कॉलेजवयीन तरुणांच्या आधुनिक भावविश्वाचे प्रतिबिंब 'एफ. यू.' या चित्रपटात स्पष्ट पडलेले दिसते आणि त्यातून ही कथा तरुणाईच्या पातळीवर फेर धरते. 'एफ. यू.' म्हणजे 'फ्रेंडशिप अनलिमिटेड' असे हा चित्रपट सांगतो. साहजिकच, यातून मैत्रीला जागणाऱ्या मित्रांचे जे चित्र डोळ्यांसमोर येते, त्याला ही कथा अपवाद ठरलेली नाही. विविध प्रसंगांची बांधणी करत मैत्रीची युथफूल गोष्ट मांडण्याचा प्रयत्न या चित्रपटात प्रकर्षाने केलेला दिसतो. कॉलेजविश्वात घडणाऱ्या विविध प्रसंगांना मैत्रीच्या नात्यात बांधून ठेवत, एकमेकांना साथ देणाऱ्या मित्रांची ही गोष्ट आहे. कॉलेजात चालणारे सगळे 'उद्योग' हे सर्वजण मनापासून 'एन्जॉय' करत असतात. यातला साहिल, कॉलेजात नव्याने आलेल्या रेवतीच्या प्रथमदर्शनीच प्रेमात पडतो. या प्रेमकहाणीसह कॉलेजमधल्या दोन गटांतली ठसनही या कथेत डोकावते. या मित्रांच्या वेगवेगळ्या तऱ्हा असतात. यांच्यातला गटल्या हा तर त्याच्या शिक्षिकेच्याच प्रेमात पडतो. तर मॅकचे तारासोबत प्रेमप्रकरण सुरु असते. मुलांच्या या धिंगाण्यातून पुढे एक भलतेच प्रकरण उभे राहते आणि त्याला ही मित्रमंडळी तोंड देतात. यातून त्यांच्या मैत्रीचे धागे उलगडत जातात.
कॉलेजविश्वाच्या मुळाशी जात आजच्या तरुणाईचे प्रातिनिधिक चित्र रेखाटण्याचा प्रयत्न अभिजीत देशपांडे यांनी कथेत केला आहे. त्यांच्यासह महेश मांजरेकर आणि गौरव पत्की यांनी त्यावर पटकथा बेतली आहे. हा चित्रपट आजच्या तरुणांची भाषा बेधडक बोलतो. तसे पाहायला गेल्यास, या चित्रपटाला सलग अशी कथा नाही. अनेकदा यातले प्रसंग उत्सुकता निर्माण करतात आणि प्रसंगी चेहऱ्यावर स्मितरेषाही उमटवतात. पण काहीवेळा मात्र, अरे हे काय चाललंय, असा प्रश्नही उपस्थित करतात. पण 'कॉलेजगोअर्स'चा चष्मा लावला, की यातल्या मुलांच्या स्वभावाशी रिलेट होता येते. कथेत नावीन्य असे फार काही नाही; मात्र दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी ही कथा फुलवत नेत 'प्रेझेन्टेबल' करण्याचा प्रयत्न केला आहे. आजच्या तरुणाईला डोळ्यांसमोर ठेवून केलेली मांडणी या चित्रपटातून स्पष्ट दिसून येते.
हा चित्रपट 'म्युझिकल' आहे आणि त्यात चक्क १४ गाणी आहेत. ही धडकी भरवणारी बाब वाटत असली, तरी या गाण्यांचा गोफ यात बेमालूम विणल्याने त्यांचे अजीर्ण होत नाही. संगीतातली ही कलाकारी समीर साप्तीसकर आणि विशाल मिश्रा यांनी घडवून आणली आहे. गीतकार, संगीतकार आणि गायक मंडळींचे हे टीमवर्क चांगले जुळून आले आहे. आकाश ठोसर (साहिल), सत्या मांजरेकर (गटल्या), शुभम किरोडिअन (मॅक), मयुरेश पेम (चिली), संस्कृती बालगुडे (तारा), माधव देवचक्के (सँडी) आदी कॉलेज विद्यार्थ्यांची मैत्री यात दिसते आणि त्यांनी त्यांच्या परीने यात धिंगाणा घातला आहे. आकाश ठोसरला डॅशिंग भूमिकेत वेगळे रंग दाखवण्याची संधी यात मिळाली आहे आणि ती पार पाडण्याचा त्याने आटोकाट प्रयत्न केला आहे. वैदेही परशुरामी (रेवती) यात गोड दिसली आहे आणि तिने ही भूमिका छान रंगवली आहे. तरुणाईच्या या फळीव्यतिरिक्त सचिन खेडकर, आनंद इंगळे, महेश मांजरेकर, शरद पोंक्षे, बोमन इराणी, मेधा मांजरेकर, भारती आचरेकर, अश्विनी एकबोटे आदी सिनिअर कलावंतांचा आधार चित्रपटाला मिळाला आहे. एकूणच, आजच्या तरुणांची भाषा बोलणारा हा चित्रपट म्हणजे निव्वळ कॉलेजवयीन मुलांसाठी असलेली 'ट्रीट' म्हणावी लागेल.