नितेश तिवारी दिग्दर्शित व आमिर खान याची प्रमुख भूमिका असलेल्या बहुप्रतिक्षित ‘दंगल’ या चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच प्रेक्षकांत उत्सुकता निर्माण करण्यात यश मिळविले आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरपासून ते अगदी चित्रपटातील गाण्यांनीदेखील चाहत्याच्या मनावर एक वेगळी छाप पाडली आहे. अर्थातच आमिरच्या अन्य चित्रपटाप्रमाणे ‘दंगल’ हा पूर्णत: त्याच्या रंगात रंगलेला चित्रपट आहे. कुश्तीपटू, वडील, खेळाडू आणि प्रशिक्षक या भूमिक ा पूर्ण ताकदीने निभविण्याचे कौशल्य ‘दंगल’मध्ये आमिरने साकारले आहे. शिवाय या चित्रपटातून समाजातील चुकीच्या चालीरितीवर कठोर भाष्य करण्यात आले आहे. परंतु हा चित्रपट प्रत्यक्ष पाहताना हे भाष्य कठोर नाही तर विनोदी व तेवढेच प्रेमळ वाटते यात दिग्दर्शकाचे खरे कौशल्य आहे. महावीर सिंग फोटगच्या भूमिकेतील आमिर खान आपल्या तिसºया मुलीच्या जन्मानंतर ‘मारा सपना तो छोरा ही पुरा कर सकेंगा’ असे म्हणतो. तेव्हा ही एकच ओळ भारतातील पुरातन मानसिकता, मुलांबाबत असलेल्या मूर्ख मान्यता, मुलीची असुरक्षितता व त्यांच्या क्षमतांना कमी दाखविणारी ठरते. दंगल हा चित्रपट भारतीय चित्रपटांच्या प्रवासासाठी मैलाचा दगड ठरणार आहे यात वादच नाही. दंगल हा चित्रपट महावीर सिंग फोगट व त्यांच्या कुश्तीपटू मुली गीता व बबीता यांच्या वास्तविक जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात एक प्रेरणादायी व्यक्ती जी आपल्या मुलींना पुरुषांचे वर्चस्व मानल्या जाणाºया खेळात प्राविण्य मिळवून देते व सर्व अडथळ्यांना पार करून त्यांच्यात एक नवी ऊर्जा व प्रेरणा पेरतो.महावीर सिंग फोगट यांनी राष्ट्रीय स्तरावरील अनेक कुश्ती स्पर्धांमध्ये विजय मिळविला आहे. मात्र, तो आॅलिंपिकमध्ये विजय मिळविण्यात अपयशी ठरला. याचे शल्य त्याच्या कायम मनात आहे. महावीरच्या मनात आपले अपूर्ण स्वप्न आपला मुलगा आंतरराष्ट्रीय स्तरावरील कुश्ती स्पर्धांमध्ये सुवर्ण पदक मिळवून पूर्ण करेल असा विश्वास आहे. मात्र अंधविश्वासी समाजात जगणारा महावीर मुलाच्या लालसेपोटी चार मुलींना जन्म घालतो. महावीर हे सत्य मानून चालतो की, त्याचे स्वप्न कधीच प्रत्यक्षात उतरू शकणार नाही आणि ते फक्त मुलगाच पूर्ण करू शकेल. मात्र अचानक एक दिवस त्याच्या मोठ्या दोन मुलीत तो लढाऊ बाणा त्याच्या नजरेस पडतो आणि हा चित्रपट घडतो. कुश्ती हा विषय दंगल चित्रपटात आकर्षक पद्धतीने मांडण्यात आला आहे. त्याला उबदार आख्यायिका, तिरकस विनोद व मायेची सुंदर झालर प्राप्त झाली आहे.
‘दंगल’ ठरेल ‘माईल स्टोन’
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2016 2:05 PM