सत्तेत खुर्चीला अनन्यसाधारण महत्व आहे. अस्सल ग्रामीण भाषेत म्हणायचं झालं तर खुर्चीचा मोह कुणाच्या बापाला सुटला नाहीये. ही सत्तासंघर्ष आपण अनेक सिनेमांतून यापूर्वी पाहिला आहे. अतिशय भडक स्वरूपात तर कधी कधी युक्तीच्या जोरावर खुर्ची आपल्याकडे खेचून आणणाऱ्या इरसाल राजकारण्यांची गोष्ट आपण पाहिली आहे. धुरळा हा त्यात उठून दिसणारा एकाच कुटुंबातील सत्तासंघर्षाचा सारीपाट आहे. आणि या सारीपाटाचे मोहरे आहेत लेखक क्षितिज पटवर्धन आणि दिग्दर्शक समीर विद्वांस . मुळात २०१३ ला याच लेखक -दिग्दर्शक जोडीचं याच कथानकावरील सगळेच उभे आहेत हे नाटक रंगभूमीवर आलं होतं. पण कथानकातील अपुरेपण आणि नाटकाला मिळालेल्या अपुºया प्रतिसादामुळे हे नाटक रंगभूमीवर उभं राहू शकलं नाही. मात्र गेल्या काही वर्षात क्षितीज-समीर जोडीने दिलेल्या कसदार सिनेमांमुळे या जोडीविषयी आता अपेक्षा उंचावल्या आहेत. सगळेच उभे आहेत ते धुरळा या कथानकांच्या दर्जात कमालीचा फरक आहे. आणि उभं न राहू शकलेल्या नाटकाला धुरळा या सिनेमाच्या रूपाने या लेखक -दिग्दर्शक जोडीने अव्वल दर्जा गाठलाय.
सिनेमाचं कथानक अस्सल ग्रामीण भागातलं . आंबेगावचे गेली कित्येक वर्ष बिनविरोध निवडून येत असलेले सरपंच निवृत्तीनाथ उर्फ अण्णा उभे यांचं निधन होतं. अण्णा उभेंनंतर त्यांचा उत्तराधिकारी म्हणून नवनाथ उभे उर्फ दादा हा त्यांचा मोठा मुलगा (अंकुश चौधरी) हा ओघाने आलंच. दादाच पुढचा सरपंच होणार या थाटात पुढची पावलं टाकत असतो. मात्र माशी इथेच शिंकते . अण्णा उभेंची पत्नी ,तीन मुलं आणि दोन सुना यांच्यात हे सत्तासंघर्ष हळूहळू पेट घेऊ लागतं. हे कमी की काय अण्णा उभेंच्या वर्चस्वामुळे अनेक वर्ष सत्तेपासून दूर असलेली मंडळीही आता उभेंना मागे सारून सत्तेच्या या स्पर्धेत उतरलेली असतात. सरपंचपदासाठी दादा आपले बाहू पसरवत असताना ,दादाचे विरोधक अण्णा उभेंची पत्नी (अलका कुबल) यांना सरपंचपदाचं गाजर दाखवतात. दादाची बायको बुरगुंडा (सई ताम्हणकर), शरीरात बळ असूनही मनाने हळवा असलेला दादाचा भाऊ हणमंता (सिध्दार्थ जाधव) ,हणमंताची बायको आणि सत्तेच्या या संघर्षात आपणही कुठे मागे नाही असं भासवणारी मोनिका ( सोनाली कुलकर्णी) आणि सर्वात लहान भाऊ असला तरी आपली महत्वकांक्षा पूर्ण करण्यासाठी वाट्टेल त्या थराला जाण्यासाठी अग्रेसर असणारा भावज्या ( अमेय वाघ) यांच्याभोवती हे सरपंचपदाचं वादळ सुरू होतं. एकाच घरातली ही मंडळी एका खुर्चीसाठी एकमेकांवर कुरघोडी करण्याची एक ही संधी सोडत नाहीत. अनेक नवनवीन युक्त्या वापरून आपल्याच भावाला,आईला,बायकोला जेरीस आणणारी ही एकाच घरातली मंडळी यशस्वी होतात का ? सत्तेची चावी अखेर कोणाच्या हातात जाते ? यासाठी तुम्हांला धुरळा पाहणे अत्यंत गरजेचे आहे. या सिनेमाची खरी ताकद आहे याची कथा आणि याचे संवाद यासाठी लेखक क्षितीज पटवर्धनला पैकीच्या पैकी मार्क देणे गरजेचं आहे. इतका अप्रतिम प्लॉट मांडण्याचं श्रेय नक्कीच क्षितीजला द्यायलाच हवं. सगळे मातब्बर कलाकार एकाच फ्रेममध्ये, सततचं थरारनाट्य, क्षणाक्षणाला उत्कंठा आता पुढे काय होईल याची तरीसुध्दा कुठेही दिग्दर्शक समीरची सिनेमावरची दिग्दर्शक म्हणून पकड सुटलेली नाही. या दोघांच्या एकत्रित परिणामामुळे धुरळा हा एक उत्तम सिनेमा म्हणून प्रेक्षकांना क्षणाक्षणाला खिळवून ठेवतो. आकाश अग्रवालचा कॅमेरा या सिनेमात अक्षरक्ष बोलतोय इतकं अप्रतिम ह्यात त्याचं काम झालंय.ए.व्ही.प्रफुल्लचंद्र यांचं सिनेमाला साजेसं संगीत हा या सिनेमाचा आणखी एक प्लस पॉईंट आहे. कल्याणी गुगळे यांनी प्रत्येक व्यक्तिरेखेला केलेली वेशभूषा निव्वळ अप्रतिम आहे.
सनेमात एकसोएक कलाकार आहेत. पण प्रत्येकाने कमाल अभिनय केलाय. दादाच्या भूमिकेत अंकुश चौधरी इतका बेमालूम वाटतो की ग्रामीण भागातले राजकारणी असेच का ? हे त्याच्या नुसत्या इशाऱ्यातून भासतं. बुरगुंडा झालेली सई ताम्हणकरने पुन्हा एकदा कमाल केली आहे. प्रचाराच्या दरम्यान तिने केलेल्या भाषणाचा सीन उत्तम जमलाय. हणमंताच्या भूमिकेत सिध्दार्थ जाधवने मजा आणलीय. सोनाली कुलकर्णी प्रत्येक सिनेमाबरोबर एका वेगळ्याच भूमिकेत आपल्याला दिसते आहे. यातली शांत बसून युक्त्या करणाऱ्या मोनिकाचं पात्र तिने उत्तम साकारलंय. शेंडेफळ असला तरी राजकारणातील डावपेच हळूच खेळणारा बिलंदर अमेय वाघचा भावज्या भाव खाऊन गेलाय.मात्र धुरळामधली सरप्राईज करणारी व्यक्तिरेखा आहे अण्णा उभेंच्या बायकोचं अर्थात अलका कुबल यांचं . राजकारणात हम भी किसीसे कम नही म्हणत क्लृपत्या करणाऱ्या आईच्या भूमिकेत अलका कुबल यांनी मजा आणली आहे. एकंदरीतच वर्षाच्या सुरवातीला प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवणारा हा सिनेमा आहे. तेव्हा सिनेमा पाहण्याचा राडा करायला सिनेमागृहांत जायला काही एक हरकत नाहीये.