Join us

प्रेमाच्या 'साक्षीदारां'ची गुलाबी लव्हस्टोरी, कसा आहे 'इलू इलू १९९८' सिनेमा वाचा Review

By संजय घावरे | Updated: January 31, 2025 14:54 IST

पौगंडावस्थेतील प्रेमकथा आणि पन्नाशीतील एकतर्फी प्रेम अशा दुहेरी ट्रॅकवर आधारलेला हा चित्रपट शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देणारा आहे.

Release Date: January 31, 2025Language: मराठी
Cast: एली आवराम, निशांत भावसार, श्रीकांत यादव, वीणा जामकर, आरोह वेलणकर, वनिता खरात, मीरा जगन्नाथ, कमलाकर सातपुते, आनंदा कारेकर, अंकिता लांडे, गौरव कलुस्ते, यश सणस, सोहम काळोखे, आर्या काकडे, सिद्धेश लिंगायत
Producer: बाळासाहेब फाळके, हिंदवी फाळकेDirector: अजिंक्य फाळके
Duration: १ तास ५४ मिनिटेGenre:
लोकमत रेटिंग्स

मागील १२ वर्षांपासून हिंदीसह कन्नड, तमिळ, इंग्रजी चित्रपटांमध्ये सक्रिय असलेल्या एली आवरामची मराठीत एन्ट्री हे प्रथमच दिग्दर्शन करणाऱ्या अजिंक्य फाळकेच्या या चित्रपटाचे मुख्य आकर्षण आहे. 

कथानक - कथा स. दा. लेले प्रशालेत शिकणाऱ्या अनिकेतची आहे. त्याच्या शाळेत इंग्रजी शिकवण्यासाठी देखण्या शिक्षीका मिस पिंटो येतात. सर्वच पिंटोच्या सौंदर्यावर फिदा होतात. अनिकेतचा स्वभाव पिंटो मॅडमला आवडतो. अनिकेत त्यांचे सुरेख चित्रही काढतो. एक प्रकारे अनिकेत त्यांच्या प्रेमातच पडतो. इकडे अनिकेतच्या चाळसदृश वाड्यात हेमा नावाची एक स्त्री राहायला येते, जी अनिकेतच्या वडील मिलिंदच्या बहिणीची बालपणीची मैत्रीण असते. मिलिंद-हेमामध्येही जवळीक निर्माण होते. त्यानंतर काय घडते ते चित्रपटात आहे. 

लेखन-दिग्दर्शन - विषयात तसे नावीन्य नाही. काही विनोदी प्रसंग छान गुंफले असून, विनोदी संवाद चेहऱ्यावर हास्य फुलवणारे आहेत. बोलीभाषा आणि उच्चारांवर बारकाईने लक्ष दिले आहे. पटकथेची बांधणी साधी आहे. काही ठिकाणी अगोदरच अंदाज लावता येतो. सुरुवातीपासूनच चित्रपटाची गती संथ आहे. वयात येणाऱ्या मुलांचा शिक्षकांवर जीव जडणे ही गोष्ट नवीन नसली तरी या चित्रपटाद्वारे सुरेख संदेश देण्यात आला आहे. कुठेही थिल्लरपणा नसला तरी चित्रपट उत्कंठावर्धक बनवण्यासाठी आणखी मेहनत घेण्याची गरज होती. कलादिग्दर्शन आणि सिनेमॅटोग्राफी छान आहे. १९९८मधील वेशभूषा आणि रंगभूषेकडे लक्ष देण्याची गरज होती. गीत-संगीत सुमधूर आहे.

अभिनय - मुख्य आकर्षण असलेल्या अली आवरामने आपल्या व्यक्तिरेखेला न्याय दिला असून, मराठी उच्चारांसाठी घेतलेली मेहनत जाणवते. एखादी स्वीडन अभिनेत्री मराठीत काम करतेय असे कुठेही जाणवत नाही. अनिकेतच्या भूमिकेत निशांत भावसारने खूप छान रंग भरले आहेत. श्रीकांत यादव यांनी साकारलेले कॅरेक्टर त्यांच्या वयातील पुरुषांचे प्रतिनिधी करणारे आहे. आरोह वेलणकरची भूमिका फार छोटी आहे. वनिता खरात, मीरा जगन्नाथ, कमलाकर सातपुते, अंकिता लांडे, आनंदा कारेकर, वीणा जामकर यांनी योग्य साथ दिली आहे.

सकारात्मक बाजू : पटकथा, संवाद, दिग्दर्शन, अभिनय, गीत-संगीत, कला दिग्दर्शन

नकारात्मक बाजू : वेशभूषा, रंगभूषा, गती

थोडक्यात काय तर मोकळा वेळ असेल आणि शाळेतील गंमतीजंमतींच्या विश्वात रममाण व्हायचे असल्यास हा चित्रपट पाहायला हवा.