-जान्हवी सामंत
मुदस्सर अजीज दिग्दर्शित ‘हॅपी भाग जायेगी’ या खुसखुशीत विनोदांनी भरलेल्या चित्रपटाने प्रेक्षकांचे प्रचंड मनोरंजन केले. या चित्रपटाचा सीक्वल ‘हॅपी फिर भाग जायेगी’ हा त्याहीपेक्षा एक पाऊल पुढे आहे, असे म्हटले तर ती अतिशयोक्ती होणार नाही़.पहिल्या भागात म्युझिशियन गुड्डूबरोबर (अली फजल) लग्न करण्याच्या हट्टापोटी हॅपी (डायना पेन्टी) ही बग्गासोबत (जिमी शेरगिल) लग्नाच्या मंडपातून पळून जाते. पण ती चुकून पोहोचते ती लाहोरच्या एका मंत्र्याच्या घरात/ लाहोरमध्ये हॅपी बरेच गुण उधळले, गोंधळ घालते आणि सरतेशेवटी गुड्डूसोबत तिचे लग्न होते. बग्गा बिचारा पुन्हा वधूच्या शोधात लागतो. इथून पुढे काही वर्षांनंतर ‘हॅपी फिर भाग जायेगी’ची कथा सुरू होते. अर्थात भारताचा दुसरा शेजारी चीनच्या शांघायमध्ये.
शांघायमधील या ‘चायनीज भेळ’मध्ये आणखी एक हॅपी अर्थात सोनाक्षी सिन्हाची एन्ट्री होते. ही हॅपी शांघायच्या एका युनिव्हर्सिटीत प्रोफेसरची नोकरी करण्यासाठी चीनला पोहोचली असते.पण तिचा खरा उद्देश असतो तर लग्नाच्या मंडपातून पळालेल्या तिचा पती अमनचा शोध घेणे. पहिली हॅपी अर्थात डायना पेन्टी तिचा पती गुड्डूसोबत एका म्युझिक कॉन्सर्टसाठी शांघायला आली असते. दुस-या हॅपीचे पहिली हॅपी समजून कुणीतरी अपहरण करते. पण ‘ही’ हॅपी ‘ती’ नाही म्हणून तिला शोधायला बग्गाला त्याच्या लग्नाच्या वरातीच्या घोड्यावरून किडनॅप केले जाते. पाकिस्तानचा पोलिस अधिकारी उस्मान अफरिदी (पीयुष मिश्रा) याचेही अपहरण करून त्यालाही चीनला आणले जाते. यानंतर बग्गा आणि अफरिदी चीनमध्ये हॅपीचा शोध सुरू करतात. पण त्यांना भेटते ती दुसरी हॅपी. यानंतर चित्रपटाची कथा कुठले वळण घेते, हे पाहण्यासाठी तुम्हाला चित्रपटचं पाहावा लागेल.हा दोन तासांचा चित्रपट हसून हसून पोट दुखवतो. बग्गा आणि अफरिदीच्या भारत-पाकिस्तान आणि चीनी-पंजाबी-ऊर्दू विनोदांवर पोट धरून हसताना कथेमधल्या अनेक विसंगती आपोआप नजरेआड होतात. सोनाक्षी, जिमी आणि पीयुष शर्मा या तिघांच्या वाट्याला अधिकाधिक विनोद आले आहेत. जस्सी गिल हा सुद्धा हलक्याफुलक्या विनोदांनी या तिघांना सोबत करतो. चित्रपटात अली फजल आणि डायना पेन्टी यांच्या वाट्याला फार काम नाही.
चित्रपटाच्या पहिल्या २० मिनिटांतच पहिल्या हॅपीची जागा दुसरी हॅपी घेते. चित्रपटात बग्गा अर्थात जिमी शेरगिल सर्वाधिक भाव खावून जातो. त्याचा प्रेमभंग, त्याची निराशा, त्याचा प्रामाणिकपणा, त्याचे विनोद या सगळ्यांतून दिग्दर्शकाने त्याचे पात्र अगदी मस्त खुलवले आहे. इतके की, भग्गाबद्दलची सहानुभूती आणि प्रेमभंगावर केंद्रीत या चित्रपटाचे आणखी दोन तीन सीक्वल सहज काढता येतील. जिमी शेरगिलने बग्गा ही व्यक्तिरेखा साकारताना अप्रतिम अभिनय केला आहे. त्याचा अभिनय पाहून त्याच्यातील प्रतिभेची खोली जाणवते. पण या चित्रपटाचा खरा हिरो आहे तो ही पटकथा लिहिणारा आणि ती पडद्यावर दिग्दर्शित करणारा मुदस्सर अजीज. ज्वलंत राजकीय इतिहास लाभलेल्या आणि वेगळेच सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक संदर्भ असलेल्या भारत-पाकिस्तान-चीन सारख्या देशाच्या पार्श्वभूमीला एकमेकांच्या संस्कृतीला जराही धक्का न लागू देता इतकी प्रेमळ कथा फुलवण्याचे कौशल्य मुदस्सर अजीजने साधले आहे. त्याचे कौतुक करावे तितके कमीच. निखळ विनोद आणि मनोजरंजन यांची ही ‘चायनीज भेळ’ अशी काही लज्जतदार आहे की त्याची मज्जा घ्यायलाचं हवी.