आपण नेहमी असे म्हणत असतो की प्रत्येक माणसाला एक सकारात्मक ऊर्जा आणि दृष्टी देण्याची गरज असते. दिव्यांग व्यक्तींच्या आयुष्यात दृष्टीचा जरी अभाव असला तरी सकारात्मकता आणि जगण्याची उमेद त्याला भरपूर बळ नेहमीच मिळवून देत असते. दिव्यांग व्यक्तीला आधाराची गरज नसते. गरज असते ती एका मैत्रीची ,मायेची आणि आपलेपणाणी. मनिष काटकर या उमद्या लेखक,दिग्दर्शकाने याच विषयावर केलेली क्युब ही शाॅर्टफिल्म याच आपलेपणाची, मायेची जाणीव आपल्याला करून देते.
ही कहाणी आहे रिया आणि रोहनच्या अनोख्या मैत्रीची . रियाच्या वडिलांची त्याच्या नोकरीत सतत बदली होत असते. नुकतीच त्यांची बदली एका गावावरून नवीन गावात झालेली असते. रियाची आई तिच्या शाळेच्या अॅडमिशनसाठी प्रयत्न करत असते. नवीन ठिकाणच्या शाळेत प्रवेश घेण्यासाठी सकाळपासूनच रियाच्या आईची लगबग सुरू असते. मात्र रिया मोबाईलवरील गेम खेळण्यात मश्गुल असते. रियाची आई तिला नवीन शाळेत प्रवेश घेण्यासाठी तिला त्या शाळेत घेऊन जाते. रियाची आई प्रवेशासाठी शाळेतील मुख्याध्यपकांच्या केबिनमध्ये जाते. रियाला केबिनबाहेरच तिची वाट पाहण्यासाठी सांगितलं जातं. रिया एका ठिकाणी बसून पुन्हा एकदा आपल्या मोबाईलमध्ये मश्गुल होते. मोबाईलला आवश्यक ती रेंज न मिळाल्याने ती बॅगेतून रूबिक्स क्यूबचा खेळ काढून खेळायला लागते. हे खेळत असताना रिया जिथे बसलेली असते त्याच्या बाजूकडील खांबाकडून मी हे करू का अशी तिला विचारणा होते. रियाला खांबामागून कोण बोलतंय याचा अंदाज येत नाही म्हणून ती त्या आवाजाकडे दुर्लक्ष करते. मात्र सततचे प्रश्न यायला लागल्यानंतर मात्र तिचा पारा चढतो. आणि ती त्या आवाजाच्या दिशेने जाब विचारायला जाते. मात्र जे दृष्य ती पाहते त्यामुळे तिला धक्काच बसतो. कारण तिथे बसलेला रोहन दिव्यांग असतो. शाळेच्या गणवेशात बसलेल्या रोहनसोबत कोणीच मित्र नसतं. त्याच्यासोबत कोणी खेळायला नसतं. तेव्हा रिया आपली चूक सुधारते आणि आपल्या हातातील रूबिक्स क्यूबचं पझल रोहनच्या हाती देते. रोहन काही सेंकदात ते पझल सोडवतो. रिया आणि रोहनमध्ये सुरू होते एक अनोखी मैत्री ही या शाॅर्टफिल्मची थोडक्यात कहाणी ..
लेखक ,दिग्दर्शक मनिष काटकरने एका नाजूक ,हळुवार विषयाला अतिशय संवेदनशील पध्दतीने हाताळलं आहे. पात्रांची अचूक निवड ,कलाकारांचे उत्तम सादरीकरण आणि मनिषने केलेलं उत्तम दिग्दर्शन ही या शाॅर्टफिल्मची खासियत आहे. तेजस नरोदे,दिशा रोकडे, रामेश्वरी रोकडे ,निकीता पांडे या चारही कलाकारांनी अतिशय उत्तम अभिनय क्यूब या शाॅर्टफिल्ममध्ये केला आहे. क्यूब ही शाॅर्टफिल्म शुध्द देसी मराठीच्या शाॅर्ट फिल्म स्पर्धेतील पहिल्या तीस शाॅर्ट फिल्ममधील एक फिल्म आहे. शुध्द देसी मराठीच्या युट्यूब चॅनेलवर याचं प्रक्षेपण झालं असून नेटकऱ्यांनी या उत्तम शाॅर्ट फिल्मला तुफान प्रतिसाद दिला आहे.