला गेला नाही. सिनेमातले विनोद गुदगुल्या जरूर करतात, पण खळखळून हसवत नाहीत. त्यातल्या त्यात 'चोली के पीछे क्या है' या गाण्याचं नवीन व्हर्जन ऐकायला मजा येते. पण राहून राहून तेच की, कथानक जरी रहस्य आणि गुंतागुंतीचं वाटतं असलं तरीही पुढे काय होणार याचे आपण बांधलेले अंदाज खरे ठरतात. त्यामुळे प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात कथा आणि दिग्दर्शन दोन्हीही कमी पडलंय. 

अभिनय: Crew मधला अभिनय जबरदस्त आहे. मुळात तब्बू, कृती आणि करीना या तिघींनी आपापल्या भूमिका प्रामाणिकपणे निभावल्या आहेत. तिघीही सुंदर दिसल्या आहेत. त्यांच्यातली केमिस्ट्री चांगली जमली आहे. खासकरून करीना मध्येच अभिनयात जो नखरेलपणा आणते त्याला तोड नाही. तब्बुचा बिनधास्त, रावडीपणा सुद्धा मस्तच झालाय. या दोन कसलेल्या अभिनेत्रींसोबत कृती सुद्धा सुंदर अभिनय करते. कपिल शर्मा आणि दिलजीत जेव्हा जेव्हा सिनेमात दिसतात तेव्हा रंगत आणतात. याशिवाय मराठमोळी अभिनेत्री तृप्ती खामकर सुद्धा प्रभावी अभिनय करुन चांगलीच भाव खाऊन गेलीय

चांगली बाजू: अभिनय, 'चोली के पीछे क्या है' गाण्याचा नव्या पद्धतीने वापर, करीना - तब्बू - कृतीचा सिनेमातला वावरवाईट बाजू: कथानकात असलेला रहस्याचा अभाव, साधे विनोद

तर सरतेशेवटी एवढंच सांगेल तुम्ही जर तब्बू - कृती - करीनाचे चाहते असाल तरच तुम्ही Crew च्या वाट्याला जा. बाकी सिनेमात नावीन्य असं काही नाही. त्यामुळे जास्त अपेक्षा ठेवून गेल्यास अपेक्षाभंग होईल.

टॅग्स :करिना कपूरतब्बूक्रिती सनॉनकपिल शर्मा दिलजीत दोसांझ