प्राजक्ता चिटणीसइंदू सरकार या नावानेच या चित्रपटाविषयी कल्पना येते. भारतातील एका राजकीय कुटुंबावर या चित्रपटाद्वारे भाष्य करण्यात आले आहे हे या चित्रपटाच्या ट्रेलरमधूनच प्रेक्षकांना कळले होते. हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये यासाठी देखील अनेक प्रयत्न करण्यात आले होते. पण तरीही हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या चित्रपटात कोणाचेही नाव न घेता केवळ व्यक्तिरेखांच्या रंगभूषेद्वारे चित्रपटातील पात्रे प्रेक्षकांसमोर मांडण्यात आली आहेत.चित्रपटाची सुरुवात हीच अंगावर काटा आणणारी आहे. पुरुषांनी नसबंदी करायलाच पाहिजे यासाठी त्यांच्यावर पोलिस लाठीचार्ज करताना दिसतात. अगदी १३ वर्षांपासून ते ७० वर्षांपर्यंतच्या पुरुषांवर ते नाहक अत्याचार करतात. या पहिल्याच दृश्यापासूनच आणीबाणीचा काळ दिग्दर्शकाने प्रेक्षकांसमोर मांडला आहे. याच इर्मजन्सीमुळे एका सामान्य मुलीचे बदलेले आयुष्य इंदू सरकारमध्ये पाहायला मिळते.इंदू सरकार (किर्ती कुल्हारी) ही एक अनाथ मुलगी. बोलण्यात ती अडखळत असल्याने तिच्यात आत्मविश्वास नसतो. तिचे लग्न नवीन सरकारशी होते. नवीन (टाटा रॉय चौधरी) हा प्रशासकीय अधिकारी असतो. तसेच एका नेत्याचा तो उजवा हात असतो. त्यामुळे इंदूला पैशांची कधीच कमतरता नसते. देशात आणीबाणी असली तरी त्याचा काहीही परिणाम तिच्या आयुष्यावर नसतो. उलट नवीन मंत्र्यांच्या जवळचा असल्याने त्याला त्याच्या कामाचा चांगलाच मोबदला मिळत असतो. अनधिकृत जागेवर बांधलेली झोपडपट्टी तोडून तिथे फाईव्ह स्टार हॉटेल बांधण्याचा काही नेते, पोलिस आणि बिल्डर यांचा डाव असतो. नेत्यांना त्यांच्या चीफ (नील नितीन मुकेश)ने झोपडपट्टया पाडून तिथे बिल्डिंग बांधण्याचे आदेश दिलेले असतात. झोपडपट्टीमधील लोकांवर लाठीचार्ज, गोळीबार करून त्यांची घरे तोडली जातात. यात अनेकांना त्यांचा जीव गमवावा लागतो. ही घटना घडत असताना इंदू तिथून जात असते. ती तेथील दोन लहान मुलांचा जीव वाचवते आणि त्यांना घरी आणते. पण ही गोष्ट नवीनला आवडत नाही आणि त्यातून त्यांचे खटके उडतात. तो तिला मुलांच्या आईवडिलांना शोधण्यासाठी काही दिवसांचा अवधी देतो. इंदू त्या मुलांच्या आईवडिलांचा शोध घेण्याचे ठरवते. त्याचवेळी तिची ओळख एका स्त्रीसोबत (शीबा चड़्डा) होते. पण त्या मुलांचे आई-वडील जिवंत नाहीत हे इंदूला कळल्यावर ती त्या मुलांचा सांभाळ करायचा ठरवते. त्यावर नवीन त्याला विरोध करतो आणि इंदू तिचे घर सोडून त्या मुलांसोबत शीबाच्या घरी राहू लागते. पण त्या मुलांचे आईवडील नक्षलवादी होते असे सांगत पोलिस त्या मुलांचा ताबा घेतात. शिबा ही आणीबाणीच्या विरोधात असते आणि ती एका चळवळीशी जोडलेली असते. या चळवळीचे प्रमुख नाना (अनुपम खेर) असतात. या चळवळीत इंदूदेखील सामील होते आणि आणीबाणीविरोधात अनेक आंदोलनं करते. इथून तिच्या आयुष्याचा एक नवा प्रवास सुरू होतो.मधुर भांडारकरने इंदू सरकार या चित्रपटाची मांडणी खूपच चांगल्याप्रकारे केली आहे. यासाठी त्याचे नक्कीच कौतुक केले पाहिजे. किर्ती कुल्हारी, शीबा चड्डा, अनुपम खेर यांनी चांगला अभिनय केला आहे. पण चित्रपटात खरा भाव नील नितीन मुकेश आणि टाटा रॉय चौधरी खावून जातो. नीलने देहबोली, संवाद या सगळ्यातून एक सशक्त व्यक्तिरेखा उभी केली आहे. विक्रम गायकवाडने नील नितीन मुकेश आणि सुप्रिया विनोद या दोघांचा मेकअप उत्तम केला आहे. त्याचसोबत या चित्रपटातील संवादांसाठी संजय छेलला दाद द्यायलाच पाहिजे. इर्मजन्सी में इमोशन नही मेरे ऑडर्स चलते है, भारत की एक बेटी ने देश को बंदी बनाया हुआ है तुम वो बेटी बनो जो देश को मुक्ती का मार्ग दिखा सके, अब इस देश में गांधी के मायने बदल चुके है, तुम लोग तो माँ-बेटे की गुलामी ही करो, तुम लोग तो माँ के पल्लू से लटके रहेते हो यांसारखे संवाद नक्कीच प्रेक्षकांच्या टाळ्या घेऊन जातात.आणीबाणीमध्ये सामान्य लोकांना कोणकोणत्या परिस्थितीचा सामना करावा लागला हे खूपच चांगल्या पद्धतीने चित्रपटात मांडले आहे. केवळ चित्रपट पाहाताना काही वेळा तो खूपच संथ वाटतो. तसेच काही दृश्य उगाचच चित्रपटात टाकल्यासारखे वाटतात. चित्रपटाची लांबीदेखील काहीशी जास्तच वाटते. तसेच गाणी चित्रपटात उगाचच आणि कोणत्याही दृश्यानंतर मध्येच टाकण्यात आली आहेत. पण तरीही एकंदरीत इंदू सरकार पाहायला हरकत नाही