Join us

Faster Fene movie review : प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा फास्टर फेणे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2017 6:14 AM

झी मराठीवरील दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेतून घराघरांत पोहोचलेला अमेय वाघ फास्टर फेणे या चित्रपटात बनेश उर्फ फास्टर फेणेच्या भूमिकेत दिसणार आहे. तसेच चित्रपटात गिरीश कुलकर्णी आणि दिलीप प्रभावळकर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

Release Date: October 27, 2017Language: मराठी
Cast: अमेय वाघ, गिरीश कुलकर्णी, पर्ण पेठे, सिद्धार्थ जाधव, चिन्मयी सुमीत, बालकलाकार शुभम मोरे
Producer: जिनिलीया देशमुख, रितेश देशमुख, झी स्टुडिओजDirector: आदित्य सरपोतदार
Duration: २ तासGenre:
लोकमत रेटिंग्स
प्राजक्ता चिटणीसशिक्षणासाठी कुवत नाही तर ऐपत असावी लागते असे म्हणत फास्टर फेणे या चित्रपटात आजच्या शिक्षण पद्धतीवर खरमरीत भाष्य करण्यात आले आहे. भागवंताची फास्टर फेणेची पुस्तके म्हणजे अनेकांचा जीव की प्राण आहेत. या चित्रपटाच्या चित्रपटाचे नाव फास्टर फेणे असले तरी व्यक्तिरेखा वगळता यात काही साम्य नाही. लेखक क्षितिज पटवर्धनने हा फास्टर फेणे खूपच चांगल्या रितीने आणि वेगळ्या पद्धतीने उभा केला आहे. बन्या (अमेय वाघ) मेडिकलची एन्टरन्स परीक्षा देण्यासाठी पुण्याला येतो. तो भा रा भागवत (दिलीप प्रभावळकर) यांच्याकडे परीक्षेच्या दरम्यान राहायला लागतो. बन्या भागवंताच्या घरी ज्या दिवशी येतो, त्याच दिवशी त्यांच्या घरात चोरी झालेली असते. या चोरीची उकल केवळ काही तासात बन्या करतो. ही चोरी भोभो (शुभम मोरे) ने केलेली असते. पण त्याला आई वडील नसल्याने काही लोक जबरदस्तीने त्याच्याकडून अशा प्रकारची कामे करून घेत असतात. त्यामुळे भोभोला आपल्याकडे ठेवायचे असे भागवत ठरवतात. बन्या परीक्षेला गेला असताना गावातून केवळ परीक्षा देण्यासाठी आलेल्या धनेशशी त्याची ओळख होते. परीक्षा संपल्यावर धनेश त्याला भेटेल असे त्याला वाटत असते पण तो त्याला न भेटताच निघून जातो. बन्या परीक्षा संपल्यावर भागवतांचा निरोप घेऊन घरी जायला निघतो, तर त्याच वेळी धनेशने आत्महत्या केली असल्याचे तो पेपरमध्ये वाचतो आणि धनेशने आत्महत्या न करता त्याचा खून झाला आहे याचा बन्याला विश्वास असल्याने तो त्याचा शोध घ्यायचा ठरवतो. यात त्याला त्याची मैत्रीण अबोली (पर्ण पेठे) आणि भोभो मदत करतो. पर्ण ही एक पत्रकार असते. या सगळ्यात बन्याचा सामना आप्पा (गिरीश कुलकर्णी) सोबत होतो. तो एक गुंड असतो. बन्या धनेशच्या हत्येची उकल करतो का? बन्याला या सगळ्यात कोण कोणत्या संकटांचा सामना करावा लागतो? हे फास्टर फेणे हा चित्रपट पाहिल्यावरच कळेल.आदित्य सरपोतदारने फास्टर फेणे या चित्रपटाचे खूपच चांगल्या प्रकारे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात अमेय वाघ, पर्ण पेठे, शुभम मोरे आणि दिलीप प्रभावळकर यांनी खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. पण खऱ्या अर्थाने चित्रपटात भाव खाऊन जातो तो गिरीश कुलकर्णी. गिरिश कुलकर्णीच्या प्रत्येक संवादावर प्रेक्षक फिदा होणार यात काहीच शंका नाही. अमेय आणि  गिरिश कुलकर्णी यांचे एकत्र असलेले सीन खूपच चांगल्याप्रकारे जमून आले आहे. फास्टर फेणेच्या रूपाने एक वेगळ्या धाटणीचा चित्रपट मराठी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.