कोणत्याही मुलासाठी त्याचे वडील स्टार म्हणजेच ताऱ्यापेक्षा कमी नसतात. मुलगा मोठा झाला की तो तारा बनतो आणि त्याचे वडील 'महा'तारा बनतात. या चित्रपटातही अशाच एका 'महा'ताऱ्याची खिळवून ठेवणारी गोष्ट महेश मांजरेकरांनी कथा, पटकथा, संवादलेखन, दिग्दर्शन, अभिनय आणि गायन अशी बहुआयामी भूमिका बजावत सादर केली आहे.
कथानक : ज्येष्ठ नागरिक गोविंद पाठक यांची ही कथा आहे. त्यांच्या आयएएस आॅफिसर असलेला मुलगा अभयचं लग्न अवनी नावाच्या श्रीमंत तरुणीशी झालेलं असतं. मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिवपदी अभयची नियुक्ती असते. अभयने वडीलांच्या निवृत्तीचे पैसे त्यांच्या भविष्याच्या तरतूदीसाठी गुंतवलेले असतात आणि त्यांच्या बँक खात्याचे व्यवहारही तोच बघत असतो. त्यामुळे गोविंद यांना वारंवार अभयकडे पैसे मागावे लागतात. एक दिवस अभयच्या आईचं आजारपण वाढतं. गोविंद अभयला फोन करतात, सूनेकडे मेसेज देतात, पण अभय वाढदिवसाच्या पार्टीत व्यग्र असतो. दुसऱ्या दिवशी अभय आई-वडीलांकडे येतो, पण तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो.
लेखन-दिग्दर्शन : मांजरेकरांनी या चित्रपटाद्वारे ज्येष्ठ नागरिकांचं जगणं सादर करत अगदी मर्मावर बोट ठेवलं आहे. लेखनापासून अभिनयापर्यंत संपूर्ण जबाबदारी स्वत:च्या खांद्यावर घेत चित्रपट एका वेगळ्याच उंचीवर नेला आहे. काही संवाद मार्मिक, तर काही हसवणारे आहेत. मध्यंतरापूर्वीचा भाग उत्कंठावर्धक आहे. मध्यंतरानंतर कथानकात खूप उलथापालथ होते आणि चित्रपट थोडासा रेंगाळल्यासारखा वाटतो, पण पुन्हा ट्रॅकवर येतो. काही ठिकाणी कंठ दाटतो आणि डोळ्यांत पाणीही येतं. कोर्ट रूम ड्रामा छान झाला आहे. प्रत्येक गोष्टीची तपशीलवार माहिती देताना आणि स्वत:च्या मुलावर ४,७२,८६,१०० रुपयांचा दावा ठोकणारे वडील कुठेही अवास्तव मागणी करत नाहीत. सुरुवातीपासून शेवटपर्यंत टेपने चिकटवलेला तुटका चष्मा दाखवणं थोडं अती वाटतं. काही गोष्टी पटत नाहीत. कलाकारांची निवड ही सर्वात मोठी जमेची बाजू आहे. 'काय चुकले सांग ना...' गाणं हृदयस्पर्शी आहे.
अभिनय : महेश मांजरेकरांनी अफलातून अभिनय केला आहे. ज्येष्ठ नागरिकांप्रमाणे वारंवार एकच बोलणं, बोलताना अडखळणं, तरीही ठाम बोलणं, बुद्धी तल्लख असल्याचे दाखले देणं सर्व काही मनाला भिडणारं आहे. त्यांना मेधा मांजरेकरांनी सुरेख साथ दिली आहे. भूषण प्रधाननेही आपल्या भूमिकेला न्याय दिला आहे. अनुषा दांडेकरने साकारलेली ग्रे शेडेड व्यक्तिरेखा शब्दोच्चारांमुळे खटकते. अलिकडे छोट्याशा व्यक्तिरेखांमध्ये भाव खाऊन जाणाऱ्या उपेंद्र लिमयेने पुन्हा बाजी मारली आहे. सचिन खेडेकरने साकारलेले न्यायाधीश आणि डॅा. गिरीश ओक यांनी वठवलेले विरोधी वकीलही छान झाले आहेत. इतर कलाकारांनीही उत्तम साथ दिल्याने चांगली भट्टी जमली आहे.
सकारात्मक बाजू : कथा, पटकथा, संवाद, अभिनय, दिग्दर्शन, गीत-संगीत, सिनेमॅटोग्राफीनकारात्मक बाजू : मध्यंतरानंतरचा ड्रामा, संकलन, काही आतर्किक गोष्टीथोडक्यात काय तर हा चित्रपट ज्येष्ठ नागरिकांवरील असला तरी सर्व वयोगटांतील प्रेक्षकांसाठी आहे. तरुणाईने तर हा चित्रपट आवर्जून पाहायला हवा, तरच भविष्यात चित्र बदलू शकेल.