तेजल गावडे
बॉलिवूडमध्ये 'गजनी', 'तलाश', 'डर' व 'संघर्ष' यांसारखे सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. मात्र 'गली गुलियां' हा चित्रपट सायकोलॉजिकल थ्रिलरवर आधारीत असला तरी हा वेगळ्या धाटणीचा सिनेमा आहे. हा चित्रपट २३ हून अधिक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात नावाजला गेला आहे. या महोत्सवांमध्ये हा सिनेमा 'इन द शॅडोज' या नावाने प्रदर्शित करण्यात आला आहे. नेहमीप्रमाणे अभिनेता मनोज वाजपेयीने 'गली गुलियां' सिनेमात दमदार अभिनयाने छाप सोडली आहे. हा वेगळ्या धाटणीचा सिनेमा असून घरात मुलावर होणारा अत्याचार व लहान वयात त्याला कामाला लावून त्याचे बालपण कुठेतरी हरपताना दाखवले आहे. त्या अत्याचाराचा मुलावर होणारा गंभीर परिणाम यावर हा चित्रपट भाष्य करतो.
'गली गुलियां'ची कथा जुन्या दिल्लीतील एका छोट्या घरात राहणाऱ्या खुद्दूस (मनोज वाजपेयी) भोवती फिरते. तो इलेक्ट्रिशियन असतो आणि बऱ्याच सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून त्याच्या आजूबाजूच्या विभागात लक्ष ठेवत असतो. त्याचा मित्र गणेशी (रणवीर शौरी) नेहमी त्याच्या मदतीला धावून येत असतो. खुद्दूसच्या शेजारच्या घरात घडणाऱ्या गोष्टींमुळे खुद्दूस खूप त्रस्त होतो. तो सतत त्याच गोष्टीचा विचार करत राहतो. त्याला त्या घरात राहणाऱ्या इद्रीस (ओम सिंग) या लहान मुलाचा आवाज ऐकू येतो. त्याचे वडील (नीरज काबी) त्याच्या छोट्या छोट्या गोष्टींवर त्याला ओरडत असतात आणि मारतात. इद्रीसच्या वडीलांचे घरात अजिबात लक्ष नसते व ते घरातल्यांसोबत चांगले वागत नसतात. या गोष्टींना कंटाळून इद्रीस घरातून पळून जायचा निर्णय घेतो. खुद्दूसला इद्रीसची खूप काळजी वाटत असते व त्याला त्याची मदत करायची असते. म्हणून रात्रंदिवस तो त्याच्याबद्दल विचार करत असतो. चित्रपटाच्या शेवटी असे काही घडते, जे पाहून हैराण व्हायला होते. हा चित्रपटातील महत्त्वाचा भाग आहे. इद्रीस पळून जातो का व खुद्दूस त्याला मदत करतो का या सर्व प्रश्नांची उत्तरे चित्रपट पाहिल्यावर मिळणार आहेत.
'गली गुलियां' चित्रपट हा डार्क सिनेमा असून चित्रपटाची सुरूवात फारच संथ गतीने सुरू होते. पण, मध्यांतरानंतर चित्रपट वेगाने पुढे सरकतो. चित्रपटातील काही गोष्टी अपूर्ण वाटतात. दीपेश जैन यांनी खूप चांगले दिग्दर्शन केले आहे. चित्रपटाची कथादेखील त्यांनीच लिहिली असून त्यांनी रुपेरी पडद्यावर उत्तमरित्या साकारला आहे. काइ मिडेनडॉर्प यांनी त्यांच्या कॅमेऱ्यातून छान दृश्य टिपली आहेत. मनोज वाजपेयीने चित्रपटात केलेला अभिनय वाखाण्याजोगा आहे. त्याने सायको खुड्डूसच्या भूमिकेतून प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे. तर बालकलाकार ओम सिंगने या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले असले तरी त्याने खूप चांगला अभिनय केला आहे. रणवीर शौरी, नीरज काबी, शहाना गोस्वामी या कलाकारांनीदेखील आपल्या भूमिकांना न्याय दिला आहे. 'गली गुलियां' चित्रपटाचा उत्तरार्धात प्रेक्षकांना थक्क करतो. हा सिनेमा सायकोलॉजिकल थ्रिलरवर आधारीत असला तरी यातून एक चांगला संदेश देण्यात आला आहे.