Join us

रिॲलिटी शोचं सत्य ते गेमच्या आहारी जाणाऱ्या पिढी; 'रिॲलिटी'च्या पलिकडलं वास्तवदर्शी चित्रण करणारा LSD 2

By संजय घावरे | Published: April 19, 2024 4:37 PM

LSD 2: पहिली कथा जेंडर बदलून मुलगी झालेल्या नूरची कहाणी आहे. 'ट्रूथ या नाच' या रिॲलिटी शोमध्ये ती सहभागी होते.मात्र, इथे तिला कशा प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागतो हे यात दाखवण्यात आलं आहे. तर दुसरी कथा आणखीनच रंजक आहे.

Release Date: April 19, 2024Language: हिंदी
Cast: परितोष तिवारी, अभिनव सिंह, बोनिता राजपुरोहित, स्वास्तिका मुखर्जी, स्वरूपा घोष, मौनी रॉय, तुषार कपूर, अनु मलिक, सोफी चौधरी
Producer: एकता कपूर, शोभा कपूरDirector: दिबाकर बॅनर्जी
Duration: 1 तास 56 मिनिटेGenre:
लोकमत रेटिंग्स

२०१० मध्ये प्रदर्शित झालेल्या दिबाकर बॅनर्जी दिग्दर्शित 'लव्ह सेक्स और धोखा' या चित्रपटाचा हा दुसरा भाग आहे. यात लव्ह लाईक, सेक्स शेअर आणि धोखा डाऊनलोड अशी तीन कथानकं आहेत. या निमित्ताने पुन्हा एकदा रिॲलिटीच्या पलिकडलं वास्तवदर्शी चित्र दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

कथानक : पहिली कथा जेंडर बदलून मुलगी झालेल्या नूरची कहाणी आहे. 'ट्रूथ या नाच' या रिॲलिटी शोमध्ये सहभागी झालेल्या नूरला कशा प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागतो आणि लोकप्रियतेचा ग्राफ उंचावण्यासाठी काय काय करावं लागतं ते यात आहे. दुसरी कथा सफाई कर्मचारी असलेल्या कुल्लूची आहे. एका रात्री तिच्यावर अत्याचार केला जातो. तिने लपवलेलं सत्य कसं तिलाच भोवतं ते पाहायला मिळतं. शुभम उर्फ गेम पापी या १४ वर्षीय मुलाचं तिसरं कथानक. गेमच्या जगात हरवणाऱ्या मुलांच्या भावविश्वावर प्रकाश टाकणारं आहे.

लेखन-दिग्दर्शन : एकमेकांना एका अनामिक धाग्याने जोडणाऱ्या तीनही कथा डिजिटल पार्श्वभूमीवर आधारलेल्या आहेत. मुख्य व्यक्तिरेखांसोबतच सहाय्यक व्यक्तिरेखांचेही दृष्टिकोन यात दाखवले आहेत. रिअॅलिटी शोमागील सत्य, पडद्यामागील स्क्रिप्टींग, परीक्षकांची भाडणं, स्पर्धकांमधील हाणामारी, शिवीगाळ, अश्लील चाळे, खऱ्या आयुष्यातील घटनांचा उपयोग कसा केला जातो हे दाखवलं आहे. दुसऱ्या कथानकात दोन महिलांची परस्परभिन्न जीवनशैलीही पाहायला मिळते. पौगंडावस्थेत गेमच्या आहारी जाणारी पिढी आणि मेटावर्सचं आकर्षण तिसऱ्या कथेत आहे. पहिल्या दोन कथानकांच्या तुलनेत तिसरं कथानक फार कंटाळवाणं वाटतं. सिनेमॅटोग्राफी अफलातून आहे. 

राजस्थानच्या ट्रान्सजेंडर बोनिताला लागली लॉटरी; LSD 2 मध्ये साकारणार लीड रोल

अभिनय :  परितोष तिवारीने रॅाकीची नूर झालेल्या तरुणीची व्यथा चांगल्या प्रकारे मांडली आहे. आईच्या भूमिकेत स्वरूपा घोष यांनी चांगली साथ दिली आहे. बोनिता राजपुरोहितने तृतीयपंथीच्या भूमिकेत जीव ओतला आहे. स्वास्तिका चक्रवर्तीने आपली व्यक्तिरेखा पूर्ण ताकदीनिशी साकारली आहे. अनु मलिक आणि सोफी चौधरी यांनी वास्तवदर्शी परीक्षक साकारले आहेत. तुषार कपूरच्या वाट्याला फार काही नाही. अभिनव सिंहनेही आपल्या भूमिकेत चांगले रंग भरले आहेत. 

सकारात्मक बाजू :  सिनेमॅटोग्राफी, अभिनय, दिग्दर्शन, पार्श्वसंगीत

नकारात्मक बाजू : लेखन, गीत-संगीत, विचलित करणारी अनावश्यक दृश्ये

थोडक्यात काय तर आजच्या काळातील कथानक सादर करताना काही उणीवा राहिल्या असल्या तरी 'लव्ह सेक्स और धोखा' आवडलेले प्रेक्षक एकदा नक्कीच चान्स घेतील.

टॅग्स :बॉलिवूडसिनेमाएकता कपूरमौनी राॅय