जान्हवी सामंत बंगाली साहित्यकार शरदचंद्र चट्टोपाध्याय यांच्या ‘देवदास’ ह्या कादंबरीवर चित्रपटाच्या माध्यमातून आत्तापर्यंत बरेच प्रयोग झालेले आहेत. प्रथमेश बारूआ, बिमल रॉय, संजय लीला भन्साळी ते अनुराग कश्यप यांच्यापर्यंत सगळयांनी आपापल्या दृष्टीकोनातून देवदासची गोष्ट सांगितली आहे. हया यादीत आता सुधीर मिश्रा यांचे नाव आता घ्यावे लागणार. दासदेव हा चित्रपट सुधीर मिश्रांच्या नजरेतून सांगितलेली देवदासची गोष्ट आहे, असे म्हणायला हरकत नाही. ‘दासदेव’ या चित्रपटाचे नाव जसे उलट आहे तसेच मिश्रा यांचे कथानक देखील काहीसे वेगळे आहे. देव प्रताप चौहान (अभिनेता राहुल भट्ट) हा राजकारणी विश्वंभर प्रताप चौहान (अनुराग कश्यप) यांचा एकुलता एक मुलगा असतो. देव लहान असतानाच विश्वंभरचा एका संशयास्पद अपघातात मृत्यू होतो. त्याचा काका अवधेश चौहान (सौरभ शुक्ला) त्याला आपल्या हाताखाली वाढवतो. अतिशय लाडात वाढलेला देव काही दिवसांतच ड्रग्ज आणि दारू या व्यसनांच्या आहारी जातो. नशेत असताना तो लोकांची मारहाण, शिवीगाळ करत असतो. व्यवसायात देखील देव कर्जात बुडालेला असतो. त्याची लहानपणीची प्रेयसी पारो (अभिनेत्री रिचा चड्ढा) हिला देखील देवचे असे वागणे बिल्कुल आवडत नसते. एकदा अशाच भांडणानंतर पारो देवला सोडून निघून जाते. देवचे वागणे सगळयांनाच खटकत असते. देव हे काका आणि त्याचे सहकारी सहाय (दिलीप ताहिल) यांना समजावण्याचा खुप प्रयत्न करत असतात. आपले आयुष्य आपल्या हातून निघून जात असल्याचे त्याला जाणवते. लवकर सुधारलो नाही तर कर्जदार आपला जीव घेतील आणि उरलेली वडिलोपार्जित संपत्ती ही हातातून निघून जाईल. सहायचा सेके्रटरी आणि चांदणी (अदिती राव हैदरी) यांच्या मदतीने देव सुधारणेच्या मार्गाला लागतो. ह्यादरम्यान चांदणी त्याच्या प्रेमात पडते. काहीच दिवसांत देव आपल्या नशेवर नियंत्रण करून आपल्या व्यवसायाची आणि काकांच्या राजकीय कारभाराची घोडदौड स्वत:च्या हातात घेतो. आपल्या भाषणांमधून आपल्या काकांच्या सगळया पाठिंबा देणाऱ्यांची मने देव जिंकतो. परंतु पारोचे मन जिंकणे काही सोपे नसते. काही महिन्यांमध्येच देव पारोसमोर तो किती सुधारला आहे हे सिद्ध करतो. पण, सुधीर मिश्रांच्या देवचा प्रवास खुपच लांब आणि खडतर असतो. देवच्या गोष्टीत अनेक घटना-घडामोडी आहेत. राजकारणी त्यांच्या फायद्याकरिता गावातल्या गरिब शेतकऱ्यांच्या जमिनीचे व्यवहार, कॉर्पाेरेटसचे मतदान आणि देवच्या राजकारणी करिअरवर लागलेले पैसे यावर तसेच वडिल आणि काका यातील कौटुंबिक राजकारण आणि शेजारी पारोचे कुटुंब या सर्वांवर आधारित देवचे जीवन आहे. खरंतर मुळातच देवदास हा खुप निराश नायक आहे. त्यात ही गोष्ट पण पुर्णपणे निराशाजनक आहे. त्यामुळे गोष्टीचा गाभा मुळात रडवा आहे. त्यामध्ये नको तिथे पात्र आणि नको तितक्या गुंतागुंतीची वळणे टाकल्यामुळे दासदेव हा फारच कंटाळवाणा चित्रपट वाटतो. दिग्दर्शक सुधीर मिश्रांचे यापूर्वी आवडलेल्या चित्रपटांची सर या चित्रपटाला अजिबात नाही. मुळात एवढा हळवा आणि सुरूवातीपासून आपल्याशी असलेल्या देवदासवर इतके लोक आपले पैसे, वेळ, प्रतिक्षा आणि प्रयत्न का वाया घालवतात हेच कळत नाही. देव तर सोडा पण पारो आणि चंद्रमुखी ही एकदम रडव्या आहेत. चित्रपटाच्या पहिल्या भागातच चित्रपट रटाळ वाटू लागतो. दुसऱ्या भागापर्यंत कधी एकदा संपतोय असा वाटायला लागतं. थोडक्यात काय तर, हा चित्रपट बघायचा त्राास अजिबात घेऊ नका.