झांगडगुत्ता या चित्रपटात प्रेक्षकांना एका गावाची गोष्ट पाहायला मिळते. हे गाव अगदी छोटेसे असल्याने या गावातील सगळीच मंडळी एकमेकांना ओळखतात, एकमेकांच्या सुख, दुःखात सहभागी होतात. याच गावातील एका मुलीच्या लग्नाची कथा मनोरंजकरित्या या चित्रपटात मांडण्यात आलेली आहे.
विदर्भातील एका गावातील ही मजेशीर गोष्ट आहे. अण्णांना (जयंत सावरकर) गावातील सगळे गावकरी प्रचंड मानत असतात. या गावातील दत्तू पोस्टमन (संजय खापरे) सगळ्यांनाच मदत करत असतो. या गावातील एका मुलीचे काही केल्या लग्न ठरत नसते. त्यामुळे तिचे लग्न करण्याची जबाबदारी संपूर्ण गाव उचलते. अण्णा आणि गावातील काही मंडळी मिळून तिच्यासाठी नाम्या (सागर कारंडे) या मुलाची निवड करतात. नाम्या हा थोडासा वेडसर असतो. नाम्या लग्नाला तयार असला तरी त्याची आई (किशोरी शहाणे वीज) हुंड्ड्यात एक बाईक आणि आणखी काही गोष्टी मागते. केवळ या कारणामुळे लग्न मोडू नये यासाठी अण्णा बाईक आणि त्या गोष्टी देण्यासाठी तयार होतात. अण्णांनी बाईक देण्यास होकार दिल्याने लग्नाची तयारी देखील सुरू होते. लग्नासाठी संपूर्ण वऱ्हाड गावात येते. पण लग्नाच्या दिवशीच अण्णांचे निधन होते. अण्णांच्या निधनानंतर पुढे काय काय होते, त्या मुलीचे लग्न होते का या प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना झांगडगुत्ता हा चित्रपट पाहिल्यावरच मिळतील.
झांगडगुत्ता चित्रपटाची कथा चांगली असली तरी दिग्दर्शकाला कथा तितकीशी चांगल्याप्रकारे मांडता आली नाहीये. चित्रपटात किशोरी शहाणे-वीज, जयंत सावरकर, संजय खापरे, भारत गणेशपुरे, सागर कारंडे, नागेश भोसले, जयंत वाडकर, विजय कदम यांसारखे चांगले अभिनेते असले तरी हा चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात अपयशी ठरला आहे. इतर चित्रपटात दमदार अभिनय करणारे हे कलाकार या चित्रपटात तितक्या सहजतेने अभिनय करत नसल्याचे चित्रपट पाहाताना जाणवते. चित्रपटात विदर्भाची भाषा काही ठिकाणी वापरण्यात आलेली आहे. पण ही भाषा वापरताना तीच तीच वाक्य पुन्हा पुन्हा चित्रपटात टाकली असल्यासारखे जाणवते. तसेच चित्रपटाच्या कथेत मध्यांतरानंतर अनेक गोष्टी उगाचच घुसवण्यात आल्या आहेत. यामुळे चित्रपटात काय सुरू आहे हेच अनेक वेळा कळत नाही. चित्रपटाची सिनेमेटोग्राफी चांगली आहे. तसेच चित्रपटातील काही प्रसंग चांगले जमून आले आहे. पण असे असले तरी चित्रपट प्रेक्षकांना खळखळून हसवण्यात अयशस्वी ठरतो.