-श्वेता पांडे
ईशान खट्टर आणि जान्हवी कपूर यांचा ‘धडक’ हा सिनेमा रिलीज व्हायला आता काही तासांचा अवधी उरलाय. करण जोहर आणि शशांक खैतान दिग्दर्शित हा चित्रपट प्रेक्षकांच्या कसोटीवर खरा उतरण्यासाठी तयार आहे.‘धडक’ मुळात ‘सैराट’चं आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. दुस-या शब्दांत सांगायचे तर ‘धडक’चा आत्माच ‘सैराट’ आहे. तरिही प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात हा चित्रपट यशस्वी होतो. यातील व्यक्तिरेखा कधी हसवतात तर कधी भावूक करतात. जान्हवीच्या डेब्यूबद्दल सांगायचे तर, हा तिचा डेब्यू सिनेमा आहे. पण तिचा अभिनय प्रेक्षकांना तिच्या प्रेमात पडायला भाग पाडणारा आहे. ती चित्रपटात कमालीची सुंदर दिसतेय. ईशानचा हा दुसरा चित्रपट आहे. पण त्याच्या चेह-यावरचे भाव खल्लास करणारे आहेत. या दोन्ही मुख्य कलाकारांशिवाय आशुतोष राणाचा परफॉर्मन्सही दमदार आहे. कथा संथपणे पुढे सरकते. गाणी चांगली आहेत. पण अनेकठिकाणी ते कथेच्या प्रवाहात अडथळा निर्माण करतात. खरे तर या चित्रपटातील लव्हस्टोरी तशीच जुनीच आहे. पण या लव्हस्टोरीचे वेगळेपण डोळ्यात भरणारे आहे. संवादही चांगले आहेत. ज्यांनी ‘सैराट’ पाहिलाय, ते या चित्रपटाशी ‘धडक’ची तुलना करणारच. पण ज्यांनी ‘सैराट’ बघितलेला नाही. त्यांना हा चित्रपट चांगलाच भावणारा आहे. ज्यांनी ‘सैराट’ पाहिलेला आहे, त्यांच्यासाठीही ‘धडक’चा क्लायमॅक्स अचंबित करणारा आहे.