चित्रपट परीक्षण - रंजू मिश्रा
प्रभास, दीपिका पादुकोण, अमिताभ बच्चन आणि कमल हसन यासारख्या दिग्गज कलाकारांचा समावेश असलेला बहुप्रतीक्षित चित्रपट ‘कल्की 2898 एडी’ अखेर गुरुवारी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. ६०० कोटींचे बजेट असलेल्या या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. नाग अश्विन यांच्या कल्पनेतून आलेल्या या चित्रपटात काय विशेष आहे, काय कमतरता आहेत, श्रीकृष्ण, महाभारत आणि २८९८ एडी या वर्षाचा काय संबंध आहे, चला तर मग बघूयात...
कथानक :महाभारताच्या युद्धानंतर तरुण अश्वत्थामा (अमिताभ बच्चन) यांच्यापासून कथानकाला सुरुवात होते. श्रीकृष्ण अश्वत्थामाला अमरत्व प्रदान करतात. धार्मिक तसेच पौराणिक मान्यतांनुसार, अश्वत्थामा हा कलियुगाच्या अंतापर्यंत जिवंत राहतो. जेव्हा पृथ्वीवर पाप वाढेल, तेव्हा वाईटांचा सामना करण्यासाठी विष्णु दहावा अवतार ‘कल्की’च्या रूपात अवतार घेतील आणि कलियुगाचा अंत होईल. हाच धागा पकडून कथानक पोहोचते २८९८ एडी वर्षापर्यंत. आता जगात खूप बदल झालेला आहे. काशी येथे आधुनिक टेक्नॉलॉजीसह एक मायावी कॉम्प्लेक्स आहे, जिथे दृष्ट कमांडर (शाश्वत चॅटर्जी) त्याचा सुप्रीम (कमल हसन) साठी काम करत असतो. ज्याने आपली दैवी शक्ती वाढवण्यासाठी तरुणींच्या गर्भावर प्रयोग करण्याच्या हेतूने त्यांना बंदिस्त करून ठेवले आहे. या लॅबमध्ये सुमती (दीपिका पादुकोण) देखील कैद असते. ती पाच महिन्यांची गर्भवती आहे. तिच्या गर्भात बहुप्रतीक्षित अवतार असतो. ती तिच्या बाळाला वाचवण्यासाठी कॉम्प्लेक्समधून पळून जाते. भैरवा (प्रभास) तिला पकडून सुप्रीम कमांडरला सोपवू इच्छित असतो. अश्वत्थामा कशाप्रकारे सुमतीचे रक्षण करतो, तिची मदत कोण करतं, भैरवा आणि अश्वत्थामा यांच्यात काय संबंध आहे, हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला चित्रपट पाहावा लागेल.---------लेखन व दिग्दर्शन : नाग आश्विन यांच्या महाभारतापासून सुरू झालेल्या कहाणीत एवढ्या काही व्यक्तीरेखा आहेत की, डोक्यात फार गोंधळ होतो. पुराणकथेसह अत्याधुनिक टेक्नोलॉजीचे फ्यूजन तर चांगले आहे. मात्र, पटकथा ही फार जास्त प्रमाणात गोंधळात टाकणारी आहे. पहिला भाग प्रेक्षकांसोबत कनेक्ट होत नाही. मात्र, मध्यांतरानंतर कहानी पूर्णपणे बदलून जाते. भैरव आणि बुज्जीची टयुनिंग, अश्वत्थामा आणि भैरवा यांच्यातील हाय ऑक्टेन ॲक्शन सिक्वेन्स, क्लायमॅक्स, व्हीएफएक्स, प्रोडक्शन डिझाईन, सिनेमॅटोग्राफी, वेशभूषा हे सर्वच शानदार आहे.-------अभिनय :प्रभासची व्यक्तीरेखा कमकुवत आणि गोंधळात टाकणारी वाटते. याशिवाय त्याने अभिनय कौशल्य, समयसूचकता यांच्यासह त्याने सांभाळण्याचा प्रयत्न केला आहे. अमिताभ बच्चन कमाल काम केले आहे. ॲक्शनपासून ते हावभावापर्यंत बिग बी भाव खाऊन जातात. दीपिका पादुकोण हिने तिची व्यक्तीरेखा अप्रतिम साकारली आहे. खलनायक सुप्रीम यास्किन यांच्या भूमिकेत कमल हसन योग्य वाटतात. इतर कलाकारांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. एसएस राजामौली, राम गोपाल वर्मा, दिशा पटानी, अनुदीप, मृणाल ठाकुर, विजय देवरकोंडा आणि दुलकर सलमान यांनी सर्वांनीच चांगले काम केले आहे.---------सकारात्मक बाजू - अभिनय, हाय ऑक्टेन ॲक्शन सीक्वेंस, क्लायमॅक्स, व्हीएफएक्स, प्रॉडक्शन डिजाइन, सिनेमॅटोग्राफी आणि वेशभूषानकारात्मक बाजू- कथानक, व्यक्तीरेखांची गर्दी आणि पहिल्या भागाची धीमी गतीथोडक्यात - चित्रपटात अनेक चुका असतील तरीही भारतीयांनी हा चित्रपट केवळ प्रभास आणि अमिताभ बच्चन यांच्यासाठी जरूर बघावा.