जितेंद्र कुमार
बहुचर्चित ‘हेलिकॉप्टर ईला’ या हिंदी चित्रपटाचे शक्तीस्थान म्हणजे बॉलिवूडची दमदार अभिनेत्री काजोल आणि उत्कृष्ट दिग्दर्शक प्रदीप सरकार. या चित्रपटातून काजोल कमबॅक करणार अशी जोरदार चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली होती. प्रेक्षकांनाही या चित्रपटाच्या प्रदर्शनाची आस लागली होती. दिग्दर्शक प्रदीप सरकार यांनी आनंद गांधी यांच्या ‘बेटा कागडो’ या प्रसिद्ध गुजराती नाटकावर आधारित ‘हेलिकॉप्टर ईला’ हा चित्रपट बनवला. आई आणि मुलगा यांच्या सुंदर नात्यावर आधारित अशी ही भावुक कथा आहे.
या चित्रपटाची कथा ईला (काजोल) पासून सुरू होते. ती पतीच्या निधनानंतर मुलगा विवान (रिद्धी सेन) याचे पालणपोषण करून त्याला वाढवते. ईला तिच्या काळातील गायिका म्हणून प्रसिद्ध होती, परंतु तिने लग्नानंतर करिअर सोडून मुलाच्या पालणपोषणावर विशेष लक्ष दिले. दरम्यान, आईला कायम घरी बघून विवानने तिला पुढील शिक्षण घेण्याबद्दल सांगितले. त्या विचारात ईला विवानच्याच कॉलेजमध्ये अॅडमिशन घेते. ईलाचे लक्ष ठेवणे, तो काय करतो? हे पाहणे यामुळे विवान परेशान होतो. परंतु, जेव्हा ईलाचा पती तिच्या आणि तिच्या मुलाच्या आयुष्यात परततो तेव्हा काय होते? ईला-विवान त्याला पुन्हा स्विकारतात का? हे पडद्यावरच पाहणे उत्तम.
चित्रपटाची कथा सामान्य असून देखील त्याचे सादरीकरण उत्तमप्रकारे केलेले असल्याने प्रेक्षक जास्त प्रभावित होतात. दिग्दर्शकाने चित्रपटाला कौटुंबिक वातावरणाचा स्पर्श केल्याने तो अधिक जवळचा वाटतो. आई-मुलगा यांच्या नात्यातील काही क्षण असे आहेत की प्रेक्षकांनाही त्यांच्या बालपणात डोकावायला भाग पाडतील. चित्रपटात नव्वदीच्या दशकातील गाण्यांचा फ्लेव्हर अनुभवायला मिळणार आहे. रिद्धी सेनने मुलाचे उत्तम काम केले आहे. तसेच काजोलने एक पत्नी आणि आई यांची उत्कृष्ट भूमिका वठवली आहे. नोकरदार महिलांना काजोलची ही व्यक्ति रेखा खूप जवळची वाटेल. चित्रपटात अनु मलिक, अमिताभ बच्चन, शान, महेश भट्ट, इला अरूण, गणेश आचार्य यांनी केमिओ देखील केला आहे. एकंदरित काय, चित्रपट ‘पैसा वसूल’ करणारा आहे, असे म्हणायला हरकत नाही.