मोहनलाल यांची मुख्य भूमिका असलेल्या दृश्यम 2 या चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. हा मल्याळम चित्रपट असला तरी अनेक जण सबटायटलच्या मदतीने हा चित्रपट पाहात आहेत.
दृश्यम या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगले कलेक्शन केले होते. त्यानंतर या चित्रपटाचे विविध भाषेत रिमेक बनवण्यात आले होते. हिंदीमध्ये देखील हा चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळाला होता. यात अजय देवगणची मुख्य भूमिका होती. या चित्रपटातील सस्पेन्स लोकांना प्रचंड आवडला होता. त्यामुळे या चित्रपटाचा दुसरा भाग येणार हे कळल्यावर लोकांच्या मनात या चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण झाली होती.
दृश्यम या चित्रपटाची कथा जेथे संपली होती, तिथून दृश्यम 2 या चित्रपटाची कथा सुरू होते. आपल्या कुटुंबाने केलेल्या मर्डरमधून त्यांना वाचवण्यासाठी नायक पोलिसांना चकवा देतो आणि बांधकाम सुरू असलेल्या पोलिस स्टेशनमध्ये मृतदेह लपवतो असे आपल्याला दृश्यम मध्ये पाहायला मिळाले होते. दृश्यम 2 मध्ये सुरुवातीलाच हाच मृतदेह लपवताना एक माणूस नायकाला पाहतो. पण या माणसाने एका व्यक्तीचा मर्डर केला असल्याने त्याला सहा वर्षांची शिक्षा होते. त्यामुळे सहा वर्षं हे प्रकरण दाबले जाते. पण हा माणूस कारागृहातून बाहेर पडल्यानंतर नायकाने मृतदेह लपवला असल्याचे पोलिसांना सांगतो. त्यामुळे नायकाला अटक केले जाते. दुसरीकडे पोलीस नायकावर गेल्या दोन वर्षांपासून पाळत ठेवत असतात. त्यामुळे त्यांना त्याच्या कुटुंबियांविरुद्ध काही पुरावे देखील मिळतात. या सगळ्यातून नायक स्वतःचा आणि स्वतःच्या कुटुंबाचा बचाव कसा करतो हे आपल्याला दृश्यम 2 मध्ये पाहायला मिळते.
दृश्यम 2 या चित्रपटाची खरी जमेची बाजू म्हणजे या चित्रपटाची कथा.... या चित्रपटातील सस्पेन्स अतिशय रंजक असून प्रेक्षकांना हा चित्रपट शेवटपर्यंत खिळवून ठेवतो. मोहनलाल यांनी त्यांच्या अभिनयाचे कौतुक करावे तितके कमी. हा चित्रपट त्यांनी त्यांच्या अभिनयावर पेलला आहे असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही.