मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्समध्ये (MCU) 'डेडपूल' या व्यक्तिरेखेने स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं. MCU मध्ये असलेल्या अवेंजर्सच्या यादीत डेडपूलची कधी गणती झाली नाही. पण तरीही डेडपूलला स्वतःची एक वेगळी फॅन फॉलोईंग मिळाली. गेल्या काही महिन्यांपासून 'डेडपूल अँड वॉलवरीन' सिनेमाची चांगलीच चर्चा होती. अधिकृतरित्या डेडपूलचा हा तिसरा भाग. Avengers Endgame नंतर MCU ला जी उतरती कळा लागली आहे ती पुसून काढत MARVEL ला एक बूस्टर डोस देण्याचं काम 'डेडपूल अँड वॉलवरीन' हा सिनेमा करेल हे नक्की!
कथानक!सुरुवातीला सांगितलं पाहिजे, तुम्हाला डेडपुल - वॉलवरीन (जो 'लोगन' या नावानेही ओळखला जातो) या व्यक्तिरेखांविषयी माहीत आहे का? याशिवाय MCU आणि X MEN सीरिजच्या फिल्म्स पाहिल्या आहेत का? जर नसेल तर 'डेडपूल अँड वॉलवरीन' पाहण्याआधी थोडी माहिती घेऊन जा. नाहीतर पडद्यावर जो अचाट प्रकार सुरू आहे तो तुम्हाला कंटाळवाणा वाटू शकेल. तर विषय असा आहे की, लोगन जग सोडून गेलाय. दुसरीकडे डेडपूल अर्थात वेड विल्सन हा माणूस अॅव्हेंजर्सच्या सुपरहिरोंच्या यादीत मानाचं स्थान मिळावं म्हणून धडपड करतोय. अशातच वेडला काही माणसांकडून कळतं की त्याची दुनिया धोक्यात आहे. यामुळे त्याच्या आयुष्यातील जवळच्या व्यक्तींचा जीव जाण्याची शक्यता आहे. मग डेडपूल लोगनची मदत घेतो. ती कशी? आधीच मेलेला लोगन त्याला कुठे आणि कसा भेटतो? लोगन आणि डेडपूल यांची जोडी जमते की दोघे एकमेकांच्या जीवावर उठतात याची कहाणी म्हणजे 'डेडपूल अँड वॉलवरीन' हा सिनेमा. तुम्ही जर 'डेडपूल' आणि 'लोगन' या दोन्ही कॅरॅक्टरचे चाहते असाल तर 'डेडपूल अँड वॉलवरीन' सिनेमा तुमचं पैसा वसूल मनोरंजन करेल यात शंका नाही.
दिग्दर्शन :शॉन लेव्ही यांनी 'डेडपूल अँड वॉलवरीन' सिनेमाचं दिग्दर्शन केलंय. विशेष गोष्ट म्हणजे डेडपूलची भूमिका साकारणाऱ्या रायन रेनॉल्ड्स या अभिनेत्याने सिनेमाची कथा लिहिली आहे. आधीचे दोन भाग सुपरहिट कसे झाले, याची पक्की कल्पना रायनला आहे. त्यामुळे प्रेक्षकांना सिनेमातले प्रत्येक सीन्स आवडतील याची खबरदारी त्याने लेखनात घेतली आहे. ॲक्शनला असलेला कॉमेडीचा तडका, ही डेडपूल सिनेमाची खासियत आहे. दिग्दर्शक आणि लेखकांनी याची पुरेपूर काळजी घेतली आहे. ॲक्शन सीन्सही भन्नाट आहेत. विशेषतः सिनेमाची सुरुवातीची २० मिनिटं आपल्याला थक्क करून सोडतात. मल्टीवर्सची दुनिया असल्याने काही सरप्राइज सुद्धा तुम्हाला मिळतील. राहून राहून एक वाटतं की, हा सिनेमा आणखी वेगळ्या उंचीवर जाऊ शकला असता. डेडपूल आणि वॉलवरीनची जुगलबंदी आणखी रंगली असती तर मजा आली असती. असो, हेही नसे थोडके!
अभिनय:पुन्हा एकदा अफलातून कॉमिक टायमिंग साधत रायन रेनॉल्ड्स या अभिनेत्याने डेडपूलच्या भूमिकेत कमाल केली आहे. हिंदीमध्ये संकेत म्हात्रेने डेडपूलचं डबिंग केलंय. डेडपूलच्या दुसऱ्या भागाचं हिंदी डबिंग सुपरस्टार रणवीर सिंगने केलं होतं. पण या डबिंगवर खूप टीका झाली. त्यामुळे तिसऱ्या भागात पुन्हा एकदा संकेत म्हात्रेने हिंदीमध्ये डेडपूलला आवाज दिलाय. संकेतने जबरदस्त डबिंग करत सर्वांना पुन्हा एकदा डेडपूलचं फॅन व्हायला भाग पाडलंय. डेडपूलच्या आचरटपणाला वॉलवरीन झालेल्या ह्यू जॅकमॅनने दमदार साथ दिलीय. रायन आणि ह्यू यांची ही 'दोस्ती तुटायची नाय वाली' ऑनस्क्रीन केमिस्ट्री मोठ्या पडद्यावर पाहणं ही सर्व मार्व्हल्स चाहत्यांसाठी एक पर्वणी आहे. आधी सांगितल्याप्रमाणे सिनेमात अनेक कलाकारांची एन्ट्री होऊन आपल्याला सुखद धक्का मिळतो.
'अॅव्हेंजर्स एन्डगेम' नंतर MCU चे सिनेमे इतके चालले नाहीत. स्पायडरमॅन वगळता इतर सिनेमांना म्हणावं तसं यश मिळालं नाही. 'डेडपूल अँड वॉलवरीन'च्या माध्यमातून बॅकफूटवर गेलेलं MCU पुन्हा एकदा प्रेक्षकांचा विश्वास संपादन करेल, अशी शक्यता नाकारता येत नाही. अशाप्रकारे MCU आणि X MEN फॅन्ससाठी 'डेडपूल अँड वॉलवरीन' थिएटरमध्ये विकेंडसाठी बेस्ट ऑप्शन असेल. (प्रथेप्रमाणे सिनेमा संपल्यावर लगेच उठू नका. शेवटी एक धम्माल एंड क्रेडिट सीन आहे. तो बघूनच थिएटरमधून बाहेर पडा.)