जान्हवी सामंतशीर्षक आणि पोस्टर यावरून जरी चित्रपट कंटाळवाणा वाटला तरी ‘होप और हम’ एक हलकाफुलका मनोरंजन करणारा चित्रपट आहे. श्रीवास्तव कुटुंबाच्याभोवती या चित्रपटाची कथा फिरते. नागेश श्रीवास्तव (नसीरूद्दीन शाह) यांचा आपल्या एकट्या वृद्धापकाळात आपल्या ‘सोन्नेकन’ नावाच्या एका जुन्या मोडक्या फोटोकॉपींग मशीनमध्ये जीव अडकलेला असतो. त्या मशीनशी त्यांचे रोज संवाद चालू असतात. परंतु, फोटोकॉपींगचे काम ठीक होत नसते आणि दुकानात आलेले गिऱ्हाईक त्यांच्याशी रोज भांडण करत असतात. त्यांचा मुलगा (आमिर बशीर) खुप वर्ष एका प्रमोशनसाठी मन लावून बसलेला असतो आणि त्याचा मुलगा अनु (कबीर साजिद) याला क्रिकेटर बनायचे असते. त्याशिवाय त्यांच्या सुनेला फोटोकॉपिंग मशीन भंगारमध्ये विकून आपल्या किशोरवयीन मुलींसाठी वेगळी खोली तयार करून घ्यायची असते. असे असताना देखील त्यांचे कौटुंबिक जीवन प्रेमळ वातावरणात सुरू असते. या कथानकात पुढे श्रीवास्तव यांचा अविवाहित मुलगा दुबईहून वडिलांसाठी मॉडर्न फोटोकॉपी मशिन घेऊन येतो आणि टॅक्सीमध्ये त्याचा स्वत:चा मोबाईल फोन विसरतो. परंपरा विरूद्ध आधुनिकता, जुने आणि नवीन, कष्ट आणि सोयीस्करपणा यातील संघर्ष म्हणजेच ‘होप और हम’चा गाभा आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक सुदीप बंडोपाध्याय यांनी श्रीवास्तव कुटुंबातील संघर्ष हे प्रत्येक घरात होतात तसेच मांडले आहेत. त्याशिवाय कुटुंबातील नात्यांचे बारकावे खुप छान पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला आहे. कलाकारांचे परफॉर्मन्सेस उत्कृष्ट झाले आहेत आणि प्रत्येक भूमिका प्रेमाने रेखाटलेली आहे. बऱ्याच दिवसांनी नसिरूद्दीन शाह यांना एका चांगला भूमिकेत बघायला मिळते. अनुचा रोल केलेला चुणचुणीत कबीर साजिद हा देखील चार्मिंग वाटतो. कथा थोडीशी निरर्थक असली तरीही चित्रपट मनोरंजन करतो. माणसांवर प्रेम करा, मशीनवर नाही, असा संदेश देणारा एक हलकाफुलका कौटुंबिक जिव्हाळयाचा चित्रपट म्हणजे ‘होप और हम’.