दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या काही मित्रांची कथा सांगणारा चित्रपट म्हणजे ड्राय डे. ड्राय डे या चित्रपटात ड्राय डेच्या दिवशी दारू पिऊन धमाल मस्ती करणाऱ्या मित्रांची कथा दाखवण्यात आली आहे. चित्रपटाच्या सुरुवातीला एक शिक्षक आपल्या मित्रांची गोष्ट त्यांच्या विद्यार्थ्यांना सांगत असतात. आपल्या मित्रांनी आणि आपण मिळून एका दिवशी सगळे विसरून दारू पिऊन कशी रात्र गाजवली हे ते आपल्या विद्यार्थ्यांना ते सांगतात. त्यांनी दारू पिऊन गोंधळ घालण्यामागे एक खास कारण असते. हे कारण काय असते आणि रात्रभर हे मित्र मिळून काय काय करतात हे दिग्दर्शकाने ड्राय डे या चित्रपटात मांडले आहे.अज्याचे (रित्विक केंद्रे) पल्लवीवर (मोनालिसा बागल) खूप प्रेम असते. पण काही कारणास्तव त्या दोघांचे ब्रेकअप होते. पल्लवी अजयचे तोंड पाहायला देखील तयार नसते. त्यामुळे अजय सतत तिचा पाठलाग करत असतो. त्यामुळे ती कंटाळून रस्त्यावरच तिची बाईक सोडून जाते. पण तिची ही बाईक अचानक गायब होते. ही बाईक आपल्यामुळेच हरवली असे समजून पंकज (योगेश सोहोनी) या त्याच्या मित्राच्या सोबतीने अज्या बाईक शोधायला लागतो. पण काही केल्या त्याला ती मिळत नाही. ब्रेकअप मुळे अजय खूपच दुःखी झालेला असतो आणि त्याच्यात त्याला या बाईकचे टेन्शन येते. तो दुःखात त्याच्या काही मित्रांसोबत खूप दारू पितो. दारू प्यायल्यानंतर तो आणि त्याचे मित्र मिळून तिच्या घराभोवती दंगा घालतात. इतकेच नाही तर पल्लवीच्या सर्वात चांगल्या मित्राला देखील रात्री ते उचलून आणतात आणि त्यानंतर रात्रभर काय काय घडते हे प्रेक्षकांना ड्राय डे या चित्रपटात पाहायला मिळते. ड्राय डे या चित्रपटाद्वारे दिग्दर्शकाला काय सांगायचे आहे हेच चित्रपट पाहाताना कळत नाही. चित्रपटात कोणत्याच गोष्टीचा ताळतम्य नाहीये. तसेच चित्रपटाचे कोणतेही गाणे ओठावर रुळत नाही. चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेला रित्विक केंद्रे आणि मोनालिसा बागल या दोघांचाही अभिनय तितकासा भावत नाही. त्यांच्या तुलनते पंकजच्या भूमिकेत असलेला योगेश सोहोनी आणि गण्याच्या भूमिकेत असलेला कैलाश वाघमारे यांनी अभिनय चांगला केला आहे. पण चित्रपटाच्या कथेतच दम नसल्याने हा चित्रपट प्रेक्षकांची चांगलीच निराशा करतो.
Dry day movie reviewः दारुड्यांची गोष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 5:30 PM