जान्हवी सामंत‘वन टू थ्री’, ‘सन आॅफ सरदार’ आणि ‘अतिथी तुम कब जाओगे’ यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन करणाºया अश्विनी धीर यांनी ‘गेस्ट इन लंडन’ या चित्रपटातून प्रेक्षकांची पूर्ती निराशा केली आहे. अभिनेता परेश रावल आणि कार्तिक आर्यन यांची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात अनावश्यक गोष्टींचाच अधिक पाल्हाळपणा असल्याने प्रेक्षकांची निराशा झाल्याशिवाय राहत नाही. चित्रपटाची कथा ‘लंडन’ बेस्ड आहे. ज्याठिकाणी आर्यन ग्रोवर (कार्तिक आर्यन) आणि अनाया पटेल (कृती खरबंदा) एकत्र राहतात. काही दिवसांनंतर गावाकडून काका गंगाशरण गंदोत्रा (परेश रावल) आणि काकी गुड्डी (तनवी आजमी) यांची या या दोघांमध्ये एंट्री होते. त्यानंतर या चौघांमध्ये जो ड्रामा रंगतो, त्याभोवतीच संपूर्ण कथा रेगांळत जाते. कधी मॉल, तर कधी आॅफिसमध्ये दाखविण्यात आलेले प्रसंग प्रेक्षकांच्या चेहºयावर थोडेसेही हसू उमटवत नाहीत. उलट प्रेक्षकांचा संताप झाल्याशिवाय राहत नाही. चित्रपटात पूर्व आणि पश्चिमेकडील संस्काराच्या सांगितलेल्या गोष्टी कशाचाही ताळमेळ दाखवून देत नाहीत. कारण संस्कारासारख्या विषयाला कॉमेडीचे रूप दिल्याने प्रेक्षकांना पडद्यावर हा सर्व ड्रामा बघणे जड जातो. एकूणच चित्रपटाची कथा कमकुवत तर आहेच, शिवाय दिग्दर्शकांनीही दोन तास १८ मिनिटांचा ड्रामा उगाचच ओढून ताणून दाखविल्याचे दिसून येते. वास्तविक चित्रपटाची सुरुवात काहीशी ताळमेळ साधणारी आहे. परंतु जसजशी कथा पुढे जाते, तशा चित्रपटातील कमजोर बाबी प्रकर्षाने जाणवत जातात. त्यातच परेश रावल व्यतिरिक्त या चित्रपटातील एकही पात्र भारदस्त वाटत नसल्याने, त्यांचा अभिनय बघताना प्रेक्षकांना तिकिटासाठी पैसे खर्च केल्याचे दु:ख झाल्याशिवाय राहत नाही. काही सीन्स तर असेही आहेत जे उगाचच ओढून ताणून शूट केल्याची जाणीव करून देतात. त्याशिवाय चित्रपटातील गाण्यामध्ये फारसा दम नसल्याने चित्रपट चहुबाजूने कमकुवत होत जातो. त्याचबरोबर कार्तिक आर्यन आणि कृती खरबंदा यांच्यातील रोमान्सही बेरंग करणारा असल्याने चित्रपट सर्वच पातळ्यांवर अयशस्वी होताना दिसतो. चित्रपटात अभिनेता अजय देवगण याचा कॅमिओ, परेश रावल आणि संजय मिश्रा यांची काहीशी भूमिका सोडल्यास दुसरे काहीच बघण्यासारखे नाही. वास्तविक दिग्दर्शकांनी या चित्रपटाला अजय देवगण आणि कोंकणा सेन-शर्मा स्टारर ‘अतिथी तूम कब जाओगे’ या चित्रपटासारखा कॉमेडीचा तडका लावण्याचा प्रयत्न केला. परंतु यामध्ये ते पूर्णत: अयशस्वी होताना दिसले. त्यामुळे हा चित्रपट बघितला नाही तरी चालेल.