मराठी सिनेमा बदलतोय, त्याच्या कक्षा रूंदावल्यात असं सतत आपल्या कानावर येत असतं. पण जेव्हा एक असा सिनेमा येतो की तो बॉलिवूडच्या तोडीचा निघतो तेव्हा अक्षरक्ष आनंद होतो. गर्लफे्रंड हा त्यातलाच एक संपूर्ण आनंद देऊन जाणारा सिनेमा आहे. मन खूष करून टाकणं म्हणजे काय असतं याचा प्रत्यय आपल्याला गर्लफ्रेंड सिनेमा पाहून येतोच. सिंगल स्टेटस असणारा एक तरूण आणि त्याच्या आयुष्यात गर्लफ्रेंड आल्यानंतर होणारी स्थित्यंतरं याचा एक मसालेदार सिनेमा म्हणजे गर्लफ्रेंड . मराठी सिनेमाच्या संहिता अप्रतिम असतातच मात्र सध्याचा मराठी सिनेमा संहिता अप्रतिम असूनही सादरीकरणाच्या टप्प्यावर अपयशी ठरतात मात्र गर्लफ्रेंड सर्व आघाड्यांवर लव यू म्हणावा असाच आहे. सिनेमाचा लेखक दिग्दर्शक आहे उपेंद्र सिधये . उपेंद्रचा हा पहिलाच सिनेमा. आपल्या पहिल्याच सिनेमात उपेंद्रने दिल खूष करून टाकलंय. सिनेमाची कथा ही तितकीच खुमासदार आहे. नचिकेत (अमेय वाघ) पेशाने ग्राफिक डिझायनर मात्र इतकी वर्ष झाली तरी आपल्यासमोर सिंगल स्टेटस लागलं आहे यापासून पछाडलेला. व्हॅलेंटाईन डे ला वाढदिवस असूनही नचिकेत ऊर्फ नच्या प्यार से कोसो दूर है. आई,बाबा,लहान भाऊ, ऑफिस स्टाफ, नच्याचा बॉस या सर्वांनीच त्याला गर्लफ्रेंड नाही म्हणून अक्षरक्ष भंडावून सोडलंय. आपण सिंगल आहोत याचा त्रास होत असलेला नचिकेत वाढदिवसाच्या रात्री एक शक्कल लढवतो. एका रात्रीत अशी काही जादू होते. आणि नच्याच्या आयुष्यात त्याच्या मनातील राजकुमारी (सई ताम्हणकर) प्रकटते. सिंगल आहे म्हणून हिणावणारे सगळेजण एका दिवसात बदलतात. एके दिवशी ही फेसबुकरूपी गर्लफ्रेंड प्रत्यक्षात अवतरते आणि सूरू होते एक भन्नाट अतिशय वेगळीच प्रेमकहाणी. ही प्रेमकहाणी नेहमीसारखी पडद्यावर साकारणारी नाहीये. पण जी साकारण्यात आलीय ती यापूर्वी तरी मराठी सिनेमात साकारली गेली नाहीये. आता ही गर्लफ्रेंड खरंच नच्याची होते का ?का नच्या आणि या गर्लफ्रेंडचा ब्रेकऑफ होतो? का नच्या कायमचा सिंगलच राहतो ? ह्याची उत्तरं तुम्हांला सिनेमा पाहूनच मिळतील. पण ती उत्तरं तुम्हांला मिळाली की तुम्हांला एकदम फ्रेश वाटेल.
सिनेमाचा लेखक आणि दिग्दर्शक उपेंद्र सिधयेला पैकीच्या पैकी मार्क आहेत. उपेंद्रने लिहिलेली कथाच मुळात भन्नाट आहेत. सिनेमातील संवाद हा या सिनेमाचा कणा आहे. मुळात उपेंद्रचा दिग्दर्शक म्हणून पहिलाच प्रयत्न आहे मात्र या सिनेमासाठी त्याने घेतलेली मेहनत आपल्याला सिनेमाच्या प्रत्येक सीनमधून नजरेस येते. बॉलिवूडमध्ये राजकुमार हिरानी ज्या पध्दतीने सिनेमा बनवतात अगदी त्याच धर्तीवर ह्या सिनेमाची तुलना केल्यास हरकत नाही. इतका हा सिनेमा सुरेख झालाय. उपेंद्रसोबत सिनेमाचे खरे स्टार आहेत अमेय वाघ आणि सई ताम्हणकर . फास्टर फेणे,मुरांबा नंतरचा हॅट्रीक करणारा अप्रतिम सिनेमा अमेयला मिळाला आहे. यात अमेयचा लूकही वेगळा आहे. दाढी वाढवलेला, वजन वाढवलेला नचिकेत अमेयने अतिशय कडक रंगवलाय. सिंगल असण्याचं दु:ख काय असतं ते सतत कॅरी करून राहणं अमेयने आपल्या अभिनयातून उत्तम दाखवलंय. गर्लफ्रेंड मिळाल्यानंतरचा अवसानघातकी आत्मविश्वास झालेला बदलही अमेयने खुमासदार पध्दतीने रंगवलाय. मुरांबा तुम्ही पाहिला असेल तर त्याच्या अगदी विरूध्द असणारा हिरोे अमेयने गर्लफे्रंडमध्ये साकारलाय. सई ताम्हणकरने तर या सिनेमात तुफान बॅटिंग केली आहे. सईने आत्तापर्यंत केलेली ही सर्वोत्तम भूमिका आहे. आलिशा नेरूरकर ही नचिकेतची गर्लफे्रंड रंगवताना धमाल केली आहे. मुळात ही गर्लफ्रेंड जरा हटके आहेत..तिच्या खास काही हटके सवयी आहेत. ज्या तुम्हांला सिनेमा पाहतानाच मजा येईल. यतिन कार्येकर,कविता लाड-मेढेकर,रसिका सुनिल,इशा केसकर, सागर देशमुख, सुयोग गोऱ्हे,उदय नेने या सर्व सहकलाकारांनी या दोघांना उत्तम साथ दिली आहे. या सिनेमातील यांच्या भूमिका जरी लहान असल्या तरी प्रत्येक पात्र अतिशय महत्वाचं आहे.
या सिनेमाची अजून एक छान मजा आहे ती या सिनेमातील ३ गाणी. क्षितीज पटवर्धनची गाणी आणि हृषीकेश-सौरभ-जसराज या संगीतकार तिकडीने अतिशय धमाल आणि श्रवणीय गाणी रचली आहेत. सर्वात महत्वाचं म्हणजे राहुल-संजीव या कोरिओग्राफर जोडीने या गाण्याचं अतिशय निराळं टेकींग केलं आहे. सध्याच्या मराठी सिनेमात अश्या प्रकारचं टेकिंग बऱ्याच दिवसांत झालेलं नाही ते टेकींग या कोरिओग्राफर जोडीने केलंय. ज्याला सिनेमेटोग्राफर मिलिंद जोग यांनी उत्तम टिपलंय. सिनेमाचं महत्वाचं अंग असतं प्रोडक्शन डिझाइनरचं अशोक लोकरे यांनी या सिनेमात छोट्या छोट्या गोष्टींचा सेटमध्ये वापर करून सिनेमात उत्तम रंग भरले आहेत. सीनमध्ये वापरल्या जाणाºया वैविध्यपूर्ण वस्तू पाहून तुम्हांलाही आनंद होईल. अनिश जोग आणि रणजीत गुगळे या निर्माता जोडीने कोणताही हात आखडता न घेतल्याने एक फ्रेश,मस्त आणि उत्तम निर्मितीमूल्य असलेला सिनेमा आपल्याला पाहायला मिळतो. आपल्याला भूक लागली असेल आणि आपण ज्या हॉटेलमध्ये जेवायला जातो तिथल्या अप्रतिम जेवणाची चव घेतल्यावर जसे आपण तृप्त होतो. तसंच हा सिनेमा पाहून तुम्ही नक्की तृप्त व्हाल. तेव्हा या गर्लफ्रेंडला भेटायला नक्कीच जायला हवं.