प्राजक्ता चिटणीसआपल्या व्यंगामुळे लोकांनी आपल्याकडे सहानभूतीने पाहू नये, अंध व्यक्तीला देखील सामान्य व्यक्तीप्रमाणे जगण्याचा हक्क आहे असे मानणाऱ्या एका मुलाची कथा असेही एकदा व्हावे या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळते. आजच्या चित्रपटांपेक्षा एक वेगळी प्रेमकथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. सिद्धार्थ (उमेश कामत) हा एका मोठ्या कंपनीचा मालक असतो. तो आणि त्याची बहीण रेवती (शर्वणी पिल्लई) मिळून सगळा व्यवसाय सांभाळत असते. पण कंपनीच्या लोकांव्यक्तरिक्त सिद्धार्थ इतर लोकांच्या समोर येणे टाळत असतो. त्यामुळे कंपनीच्या कोणत्याही पदावर देखील तो नसतो. सिद्धार्थला रेडिओवर आरजे किरणचा (तेजश्री प्रधान) कार्यक्रम ऐकायला खूप आवडत असतो. तिच्या तो आवाजाच्या, बोलण्याच्या प्रेमात पडलेला असतो. त्यामुळे त्याच्या कंपनीच्या एका प्रोजेक्टसाठी तो तिच्या रेडिओ वाहिनीची आणि तिची निवड करतो. त्या दोघांच्या पहिल्याच भेटीत किरणला देखील तो आवडतो. त्याच्या विचारांच्या, दिसण्याच्या ती प्रेमात पडते. तो अंध असल्याचे तिला पहिल्या भेटीत कळत देखील नाही. पण काहीच दिवसांत ही गोष्ट तिच्या लक्षात येते. त्यानंतर किरण आणि सिद्धार्थच्या प्रेमकथेचे पुढे काय होते, ते आयुष्यभरासाठी एकत्र येतात का या प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना हा चित्रपट पाहिल्यानंतरच मिळतील. चित्रपटाच्या सुरुवातीची काही मिनिटे ही केवळ काही ब्रँडचे प्रमोशन करण्यातच घालवली असल्याचे वाटते. त्यामुळे सुरुवातीला चित्रपट काहीसा कंटाळवाणा होतो. पण त्यानंतर चित्रपटाची कथा चांगलीच पकड घेते. चित्रपटाचा शेवट काय असणार याची आपल्याला सुरुवातीलाच कल्पना येत असली तरी दिग्दर्शक सुश्रुत भागवतने कथा खूपच चांगल्यारितीने मांडली आहे. सिद्धार्थच्या व्यक्तिरेखेत उमेश भाव खावून गेला आहे. चित्रपटातील कविता वैभव जोशीने प्रसंगानुसार खूपच चांगल्या लिहिल्या आहेत आणि उमेशच्या आवाजामुळे तर या कवितांना एक वेगळीच उंची मिळाली आहे. उमेशच्या आवाजात या कविता ऐकायला खूपच छान वाटतात. असेही एकदा व्हावे या चित्रपटाची कथा चांगली आहे. पण किरणच्या आई-वडिलांमध्ये मतभेद का दाखवले आहेत किंवा त्यांच्यातील मतभेद कोणत्या कारणांनी आहेत हे कथेत स्पष्ट केले नसल्याने ते कथेच उगाचच टाकल्यासारखे वाटतात. या चित्रपटात तेजश्रीने एका आरजेची भूमिका साकारली आहे. सुरुवातीला स्टुडिओतील दृश्यात तेजश्री तितकीशी कम्फर्टेबल वाटत नाही. पण त्यानंतरची उमेश, कविता लाड यांच्यासोबत असलेली तिची दृश्यं मस्त जमून आलेली आहेत. सिद्धार्थवर प्रचंड प्रेम करणारी किरण तेजश्रीने तिच्या अभिनयातून खूपच चांगल्याप्रकारे साकारली आहे. रेवती ही व्यक्तिरेखा चित्रपटात महत्त्वाची असली तरी शर्वणीने ती तितकी ताकदीने पेललेली नाहीये. चिराग पाटील, निखिल राजेशिर्के, कविता लाड यांच्या भूमिका इतरांच्या तुलनेत लहान असल्या तरी हे कलाकार नक्कीच लक्षात राहातात. संपूर्ण चित्रपटात एका ब्रँडचे प्रमोशन करण्यात आले आहे. पण अनेकवेळा या गोष्टीचा अतिरेक केल्यासारखा वाटतो. असेही एकदा व्हावे या चित्रपटातील गाणी मनाला नक्कीच भावतात. या गाण्यांसाठी अवधूत गुप्ते, अद्वैत पटवर्धन यांना दाद दिलीच पाहिजे. संजय मोने यांनी चित्रपटाचे संवाद देखील मस्त लिहिले आहेत. पण आरजे म्हटले की, त्या आरजेनी मराठीमिश्रीत हिंदी बोललेच पाहिजे का असा प्रश्न चित्रपट पाहिल्यानंतर नक्कीच पडतो. कारण आरजे म्हणून लोकांशी गप्पा मारताना किरणच्या संवादात अनेक हिंदी वाक्य उगाचच घुसवण्यात आलेली आहेत. एकंदर असेही एकदा व्हावे हा चित्रपट आपली निराशा करत नाही.
Asehi ekda vhave review : एक डोळस प्रेमकथा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2018 6:19 AM