प्राजक्ता चिटणीस गावातून शहरात गेलेल्या मुलांना आपली प्रगती झाली की आपले गाव, आपली माणसे यांचा विसर पडतो पण आपल्या पालकांनी आपल्यासाठी केलेले कष्ट, आपल्या गावाचे, शाळेचे आपल्यावर असलेले उपकार याची जाण असलेल्या एका मुलाची कथा आपल्याला गावठी या चित्रपटात पाहायला मिळते. गजाजन (श्रीकांत पाटील) लहानपणापासून खूप हुशार असतो. तू मोठा होऊन प्रगती कर आणि गावाच्या विकासाला हातभार लाव अशी त्याच्या वडिलांनी (किशोर कदम) शिकवण दिलेली असते. गजाननचे प्रेम गौरीवर (योगिता चव्हाण) असते. ती गावातील सावकाराची (नागेश भोसले) मुलगी असते. हा सावकार गावातील लोकांना लुबाडत असतो. त्यामुळे गजाचे वडील आणि त्याच्यात नेहमीच वाद होत असतात. गजानन आणि गौरीच्या प्रेमप्रकरणाबाबत तिच्या वडिलांना कळल्यावर ते यास विरोध करतात. गावातील एका मुलाला हाताशी धरून गजाननाच्या घरी सांगतात की त्या मुलाने गजाननासाठी मुंबईत नोकरी पहिली आहे. आपल्या मुलाला नोकरी मिळाली आहे हे कळताच घरातले देखील खूश होतात आणि त्याला मुंबईला पाठवतात. पण मुंबईत गेल्यावर त्याच्याकडे नोकरीच नसते. त्याला इंग्रजी येत नसल्याने गावठी म्हणत त्याचा सगळे अपमान करतात. या सगळ्या परिस्थितीवर गजानन मात करतो की नाही हे प्रेक्षकांना गावठी चित्रपट पाहिल्यावरच कळेल. चित्रपट मध्यंतरापर्यंत खूपच संथ आहे. व्यक्तिरेखांची ओळख, गजानन आणि गौरीचे प्रेमप्रकरण, गजाननच्या मित्रांची धमाल मस्ती सोडली तर मध्यंतरापर्यंत चित्रपटात काहीच घडत नाही. पण मध्यंतरानंतर चित्रपट चांगली पकड घेतो. चित्रपटात किशोर कदम, नागेश भोसले, कुशल बद्रिके, नागेश भोसले, नंदकिशोर चौगुले, सदानंद, श्रीकांत पाटील यांनी चांगली कामं केली आहेत. वंदना वाकनिस आणि योगिता चव्हाण यांच्या वाट्याला छोटीशी भूमिका आली असली तरी त्यांनी त्यांच्या भूमिकेला चांगला न्याय दिला आहे. इंग्रजी भाषा येणे गरजेचे आहे असे मुंबई सारख्या शहरातील लोकांना वाटते. त्यामुळे गावात शिकलेल्या लोकांच्या मनात इंग्रजी बोलता येत नाही हा न्यूनगंड सतत राहतो आणि त्यामुळे त्यांच्यात कौशल्य असले तरी ते चारचौघात बोलायला घाबरतात. इंग्रजी भाषा येत नाही म्हणून कोणाला कमी लेखू नये असा संदेश हा चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच देऊन जातो. दिग्दर्शक आंनद कुमार हा स्वतः खूप चांगला कोरिओग्राफर असल्याने चित्रपटातील स्टेप्स खूप चांगल्या आहेत. एका गाण्यात आंनद कुमार उर्फ अँडीने स्वतः डान्स केला आहे. अँडीचा डान्स तर अफलातून आहे.