Join us

Kesari Film Review : प्रेरणादायी ‘केसरी’

By अजय परचुरे | Published: February 29, 2020 9:34 AM

Kesari Film Review : तांबड्या मातीतील कुस्तीवर आधारित असलेला 'केसरी' हा एका अस्सल कुस्तीगिराचा जीवनपट आहे.

ठळक मुद्दे कुस्तीला सर्वस्व वाहिलेल्या एक युवकाची संघर्षगाथा बदललेलं कुस्तीचे स्वरूप,राजकारण असे विविध कंगोरे सुजय डहाके याने अचूकपणे टिपले आहेत.
Release Date: February 28, 2020Language: मराठी
Cast: महेश मांजरेकर, विक्रम गोखले, विराट मडके, रूपा बोरगांवकर
Producer: संतोष रामचंदानी Director: सुजय डहाके
Duration: २ तास १४ मिनिटंGenre:
लोकमत रेटिंग्स

कुस्ती हा महाराष्ट्राच्या मातीतील रांगडा खेळ. बदलत्या जीवनशैलीतही ग्रामीण भागात कुस्तीचे आखाडे तरुणाईने बहरलेले दिसतात. कुस्तीला सर्वस्व वाहिलेल्या एक युवकाची संघर्षगाथा दिग्दर्शक सुजय डहाके याने ‘केसरी - saffron’ या मराठी चित्रपटातून मांडली आहे. हा चित्रपट एका खेळाभोवती फिरत असला तरी हा प्रत्येक खेळाडूला, विद्यार्थ्याला जिद्द, चिकाटी, मेहनत यांचे महत्व सांगणारा आहे.  

'केसरी saffron' या चित्रपटाची कथा ग्रामीण भागातील मध्यमवर्गीय जाधव कुटुंबात घडणारी आहे. या कुटुंबातील बलराम (विराट मडके) या मुलाला कुस्ती खेळण्याची आवड आहे. तो कोणत्याही तालमीत जात नसला तरी प्रचंड मेहनत घेऊन कसरत करत असतो आणि अनेक स्पर्धांमध्ये बाजी मारतो. त्याच्या कुस्ती खेळण्याला त्यांचे वडील आनंदा (उमेश जगताप) यांचा प्रखर विरोध आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत त्याची निवड महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी होते. त्याला योगायोगाने वस्ताद (महेश मांजरेकर) भेटतो, मात्र हा वस्ताद त्याला गंडा बांधत नाही, परंतु जिंकण्याची दिशा दाखवतो. घरच्यांचा विरोध पत्कारून जग जिंकायला निघालेला हा पैलवान आपल्या ध्येया पर्यंत पोहचण्यात यशस्वी होतो का? हे जाणून घेण्यासाठी ‘केसरी’ बघायला हवा.कुस्तीच्या आखाड्यात उतरणार्‍या प्रत्येक पैलवानाचे स्वप्न प्रतिष्ठेची ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धा जिंकून मानाची गदा आपल्या खांद्यावर मिरवण्याचे असते. मात्र कोणत्याही स्वप्नाचा प्रवास हा अत्यंत खडतर वाटेवरून होत असतो. आज बदललेले कुस्तीचे स्वरूप, त्यातील राजकारण असे विविध कंगोरे दिग्दर्शक सुजय डहाके याने  अचूकपणे टिपले आहेत. नियाज मुजावरच्या कथेला उत्तम पटकथेची जोड आणि लक्षवेधी संवाद यामुळे चित्रपटाला वेग आला आहे.

चित्रपटातून पदार्पण करणाऱ्या विराट मडकेचा पैलवान लुक उत्तम झाला आहे, खऱ्या पैलवानांसारखी शरीरयष्टी करण्यासाठी त्याने घेतलेले मेहनत पडद्यावर दिसते.  महेश मांजरेकर यांनी साकारलेला मेहमान वस्ताद लक्षात राहतो. विक्रम गोखले यांनी साकारलेले आजोबा, ग्रे शेड मध्ये असलेले मोहन जोशी, वडील आणि आईच्या भूमिकेत उमेश जगताप - छाया कदम यांच्या व्यक्तीरेखा लक्षात राहतात.  प्रवीण तरडे, नंदेश उमप, जयवंत वाडकर, नचिकेत पूर्णपात्रे, सत्यप्पा मोरे, ज्ञानरत्न अहिवळे, पद्मनाभ बिंड, रूपा बोरगावकर यांनी आपल्या भूमिका चोख बाजावल्या आहेत.संगीतकार ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यांनी गीतकार क्षितिज पटवर्धन, वैभव जोशी, संजय साठे यांच्या गीतांना स्वरबद्ध केले आहे. ‘हे अस्स पाहिलं’, ‘तू चल रे मना’ ही गीते मनाला भावतात.  ‘पैलवान आला’ हे युग आणि साकेत कानेटकर यांचे रॅप सॉन्ग चांगले झाले आहे.‘केसरी’ बद्दल एकंदरीत सांगायचे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात कुस्ती किंवा इतर खेळांचे वेड असलेले अनेक युवक असतात, त्यांच्यात लढण्याची ऊर्जा, जिंकण्याची जिद्द असते मात्र कधी परिस्थिती आडवी येते तर कधी योग्य मार्गदर्शक मिळत नाही. अशा प्रत्येक युवक, खेळाडूंसाठी हा चित्रपट प्रेरणा देतो असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. महाराष्ट्राच्या मातीतील कुस्तीवर आधारीत ‘केसरी’ एकदा बघायला हरकत नाही.

टॅग्स :केसरी मराठी सिनेमामहेश मांजरेकर विक्रम गोखलेसुजय डहाके