Join us

De De Pyaar De Movie Review : परफेक्ट फॅमिली एण्टरटेन्मेंट

By गीतांजली | Published: May 17, 2019 4:51 PM

अजय देवगणचा 'दे दे प्यार दे' या सिनेमाच्या रिलीजची वाट त्याचे फॅन्स मोठ्या उत्सुकतेने करत होते त्याला कारण ही तसेच होते. तब्बल ८ वर्षांनंतर अजय रोमॅन्टिक कॉमेडीत हात आजमावतोय.

Release Date: May 16, 2019Language: हिंदी
Cast: अजय देवगण, तब्बू, रकुल प्रीत सिंग
Producer: लव रंजन, भूषण कुमार, क्रिश्न कुमार आणि अंकुर गर्गDirector: अकिव अली
Duration: 2 तास 40 मिनिटंGenre:
लोकमत रेटिंग्स

गीतांजली आंब्रे 

अजय देवगणचा 'दे दे प्यार दे' या सिनेमाच्या रिलीजची वाट त्याचे फॅन्स मोठ्या उत्सुकतेने करत होते त्याला कारण ही तसेच होते. तब्बल ८ वर्षांनंतर अजय रोमॅन्टिक कॉमेडीत हात आजमावतोय. सिनेमाचा ट्रेलर आऊट झाल्यानंतर ही उत्सुकता शिगेला पोहोचली होती. अखेर ही प्रतीक्षा संपली आणि अजय देवगण, तब्बू आणि रकुल प्रीत सिंग यांची मुख्य भूमिका असलेला 'दे दे प्यार दे' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आहे. 

 

ही गोष्ट लंडनमध्ये राहणाऱ्या आशिषची (अजय देवगण) आहे. एका हाऊस पार्टीत आशिषची ओळख आयशा खन्नाशी (रकुल प्रीत सिंग) होते. दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतात. आशिष हा 50 वर्षांचा बिझनेसमन असतो जो पत्नी आणि मुलांपासून वेगळा होऊन लंडनमध्ये राहतो. तर आयशा 26 वर्षांची तरुणी असते. आशिष आणि आयशा लग्न करण्याचे ठरवतात.आशिष आयशाला लग्नाच्या आधी भारतात त्याची एक्स वाईफ मंजू(तब्बू) आणि दोन मुलांना भेटवण्यासाठी आणतो. आशिष आयशाला घेऊन भारतात येतो त्यावेळी इथं त्याच्या मुलीच्या लग्नाची बोलणी सुरु असते. हे पाहिल्यावर त्याच्यातील वडील जागा होतो. यानंतर आशिष, मंजु आणि आयशामध्ये काय काय धमाल उडते हे तुम्हाला सिनेमागृहात जाऊनच बघावे लागेल. आशिषमधला बाप जागा झाल्यामुळे तो त्याच्या आणि मंजूच्या नात्याला आणखी एक संधी देतो का ?, की आयशाकडे परत जातो ? आयशा या सगळ्या गोंधळात काय भूमिका घेते ? या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला सिनेमा बघितल्यानंतरच मिळतील. 

दोन प्रेम करणाऱ्या व्यक्तिंंमधील जनरेशन गॅप या गोष्टीकडे पाहण्याचा एक नवा दृष्टिकोण दिग्दर्शक अकिव अलीने आपल्याला दिला आहे. पहिल्या भागापेक्षा मध्यांतरनंतर सिनेमा चांगली पकड घेतो. आपल्या मुलीच्या वयाच्या मुलीच्या प्रेमात पडणाऱ्या आशिषची भूमिका अजय देवगणने समर्थपणे साकारली आहे. अजयने अशी भूमिका स्वीकारत एका प्रकारची रिस्क घेतली असे म्हणायला हरकत नाही. कारण कदाचित हा पहिला सिनेमा आहे ज्यात हिरोचं खरं वय पडद्यावर दाखवण्यात आले आहे. तब्बूने साकारलेल्या मंजूच्या भूमिकेला तोड नाही. मुलं आणि पतीच्या भावना समजून घेणाऱ्या पत्नीच्या भूमिकेवर तिने आपली छाप सोडली आहे. रकुल प्रीत सिंग बिनधास्त आणि चुलबुली आयशाची भूमिका खूपच सुंदर आणि सहजरित्या साकारली आहे. दे दे प्यार दे मधील तिचा अभिनय पाहुन तिला बॉलिवूडमधून नव्या ऑफर मिळाल्या तर यात नवल वाटायला नको. आलोक नाथ, जिमी शेरगिल यांनी आपल्या वाटेला आलेल्या भूमिका चोखपणे साकारल्या आहेत. अर्जित सिंगच्या दिल रोई जाये या गाण्याने सिनेमा रिलीज होण्याआधीच आधीच टॉप टेन साँगमध्ये आपली जागा निर्माण केली होती. अमाल मलिक आणि रोचक कोहली यांनी दिलेला संगीत चांगलं आहे.सिनेमाची सुधीर चौधरी यांनी केलेली सिनेमेटोग्राफी ही जमेची बाजू आहे. लंडनमधील गाण्यांमधले काही सीन्स तर खुपच सुंदररित्या शूट केले आहेत. निर्माता आणि एडिटर अकिव अली यांचा हा दिग्दर्शक म्हणून पहिला सिनेमा आहे. पदार्पणातच त्यांनी खूप चांगला प्रयत्न केला आहे मात्र सिनेमाला लव रंजन टच असल्याचे जाणवते. हसत हसत सिनेमा तुमच्या डोळ्यात पाणीदेखील आणतो. 'दे दे प्यार दे'मध्ये दोन बायकांमध्ये फसलेल्या माणसांची धमाल उडवून देणारी तारांबळ तुम्हाला पाहायची असेल तर हा सिनेमा नक्की बघा.   

टॅग्स :दे दे प्यार देअजय देवगणतब्बूरकुल प्रीत सिंग