Join us

 Dhadak  movie review: कथा तिचं पण तरिही वेगळी!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2018 4:18 PM

धडक’हा ‘सैराट’ची हुबेहुब नक्कल आहे का? ‘धडक’मध्ये काही वेगळे आहे का? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांच्या मनात उद्भवणे साहजिक आहे. पण खरे सांगायचे तर या प्रश्नांची हो किंवा नाही, असे थेट उत्तर देता येणार नाही.

Release Date: July 20, 2018Language: हिंदी
Cast: जान्हवी कपूर, ईशान खट्टर, आशुतोष राणा
Producer: करण जोहर, हिरू जोहर, अपूर्वा मेहता Director: शशांक खैतान
Duration: २ तास ३० मिनिटेGenre:
लोकमत रेटिंग्स

-जान्हवी सामंत

जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर यांचा ‘धडक’ हा बहुप्रतिक्षीत सिनेमा अखेर आज प्रदर्शित झाला. करण जोहर निर्मित आणि शशांक खैतान दिग्दर्शित हा चित्रपट ‘सैराट’ या सुपरडुपर हिट मराठी चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. त्यामुळे ‘धडक’हा ‘सैराट’ची हुबेहुब नक्कल आहे का? ‘धडक’मध्ये काही वेगळे आहे का? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांच्या मनात उद्भवणे साहजिक आहे. पण खरे सांगायचे तर या प्रश्नांची हो किंवा नाही, असे थेट उत्तर देता येणार नाही. तसे पाहता ‘धडक’ व ‘सैराट’ची कथा अगदी सेम टू सेम आहे. पण एकूणच कथेची मांडणी, बदललेली पार्श्वभूमी या सगळ्या गोष्टी ‘धडक’ला ‘सैराट’पेक्षा वेगळा ठरवतात. मुळात ‘धडक’चा ‘कॅनव्हास’ पूर्णपणे वेगळा आहे. कथा तिच असली तरी भव्य दिव्य दृश्ये, राजस्थानी महाल-कोठ्या, मध्यमवर्गीय जीवनशैली, राजस्थानी संस्कृती,भाषा अशा अनेक वेगळ्या गोष्टी यात आहे.पार्थवी सिंग (जान्हवी कपूर) ही रतन सिंग (आशुतोष राणा) या एका राजकीय नेत्याची लाडावलेली लेक असते. लाडात आणि थाटात वाढलेली ही मुलगी मधूकर  (ईशान खट्टर) नावाच्या एका सामान्य मध्यमवर्गीय तरूणाच्या प्रेमात पडते. मधू हा एका लहानशा हॉटेल मालकाचा मुलगा असतो. आपल्यापेक्षा पार्थवी उच्च जातीची आहे, हे माहित असल्याने मधूच्या वडिलांना मधू व पार्थवीची वाढती मैत्री आवडत नसते. इकडे पार्थवीच्या भावालाही या दोघांची मैत्री खटकत असते. पार्थवीचे वडिल पहिल्यांदा राजकीय निवडणुकीच्या आखाड्यात उतरतात आणि नेमक्या याचवेळी मधू अन् पार्थवीचे प्रेम रंगात येते. अखेर घरच्या विरोधामुळे मधू व पार्थवी दोघांनाही घरून पळून जावे लागते. पार्थवीच्या वडिलांच्या गुंडापासून स्वत:ची सुटका करून घेण्याच्या प्रयत्नात दोघेही शहर सोडतात. याकाळात मधूचे कुटुंब आणि त्याच्या मित्राचा छळ होतो. घर सोडून पळालेल्या मधू व पार्थवीलाही बरेच हाल सहन करावे लागतात. 

पुढे ‘सैराट’ची कथा तर तुम्हाला ठाऊक आहेच. ‘धडक’ची कथाही अगदी त्याच वळणाने पुढे सरकते. ‘सैराट’मध्ये आर्ची भाव खावून जाते. तर ‘धडक’मध्ये मधू भाव खावून जातो. त्याचा भाबडेपणा प्रेक्षकांची मने जिंकतो. जान्हवीने रंगवलेली पार्थवी पडद्यावर तितकीशी बोल्ड आणि बिनधास्त वाटत नाही. पण या भूमिकेसाठी तिने घेतलेली मेहनत जाणवते.  ‘सैराट’ची कथा केवळ आर्ची आणि परश्याच्या प्रेमकथेवर प्रकाश पाडते. पण ‘धडक’च्या कथेची व्याप्ती बरीच मोठी आहे. पार्थवीचे आई-वडिल, मधूचे आई-बाबा, त्याचे मित्र अशी सगळी खूप महत्त्वाची पात्रे आपले लक्ष वेधून घेतात. पहिल्या पाचचं मिनिटांत हा चित्रपट तुम्हाला पार्थवी आणि मधूच्या दुनियेत नेतो आणि मग पूर्णवेळ खिळवून ठेवतो. ‘सैराट’मध्ये प्रतिकात्मकरूपात दाखवलेल्या अनेक गोष्टी ‘धडक’मध्ये उघडउघड व्यक्त केलेल्या दिसतात.आर्ची-परश्याची निरागसा, श्रीमंत-गरिब दरी, जातीभेद, आॅनर किलिंग या सगळ्या गोष्टींवर ‘सैराट’ शांतपणे व्यक्त होतो. निश्चितपणे ‘धडक’ला हे साधता आलेले नाही. पण तरीही हा चित्रपट हदयस्पर्शी आणि मनोरंजक वाटतो. सरतेशेवटी हा चित्रपट तेवढाच हृदयस्पर्शी संदेश देऊन जातो. पण कदाचित या विषयावर कितीही चित्रपट आलेत तरी हा संदेश आपल्या अंगी रूजायला आणखी बराच काळ जावा लागेल.

  

टॅग्स :धडक चित्रपट