- जान्हवी सामंत
जहां मिले पाँच माली,वहाँ बाग सदा खाली... अशी हिंदीत एक म्हण आहे. ‘फन्ने खां’ या चित्रपटाची गतही काहीशी अशीच म्हणता येईल. अनिल कपूर, ऐश्वर्या राय बच्चन, सतीश कौशिक आणि दिव्या दत्ता यांच्यासारखे मुरलेले ‘माळी’ असताना ‘फन्ने खां’ची बाग काही फुललेली नाही. याचे मुख्य कारण म्हणजे, चित्रपटाची पटकथा. ही कथा आहे प्रशांत शर्मा (अनिल कपूर) या आॅर्केस्ट्रा सिंगरची. गल्लीतील आॅर्केस्ट्रात आणि मैफीलीत गाणा-या प्रशांतला लोक ‘फन्ने खां’ नावाने ओळखतात. त्याचे केवळ एकचं स्वप्न असतं, ते म्हणजे, आपल्या एकुलत्या एका मुलीला सुपरस्टार गायिका बनवण्याचं. यासाठीचं त्याची धडपड सुरु असते. प्रशांतची मुलगी लता (पिहू संद) मात्र पित्यावर सतत चिडलेली असते. स्वत:च्या जाडेपणावरून लोकांचे ऐकावी लागणारी टोमणी, साधारण चेहरा असलेल्या न्यूनगंडामुळे स्वत:तील प्रतिभेकडे झालेले दुर्लक्ष यासगळ्यांचे खापर ती आपल्या वडिलांच्या डोक्यावर फोडत असते. पण तरिही लताला स्टार बनवण्याच्या इर्षेने प्रशांतला पछाडले असते. तिच्यासाठी गाणी लिहिणे, त्याला तासन् तास चाली लावत बसणे आणि ही गाणी प्रोड्यूस करायला पैसा उभा करणे यासाठी तो जीवतोड मेहनत करतो. त्याचा जीवलग मित्र अदीर (राजकुमार राव) त्याला याकामी मदत करतो. पण प्रशांत आणि अदीर काम करत असलेली फॅक्टरी बंद पडते आणि या दोन्ही मित्रांचा धीर सुटतो. पोटापाण्याचा प्रश्न सुटावा म्हणून प्रशांत टॅक्सी चालवायला घेतो आणि एकदिवस अनपेक्षितपणे त्याची भेट सुपरस्टार गायिका बेबी सिंगशी (ऐश्वर्या राय) होते. खरे तर प्रशांत हताश झालेला असतो. पण बेबी सिंगसारख्या एवढ्या मोठ्या गायिकेला पाहून तो तिला किडनॅप करण्याचा प्लान बनवतो. अदीरच्या मदतीने ते तिला आपल्या जुन्या फॅक्टरीत ठेवतात. पण मुळातचं गुन्हेगारीची कुठलीही पार्श्वभूमी नसल्यामुळे दोघेही घाबरतात आणि सगळा प्लान उलटतो. बेबी तिचा हावरट मॅनेजर, प्रोड्यूसर आणि त्यांच्या पैशा कमावण्याच्या कल्पनांना कंटाळलेली असते. प्रशांत व अदीरसारख्या बावळट किडनॅपरच्या रूपात तिच्या हाती आयते कोलीत सापडते आणि तीही या संधीचा फायदा घेते.
खरे तर चित्रपटाची कथा विनोदी आहे, रंजक आहे आणि रोमॅन्टिकही. पण पडद्यावर ती तितक्याच रंजकपणे साकारण्यात दिग्दर्शक अपयशी ठरला आहे. पहिल्या तासात चित्रपटाची कथा अति नाट्यपूर्ण वळण घेते. कथेला अनेक मनोरंजक पैलू असूनही चित्रपट केवळ प्रशांत आणि लता या बापलेकीच्या ट्रॅकवर रेंगाळत राहतो. त्यामुळे बेबी आणि अदिरची वाढती जवळीक, बंद पडलेल्या जुनाट फॅक्टरीत त्यांचे फुलणारे प्रेम हे सगळे लताच्या कथेच्या कर्कश आवाजात गुडूप होते. चित्रपटाचा दुसरा भाग तर आणखीच कंटाळवाणा होतो. अभिनयाचे सांगाल तर अनिल कपूर आणि निगेटीव्ह रोलमधील गिरीश कुलकर्णीवगळता कुणाचाच अभिनय मनाला भावत नाही. अगदी ऐश्वर्या आणि राजकुमारही कृत्रिम वाटतात. थोडक्यात काय तर सूर आणि चाल सुंदर असूनही ‘फन्ने खां’ लय आणि ताल पकडू शकला नाही.