फसलेला ‘इरादा’!जान्हवी सामंतज्येष्ठ अभिनेते नसीरूद्दीन शहा आणि अर्शद वारसी यांचा ‘इरादा’ हा सिनेमा आज(१७ फेबु्रवारी) रिलीज झाला. अनेकदा स्टारकास्ट बघून चित्रपट बघितले जातात. चित्रपटाची स्टारकास्ट चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण करते. ‘इरादा’बद्दलही असेच काही म्हणता येईल. नसीरूद्दीन शहा यांच्या सारखा मुरलेला ज्येष्ठ अभिनेता आणि त्याच तोडीचा मुरब्बी हिरो अर्शद वारसी लीड रोलमध्ये आहे, म्हटल्यानंतर चित्रपटाबद्दलच्या अपेक्षा आपसूक वाढतात. पण या अपेक्षेवर ‘इरादा’ उणा ठरतो.चित्रपटाची कथा एका केमिकल कंपनीची आहे. या कंपनीतील विषारी वायूंनी प्रदूषित झालेले पाणी रिव्हर्स बोरिंगद्वारे जमिनीच्या भूगर्भात सोडले जाते. परिणामी लोक कर्करोगाला बळी पडतात. रिटायर्ड आर्मी आॅफिसर परबजीत वालिया(नसीरूद्दीन शहा)ची मुलगी रिया(रूमान मोल्ला) ही सुद्धा कर्करोगाची शिकार ठरते. या कंपनीत अचानक स्फोट होतो. यानंतर याठिकाणी चौकशीसाठी येतो तो एनआयए आॅफिसर अर्जुन मिश्रा. या चौकशीदरम्यान अनेक धक्कादायक खुलासे होतात. याच भोवती चित्रपटाची कथा फिरते. चित्रपटाचा विषय अतिशय वेगळा असला आणि चित्रपटाचा ‘इरादा’ही ‘नेक’ असला तरी चित्रपटाची मांडणी मात्र निराशा करते. संथपणे पुढे सरकरणारी पटकथा आणि तेवढेच संथ आणि कंटाळवाणे संवाद यामुळे एका चांगल्या विषयाचे ‘खोबरे’ झाल्याचा फिल सरतेशेवटी येतो.केमिकल कंपनीतील स्फोटाच्या तपासाची जबाबदारी एनआयए अधिकारी अर्जुन मिश्रा(अर्शद वारसी) याच्या खांद्यावर सोपवली जाते. याच चौकशीदरम्यान कथेत परबजीत वालिया आणि महिला पत्रकार अर्थात सागरिका घाटगे यांची एन्ट्री होते. या चौकशीच्या अंगाने चित्रपट पुढे सरकरतो.कंपनीतून बाहेर पडणारी विषारी तत्त्वे आणि त्यामुळे वाढलेला कर्करोगाचा धोका, खरे तर हा एक गंभीर विषय. असा गंभीर व रिअॅलिस्टिक विषय मांडणाºया चित्रपटाकडून फारशा मनोरंजनाची अपेक्षा करता येणार नाही. पण पारंपरिक ‘मसाला’ नसला तरी चित्रपटाचे संवाद, पटकथेची मांडणी या जोरावर चित्रपट पेलल्या जाऊ शकतो. अशा चित्रपटांना एक खास प्रेक्षकवर्ग असतो. पण ‘इरादा’ याबाबतीत पुरती निराशा करतो. चित्रपटाच्या कथेची मांडणी, चित्रपटातील संवाद सगळेच कंटाळवाणे वाटतात. खरे तर नसीरूद्दीन शहा आणि अर्शद वारसी यांची अनेक प्रसंगी उडणारी खडाजंगी वा संवाद अधिक चटपटीत करता आलेअसते. पण तसे न होता हे सीन्स फक्तच चित्रपटाची लांबी वाढवतांना दिसतात.थोडक्यात सांगायचे तर उत्सुकता वाढवणारी स्टारकास्ट, उत्सुकता वाढवणारी कथा असूनही ‘इरादा’ तुमची उत्सुकता वाढवत नाही आणि मग सगळा ‘इरादा’च फसतो.
Irada movie review : इरादा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2017 10:27 AM