Join us

Fussclass Dabhade Movie Review: 'दाभाडे' कुटुंबाची कहाणी लय भारी की कंटाळवाणी? कसा आहे 'फसक्लास दाभाडे' सिनेमा, जाणून घ्या

By देवेंद्र जाधव | Updated: January 29, 2025 14:04 IST

हेमंत ढोमे दिग्दर्शित 'फसक्लास दाभाडे' सिनेमाचा थिएटरमध्ये पाहण्याआधी वाचा हा रिव्ह्यू (fussclass dabhade)

Release Date: January 24, 2025Language: मराठी
Cast: अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग, राजसी भावे, निवेदिता सराफ, राजन भिसे, उषा नाडकर्णी, कलाबाई नकती, मिताली मयेकर
Producer: क्षिती जोग, आनंद एल रायDirector: हेमंत ढोमे
Duration: २ तास ३८ मिनिटंGenre:
लोकमत रेटिंग्स

देवेंद्र जाधव>>>

कुटुंब म्हणजे काय? राहायला घर, त्यात राहणारी माणसं, एकत्र जेवण, सण-समारंभ इतकंच? तर नाही! अनेकदा कुटुंबातील व्यक्ती एकमेकांना रोज भेटत असतात. पण तरीही कुटुंबातील माणसांच्या अंतरंगात काय चाललंय? त्याला काही त्रास आहे का? त्याचं आयुष्य खरंच नीट सुरु आहे ना? अशा साध्या गोष्टींबद्दल सर्वजण अनभिज्ञ असतात. वरवर हसणारी आणि सगळेजण एकत्र आल्यावर गोड बोलणारी माणसं खरंच मनापासून तशी वागतात का? की हा सर्व दिखावा असतो? असा प्रश्न उभा राहतो.

आमची फॅमिली कितीही पुढारलेल्या विचारांची असली तरीही याच फॅमिलीसमोर बेसिक गोष्टी बोलायलाही कधीकधी अवघडलेपणा येतो. कधीकधी आपल्याच माणसांशी बोलायला तिटकारा वाटतो. दिग्दर्शक हेमंत ढोमेने 'फसक्लास दाभाडे'मधून कुटुंबव्यवस्थेत राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या मनाचा तळ गाठण्याचा प्रयत्न केलाय. 

कथानक:

'फसक्लास दाभाडे' सिनेमाच्या सुरुवातीला दाभाडेंचं शेंडेफळ प्रशांतच्या (अमेय वाघ) लग्नाची लगबग पाहायला मिळते. प्रशांतचं लग्न कोमलशी (राजसी भावे) ठरलेलं असतं. दोघांच्या लग्नानिमित्ताने संपूर्ण दाभाडे कुटुंब एकत्र येतं. काही कारणास्तव घर सोडून गेलेला किरण (सिद्धार्थ चांदेकर) सुद्धा या लग्नानिमित्ताने पुन्हा 'आपल्या' माणसांमध्ये येतो. प्रशांत-कोमलचं लग्न यथासांग अन् निर्विघ्न पार पडतं. परंतु नंतर वरवर आनंदात दिसणाऱ्या दाभाडे कुटुंबाची आतली पोकळी जाणवते. 

प्रशांत, किरण, जयश्री (क्षिती जोग) या तीन भावंडांची स्वतःची काहीतरी दुःख असतात. स्वतःच्या आयुष्यात काहीतरी कमतरता असल्याने सर्वजण इतरांवर राग काढताना दिसतात. या सर्वांना सावरताना आईची (निवेदिता सराफ) नेहमीच फरफट होते. त्यातच दाभाडेंच्या घरात आलेल्या नव्या सुनेची एक इच्छा होती. दाभाडेंच्या परंपरावादी वातावरणात ही इच्छा पूर्ण होईल का, ही तिला शंकाच असते. अशाप्रकारे प्रत्येकाच्या दुःखाचा आणि उणिवांचा पदर उलगडत शेवटी एका छान नोटवर 'फसक्लास दाभाडे' संपतो.दिग्दर्शन:

हेमंत ढोमेने 'फसक्लास दाभाडे'चं दिग्दर्शन केलंय. हेमंत ढोमेला मराठीतला सूरज बडजात्या म्हटल्यास वावगं ठरणार नाही. कारण प्रेक्षक सहकुटुंब एन्जॉय करतील असा सिनेमा कसा बनला पाहिजे, याची जाण हेमंतकडे आहे. 'झिम्मा', 'झिम्मा २' हे सिनेमे त्यामुळेच यशस्वी झाले. 'फसक्लास दाभाडे'मधूनही प्रेक्षकांना हवं ते सर्व पॅकेज हेमंतने पुरवलं आहे. हेमंतने स्वतःच्या गावात 'फसक्लास दाभाडे'चं शूटिंग केल्याने तिथला संपूर्ण माहोल निर्माण करण्यात तो यशस्वी झालाय. 'फसक्लास दाभाडे'मधील कलाकार हे मुंबई, पुण्यातले असले तरी त्यांच्या तोंडी असणारी भाषा, वेशभूषा, वावर, हावभाव याची विशेष काळजी हेमंतने घेतलेली दिसतेय. त्यामुळे सर्वजण त्याच भागातले वाटतात. 

लग्नाच्या घरी कशी गडबड असते, माणसांचा सातत्याने कसा राबता असतो हे हेमंतने अचूक दाखवलंय. 'कुटुंब' म्हणून दाभाडेंशी आपण कनेक्ट होतो. मध्यंतरापर्यंत सिनेमा जबराट झालाय. परंतु मध्यंतरानंतर मात्र सिनेमाचा वेग मंदावतो. कारण प्रत्येकाची दुःख आधीच माहित झाल्याने त्या दुःखाचा उपायही प्रेक्षक म्हणून आपल्याला ठाऊक असतो. परंतु तो पडद्यावर साकारताना सिनेमाची गती संथ होतो आणि आपल्या मनावरची पकड सुटते. तरीही शेवटच्या काही मिनिटांमध्ये सिनेमाची गाडी पुन्हा रुळावर येते. गाणी, संगीतही सिनेमाला समर्पक झालंय. याशिवाय सुरुवातीपासून शेवटपर्यंत गावच्या अस्सल मातीमधले प्रासंगिक विनोद पेरण्यात हेमंत यशस्वी झालाय.

अभिनय:

हेमंत ढोमेने 'फसक्लास दाभाडे'मध्ये कलाकार एकदम कसलेले निवडलेले आहेत. कलाकार निवडीसाठी हेमंतला पैकीच्या पैकी मार्क्स. अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग या तिघांची भाऊ-बहीण म्हणून केमिस्ट्री लक्षात राहते. याशिवाय आई-बाबांच्या भूमिकेत निवेदिता सराफ आणि राजन भिसे या दोघांनी सुंदर काम केलंय. 'श्रीयुत गंगाधर टिपरे' फेम राजन भिसेंना अनेक वर्षांनी मोठ्या पडद्यावर बघणं हा एक सुखावह अनुभव.

उषा नाडकर्णीही गंभीर प्रसंगात विनोदाची खसखस पेरायचं काम करतात. कोमलच्या मैत्रिणीच्या भूमिकेत दिसलेली अभिनेत्री तृप्ती शेडगे तिच्या अपलातून कॉमिक टायमिंगमुळे खळखळून हसवते. छोट्याश्या भूमिकेत मिताली मयेकरही छाप पाडते. याशिवाय 'फसक्लास दाभाडे'निमित्ताने अनेक दिवसांनी मराठी सिनेमात पाहुणे कलाकार दिसतात.

चांगल्या बाजू: कलाकारांचा अभिनय, गाणी, गावचा माहोल, कथा

वाईट बाजू: लांबलेली पटकथा, मध्यंतरानंतरची संथ गती 

एकूणच दुरावलेल्या नात्यांना एकत्र आणणारा 'फसक्लास दाभाडे' सिनेमा सहकुटुंब नक्की बघू शकता. हेमंत ढोमेला मराठी प्रेक्षकांची नस अचूक कळलीय. त्यामुळे गाण्यांची साथ त्याला विनोदाचा तडका अशा खास पद्धतीने 'फसक्लास दाभाडे' निखळ मनोरंजन करतो. मध्यंतरानंतर पटकथेवर थोडं काम केलं असतं तर दाभाडे कुटुंब संस्मरणीय झालं असतं. तरीही उणीवा विसरुन 'फसक्लास दाभाडे' तुम्ही तुमच्या फॅमिलीसकट थिएटरमध्ये नक्की बघू शकता.

टॅग्स :सिद्धार्थ चांदेकरHemant Dhome Today Newsमराठी चित्रपटमिताली मयेकरअमेय वाघ