Join us

Fateh Movie Review: सायबर गुन्हेगारीचा पर्दाफाश करणारा सोनूचा अ‍ॅक्शन थ्रिलर

By संजय घावरे | Updated: January 11, 2025 18:30 IST

Fateh Movie Review: दीन-दुबळ्यांच्या मदतीला धावणाऱ्या सोनू सूदने दिग्दर्शनाकडे वळताना गोर-गरीबांशी निगडीत असलेला विषय मोठया पडद्यावर मांडला आहे.

Release Date: January 10, 2025Language: हिंदी
Cast: सोनू सूद, जॅकलीन फर्नांडीस, नसीरुद्दीन शाह, विजय राज, शिव ज्योती राजपूत, दिब्येंदू भट्टाचार्य, शीबा चड्ढा, आकाशदीप
Producer: सोनाली सूद, उमेश केआर बन्सलDirector: सोनू सूद
Duration: दोन तास १० मिनिटेGenre:
लोकमत रेटिंग्स

दीन-दुबळ्यांच्या मदतीला धावणाऱ्या सोनू सूद(Sonu Sood)ने दिग्दर्शनाकडे वळताना गोर-गरीबांशी निगडीत असलेला विषय मोठया पडद्यावर मांडला आहे. सायबर गुन्हेगारीचा मोठा फटका सर्वसामान्यांना बसतो. हाच धागा पकडून सोनूने नवीन वर्षाच्या सुरुवातीला सायबर गुन्हेगारीचा पर्दाफाश करत अ‍ॅक्शन थ्रिलर सादर केला आहे. भयानक रक्तपात असल्याने हा चित्रपट १८ वर्षांवरील व्यक्तींनाच पाहता येऊ शकेल.

कथानक : कथा पंजाबमधील मोगा गावातील फतेह सिंगची आहे. चित्रपटाच्या सुरुवातीला फतेहला कॅाल येतो. त्यानंतर तो एका ठिकाणी जातो आणि तिथे उपस्थित असलेल्या शेकडो लोकांची हत्या करतो. त्याचवेळी एक स्फोट होतो आणि कथानक भूतकाळात सुरू होते. गावी फतेहच्या शेजारी राहणारी निम्रत सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकते. निम्रतने दिलेल्या कर्जामुळे तिच्या गावातील एक गृहस्थ आत्महत्या करतो. त्यानंतर निम्रतही गायब होते. तिला शोधण्यासाठी फतेह दिल्लीत येतो. यासाठी त्याला पुन्हा आपला जुना अवतार धारण करावा लागतो.

लेखन-दिग्दर्शन : पटकथेची मांडणी उत्कंठावर्धक असून, संवादही अर्थपूर्ण आहेत. सुरुवातीला अर्धवट सोडलेल्या दृश्याची सांगड नंतर योग्य रितीने घालण्यात आली असून, शेवटपर्यंत रहस्य कायम राहिले आहे. सायबर गुन्ह्यांबाबतची तपशीलवार माहिती देण्यात आली असली तरी काही त्रुटी राहिल्याचे जाणवते. मनाचा थरकाप उडवणाऱ्या हत्या आणि रक्तपात असल्याने हळव्या मनाच्या वक्तींनी सावधगिरी बाळगायला हवी. एका दृश्यामध्ये रणबीर कपूरच्या 'अॅनिमल'ची आठवण येते. रोमान्सला फार महत्त्व देण्यात आले नसल्याने मुख्य मुद्दा कायम प्रकाशात राहतो. बऱ्याच दिवसांनी विजय राज एका वेगळ्या व्यक्तिरेखेत दिसला. नायक स्ट्राँग दाखवण्याच्या नादात मुख्य खलनायक काहीसा कमकुवत झाल्यासारखा वाटतो. उगाच गाणी घुसडण्याचा प्रयत्न न केल्याने चित्रपटाची लांबी आटोक्यात राहिली आहे. सिनेमॅटोग्राफी खूप छान आहे.

अभिनय : अ‍ॅक्शन हिरोच्या रूपात सोनू सूद भाव खाऊन जातो. दिग्दर्शन आणि नायक या दोन्ही जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळताना त्याने जीव ओतून काम केले आहे. विजय राजचे एक वेगळे रूप यात असून, त्याने अतिशय संयतपणे आपली भूमिका साकारली आहे. नसीरुद्दीन शाहांसारखे दिग्गज अभिनेते मुख्य खलनायकी भूमिकेत असले तरी तितकेसे प्रभावी वाटत नाहीत. जॅकलीन फर्नांडीस या चित्रपटातील सर्वात मोठा कमकुवत भाग आहे. अद्याप तिला नीट संवादफेकही जमत नसल्याचे आश्चर्य वाटते. याउलट शिव ज्योती राजपूतने आपल्या व्यक्तिरेखेला अचूक न्याय दिला आहे. दिब्येंदू भट्टाचार्य, शीबा चड्ढा, आकाशदीप यांनी चांगली साथ दिली आहे.

सकारात्मक बाजू : विषय, पटकथा, संवाद, दिग्दर्शन, अ‍ॅक्शन, अभिनय, सिनेमॅटोग्राफी, तपशीलनकारात्मक बाजू : मुख्य खलनायक, नायिका, काही अतार्किक दृश्येथोडक्यात काय तर सायबर गुन्हेगारीपासून सावध राहण्याचा संदेश देणारा तसेच हिंसाचाराचा भडीमार असलेला हा अ‍ॅक्शनपट पाहण्याजोगा आहे.

टॅग्स :सोनू सूद