२८ कोटी रुपयांहून अधिक कमाई करणाऱ्या 'मुंजा'च्या यशानंतर दिग्दर्शक आदित्य सरपोतदारचा 'ककुदा' डिजिटली रिलीज झाला आहे. यातही आदित्यने हॅारर-कॉमेडी हा जॉनर हाताळला आहे. 'मुंजा'मध्ये कोकणातील गोष्ट आहे, तर यात राजस्थानमधील अनोख्या भूताची कथा हास्य आणि रहस्याचा ताळमेळ साधत सादर करण्यात आली आहे.
कथानक : रतौडी गावात ककुदा भूताची प्रचंड दहशत आहे. येथील घराला मोठा आणि छोटा असे दोन दरवाजे आहेत. मंगळवारी घड्याळात सात वाजताच गावकरी मोठा दरवाजा बंद करून छोटा दरवाजा उघडतात. ज्या घराचा छोटा दरवाजा बंद असतो, त्या घरातील पुरुषाला ककुदा झपाटतो आणि १३ दिवसांत त्याचा खेळ खल्लास होतो. या गावातील सनीवर दिमतारी गावातील इंदिराचा जीव जडतो. तिच्या वडीलांना इंग्रजी बोलणारा जावई हवा असल्याने दोघेही पळून मंगळवारी लग्न करतात. संध्याकाळी सव्वा सात वाजले तरी सनी घरी पोहोचून छोटा दरवाजा उघडा ठेवण्यात अपयशी ठरतो. त्यानंतर काय घडतं ते चित्रपटात आहे.
लेखन-दिग्दर्शन : अविनाश द्विवेदी आणि चिराग गर्ग यांनी पटकथेत नावीन्यपूर्ण घटनांचा समावेश केला आहे. वेगळ्या प्रकारचं भूत आणि त्याची दहशत दाखवताना सुरुवातीला इंदिराच्या लग्नासाठी मुलं पाहण्यात थोडा वेळ वाया गेला आहे. लग्नानंतर मात्र कथेसोबत रहस्यही हळूहळू उलगडत जातं. वैद्यकीय उपचार आणि विज्ञानाचाही वापर योग्य प्रकारे केला आहे. पारंपरिक तांत्रिक आणि विधींना छेद देत भूत-आत्म्यांना बोलावण्यासाठी नावीन्यपूर्ण प्रयोग करण्यात आले आहेत. बोलीभाषेसाठी कलाकारांनी घेतलेले कष्ट सिनेमा पाहताना दिसतात. बोलीभाषेसोबतच वातावरण निर्मितीवरही मेहनत घेतली आहे. व्हिएफएक्स आणखी चांगले हवे होते.
अभिनय : सोनाक्षी सिन्हाने पुन्हा एकदा दुहेरी भूमिकांना अचूक न्याय दिला आहे. इंदिरा खूप बोलकी आणि बिनधास्त आहे, तर गोमती जगापासून अलिप्त राहणारी आहे. रितेश देशमुखने साकारलेला घोस्ट हंटर व्हिक्टर मजेशीर तर आहेच, पण आपल्या कामातही चोख आहे. रितेशने दोन्हीचा छान ताळमेळ साधला आहे. साकेब सलीमनेही सन्नीची व्यक्तिरेखा छान रंगवली आहे. या सर्वांना आसिफ खान, सचिन विद्रोही, अरुण दुबे या कलाकारांनी सहाय्यक व्यक्तिरेखांमध्ये चांगली साथ दिली आहे.
सकारात्मक बाजू : पटकथा, संवाद, बोलीभाषा, दिग्दर्शन, अभिनय, सिनेमॅटोग्राफी, कला दिग्दर्शननकारात्मक बाजू : सुरुवातीचा वेळकाढूपणा, व्हिएफएक्सथोडक्यात काय तर आजवर कधीही न पाहिलेल्या वेगळ्या प्रकारच्या भुताच्या करामती, दहशत आणि या अनुषंगाने घडलेला हास्य-रहस्याचा संगम अनुभवण्यासाठी हा चित्रपट एकदा पाहायला हवा.