- तेजल गावडे
बॉलिवूडच्या पडद्यावर बऱ्याच वर्षानंतर हत्तीवर आधारीत चित्रपट पाहायला मिळाला. राजेश खन्ना अभिनीत 'हाथी मेरे साथी ' चित्रपट 1971 साली प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. हा चित्रपट हत्ती व मानवी नात्यावर आधारीत होता. यावरच आधारीत जंगली चित्रपटही असून यात दंत तस्करीवर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. जंगल सफारी आणि हत्तींसोबतचे मानवी नाते रुपेरी पडद्यावर पाहणे प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरणार आहे.
या चित्रपटाची सुरूवात होते ती ओडिशातील चंद्रिका हत्ती अभयारण्यातून... या जंगलातील नदीकाठी हत्ती मुक्त विहार करत असताना त्या ठिकाणी आकाशात ड्रोन गिरक्या घेताना दिसतो. त्याचवेळी हत्तीसोबत महिला माहूत शंकरा (पूजा सावंत) व अभयारण्याचे व्यवस्थापक नायर (थलायवसल विजय) तिथे असतात. तो ड्रोन त्यांच्या निदर्शनास येतो. त्यावेळी शंकरा दगड मारून ड्रोन निकामी करण्यासाठी प्रयत्न करते. या ड्रोनच्या माध्यमातून या अभयारण्यातील हत्तींच्या हस्तीदंतावर शिकाऱ्यांना नजर ठेवायची असते आणि त्या शिकाऱ्यांना हत्तीच्या कळपाचा सम्राट भोला हत्तीचे सहा फूट लांब हस्तीदंत दिसतात. शिकाऱ्यांचा म्होरक्या केशव (अतुल कुलकर्णी) हे हस्तीदंत मिळवण्यासाठी भोलाची शिकार करायचे ठरवतो. त्याच दरम्यान नायर यांचा मुलगा व शंकराचा बालपणीचा मित्र राज (विद्युत जामवाल) जो मुंबईत प्राण्यांचा डॉक्टर असतो. तो बऱ्याच वर्षानंतर आपल्या आईच्या दहाव्या वर्ष श्राद्धसाठी आपल्या गावी काही दिवसांसाठी येतो. त्याचा पाठलाग करत हत्तींच्या अभयारण्याची काळजी घेणाऱ्या नायर यांची मुलाखत घेण्यासाठी मुंबईतील पत्रकार मीरा (आशा भट)देखील चंद्रिका येथे येते. राजचे बालपण याच गावात हत्तींच्या सान्निध्यात त्यांच्याशी खेळत गेले होते. त्यामुळे त्याला तिथल्या हत्तींचा खूप लळा असतो. आईच्या वर्ष श्राध्यादिवशी गजगुरू (मकरंद देशपांडे) राजला जंगलातील अवैध शिकारीबद्दल सांगण्याचा प्रयत्न करतात. त्याच रात्री शिकारी केशव भोलाचे हस्तीदंत मिळवण्यासाठी जंगलात येतो. भोलाला त्या शिकाऱ्यांच्या तावडीतून राज सुटका करेल का आणि जंगलातील अवैध शिकारी जगासमोर येईल का, यासाठी हा चित्रपट पाहावा लागेल.
'द ब्लॉब', 'द मास्क', 'इरेजर', 'ब्लेस द चाइल्ड' यासारख्या लोकप्रिय हॉलिवूडपटांचे दिग्दर्शक चक रसेल यांचा हा पहिला बॉलिवूडपट आहे. त्यांनी जंगलीचे दिग्दर्शन उत्तमरित्या केले असून इमोशन व अॅक्शन सीनचे खूप चांगले चित्रण केले आहे. चित्रपटाच्या पूर्वाधात कथा हळूहळू वेग घेऊ लागते आणि मध्यांतराच्या आधी भावनिक व्हायला भाग पाडते. उत्तरार्धात काही सीन्स खटकतात. मात्र संपूर्ण चित्रपटात हत्तींचा खूप चांगला वापर करण्यात आला आहे. कुठेही अतिशयोक्तीपणा वाटत नाही. चक रसेल यांनी हत्ती व मानवी नात्यांचे खूप छान चित्रण केले आहे. या चित्रपटाचे सिनेमॅटोग्राफर मार्क इरविन यांनी जंगल, नदी आणि तिथे वसलेली घरे व हत्ती अशी सगळी दृश्यं आपल्या कॅमेऱ्यात छान टिपली आहेत. तसेच या चित्रपटाचे बॅकग्राउंड स्कोअरदेखील चांगला आहे. कलाकारांच्या अभिनयाबद्दल सांगायचे तर विद्युत जामवाल चित्रपटात कलारिपायटू मार्शल आर्ट करताना दिसतो आहे. त्याने अभिनयासोबत नेहमीप्रमाणे दमदार अॅक्शन सीनने थक्क केले आहे. तर मराठी अभिनेत्री पूजा सावंतचा हा पहिला बॉलिवूड चित्रपट आहे. तिनेदेखील आपल्या भूमिकेला योग्य न्याय दिला आहे. तसेच अभिनेत्री आशा भटचा हा पहिलाच चित्रपट असून तिनेदेखील चांगला अभिनय केला आहे. अतुल कुलकर्णीने ग्रे शेड असलेली केशवची भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहते. थलायवसल विजय, मकरंद देशपांडे व अक्षय ऑबेरॉयने देखील आपल्या भूमिकेला न्याय दिला आहे. इतकेच नाही तर या चित्रपटात माणुसकीचा व हस्तीदंतापासून बनलेल्या वस्तू विकत न घेण्याचा संदेश देण्यात आला आहे. जंगल सफारी व मानव आणि हत्ती यांच्यातील सुंदर नाते पाहण्यासाठी हा चित्रपट जरूर पहा.