राज चिंचणकर आयुष्यात दुःखाचा अध्याय येऊन गेल्यानंतरच खऱ्या सुखाची जाणीव होते; हा धागा पकडत 'हृदयांतर' या चित्रपटाची गोष्ट हृदयाचा ठाव घेते. मन हेलावून टाकणाऱ्या या गोष्टीत फार वेगळेपणा नसला, तरी एक 'फॅमिली पॅकेज' या चित्रपटाने दिले आहे. पापण्यांच्या कडा ओलावण्याचे सामर्थ्य या गोष्टीत आहे आणि त्या पाऊलवाटेवर चालत हा चित्रपट संवेदनशील मनाला चिंब करून टाकतो.
हॉटेल इंडस्ट्रीमधले मोठे नाव असलेला शेखर, जाहिरात कंपनीत क्रिएटिव्ह हेड असणारी त्याची पत्नी समायरा आणि त्यांच्या नित्या व नायशा या दोन मुली असे हे सुखवस्तू कुटुंब आहे. परंतु लग्नाला १२ वर्षे उलटून गेल्यावर शेखर व समायरा यांच्यात आता साचलेपण आले आहे. साहजिकच, एकमेकांच्या चुका त्या दोघांना प्रकर्षाने दिसू लागल्या आहेत आणि ते दोघे विभक्त होण्याच्या निर्णयावर आले आहे. पण हे घडण्यापूर्वीच त्यांच्या कुटुंबात अनपेक्षितपणे अशी एक घटना घडते की काही काळ त्यांना या निर्णयाकडे दुर्लक्ष करणे भाग पडते आणि इथूनच खरी या गोष्टीला सुरुवात होते.
कुटुंबातल्या चार व्यक्तींभोवती ही गोष्ट फिरवण्याचे काम दिग्दर्शक विक्रम फडणीस यांनी केले आहे. त्यांनीच लिहिलेल्या मूळ कथेवर, त्यांच्यासह सौरभ भावे यांनी पटकथा बांधली आहे. ही गोष्ट प्रभावीपणे पुढे नेण्यासाठी रोहिणी निनावे यांनी संवाद रचना केली आहे. या मंडळींची भट्टी चांगली जुळून आली आहे. नातेसंबंध, भावभावना, संवेदनशीलता आदी गुणधर्मांची एकत्र मोट बांधून हृदय पिळवटून टाकण्याचे त्यांनी काम केले आहे. साहजिकच, यात दुःखाची मात्रा जास्त आहे. परंतु, या गोष्टीत तसे नावीन्य नाही आणि पुढे काय होणार याचा अंदाजही अजिबात चुकत नाही. तसेच चित्रपटाची लांबीही नाहक वाढल्याचे जाणवते. त्याला कात्री लागायला हवी होती. पण असे असले, तरी या गोष्टीत गुंतवून ठेवण्यासाठी या मंडळींनी घेतलेले परिश्रम मात्र सत्कारणी लागले आहेत.
ताकदीचा अभिनय ही या चित्रपटाची गरज आहे आणि त्या कसोटीवर यातले कलावंत चोख उतरले आहेत. सुबोध भावे (शेखर) व मुक्ता बर्वे (समायरा) या दोघांनी प्रमुख व्यक्तिरेखांमध्ये उत्तम रंग भरले आहेत. विशेष कौतुक करावे लागेल, ते यात नित्या साकारणाऱ्या तृष्णिका शिंदे हिचे! यात तिच्या जीवनात घडणाऱ्या स्थित्यंतराचे विविध आयाम तिने छान दर्शवले आहेत. निशिता वैद्य हिने यात नायशा साकारताना बालसुलभ रंग भरले आहेत. सोनाली खरे-आनंद हिने सुद्धा लक्षवेधी कामगिरी केली आहे. मीना नाईक, अमित खेडेकरही लक्षात राहतात. हृतिक रोशन व श्यामक दावर यांचे अल्पकाळासाठी दर्शनही यात घडले आहे. भावनांचा खेळ मांडणारा व थेट हृदयाला हात घालणारा हा चित्रपट आहे आणि नातेसंबंधांवरचे भाष्य या चित्रपटाने ठोसपणे मांडले आहे.