गीतांजली आंब्रे
कलंक सिनेमाच्या नावातच सिनेमाची पूर्ण कथा सामवालेली आहे. सिनेमाची कथा भारत-पाकिस्तान फाळणी पूर्वीची आहे. लाहोर जवळच्या हुसैनाबाद शहरात लोहार काम करणारे बहुसंख्य मुस्लिम राहत असतं आणि याच शहरात चौधरी नावाचे श्रीमंत घराणं वास्तव करत असते. बलराज चौधरी ( संजय दत्त) आणि त्यांचा मुलगा देव चौधरी ( आदित्य कपूर) मिळून डेली टाईम्स नावाचे वृत्तपत्र चालवत असतात. देवच्या आयुष्यात अचानक मोठा टर्न येतो ज्यावेळी त्याला काही कारणास्तव हे लग्न करावं लागतं. देवची पत्नी रुप (आलिया भट्ट) गाणं शिकण्यासाठी बेगम बहारकडे (माधुरी दीक्षित) हिरामंडीमध्ये जात असते. तिथे तिची ओळख जफरशी (वरुण धवन) होते. दोघांमध्ये काही भेटी झाल्यानंतर एकमेकांवर प्रेम जडते आणि तिथेच सिनेमात ट्विस्ट येतो.
सिनेमाच्या कथेत मुख्यत: प्रेम, नात्यांवर फोकस करण्यात आला आहे. समाजातील रुढी, परंपरा आणि बंधनांना झुगारून केलेले प्रेम लेखक आणि दिग्दर्शक अभिषेक वर्मानने सुंदररित्या रुपेरी पडद्यावर मांडले आहे. अभिषेकने समाजातील अनेक रुढी, परंपरांवर सिनेमाच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित केले आहेत. कलंक ही तीन जोडप्यांची प्रेमकथा आहे. अभिषेकने नात्यांचा गुंता सुरेखपणे सोडवला आहे. सिनेमाचा भव्यदिव्य सेट पाहुन आपल्याला किती तरी वेळ आपण संजय लीला भन्साळी यांचा सिनेमा पाहात असल्याचा भास होतो. सेटच्याबाबत बोलायचे झाले तर दिग्दर्शकाचा हा प्रयत्न फसल्यासारखा वरुणचे बाकीसब फर्स्ट क्लास है गाणं पाहताना आवर्जुन जाणवते.
कलंकची मल्टीस्टारर कास्ट ही सिनेमाची जमेची बाजू आहे. आलियाने रुपची भूमिका जिवंत केली आहे. तर जफरच्या भूमिकेत वरुण धवन परफेक्ट बसला आहे. देवच्या भूमिकेला आदित्यने चारचाँद लावले आहेत. माधुरी दीक्षित, संजय दत्त, सोनाक्षी सिन्हाने आपल्या वाटेला आलेल्या भूमिका चोख निभावल्या आहे. आलिया आणि वरुणची केमिस्ट्री पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकून जाते. तब्बल 20 वर्षानंतर माधुरी-संजय दत्त यांची जोडी पहिल्यांदा पडद्यावर पाहायला मिळणार आहे. सर्व कलाकारांचा दमदार अभिनय सिनेमाच्या प्लस पाईंट आहे. सिनेमातील काही डायलॉग्स केवळ अप्रतिम आहेत. कुछ रिश्ते निभाये नही उन्हे कर्ज कि तरह चुकाये जातेय असो किंवा नफरत जिंदगी बर्बाद कर देती है पर मोहब्बत मैं तो खुद बर्बाद होना पडता है फिर भी कलंक मोहोब्बत पे ही लगता है! असे डायलॉग्स सिनेमात पाहताना तुमची मनं जिंकल्याशिवाय राहणार नाही. कलंकच्या संगीताविषयी बोलायचे झाले तर रिलीज आधीच सिनेमाची गाणी हिट झाली होती. कलंकचे टायटल ट्रॅक आणि घर मोरे परदेसिया ही गाणी फारच सुंदर आहे. मात्र सिनेमात प्रत्येक दोन मिनिटानंतर वाजणारं गाणं कंटाळवाणे वाटू लागते. काही गाणी तर उगाच टाकल्यासारखी वाटतात. सिनेमाची लांबी फार जास्त झाली आहे सिनेमा आणखी लवकर संपवता आला असता. एकदंरच काय नात्यांची सुंदर वीण अभिषेकने एकाच धाग्यात सुंदरपणे ओवली आहे. त्यामुळे एकदा तरी हा सिनेमा थिएटरमध्ये जाऊन पाहण्यासारखा आहे.