(Review by देवेंद्र जाधव)
लहानपणी 'चांदोबा'मधल्या कथा वाचायचो बघा आपण! एक आटपाट नगर असतं.. त्यात राजा - राणीचा संसार.. त्या नगरातला प्रत्येक जण स्वभावाने अतरंगी. अचानक नगरात काहीतरी घडतं आणि गोंधळ उडतो. अंतिमतः अडचणी दूर होऊन सर्वजण सुखाने नांदू लागतात. या छोट्याशा कहाणीमध्ये आपण इतके हरवून जायचं की कथा संपल्यावर आपसूक चेहऱ्यावर आनंद झळकायचा. असाच आनंद 'लापता लेडीज' (Laapata Ladies) पाहून मिळतो. खूप दिवसांनी बॉलिवूडमध्ये एक तगडा कंटेंट आणि सुंदर डायलॉग असलेला सिनेमा बघण्यात आला.
कथानक: 'लापता लेडीज'चा ट्रेलर ज्यांनी बघितला आहे त्यांना कथेचा अंदाज आला असेल. तरीही कथा थोडक्यात सांगायची तर... नुकताच लग्न झालेला नवरदेव आपल्या बायकोला घेऊन गावी येतो. गावातले सर्वजण आनंदी असतात. पण आपण जिला घरी आणलं आहे, ती आपली बायकोचं नाही, असं त्याला कळतं. बायको हरवली आहे याची त्याला जाणीव होते. मग हरवलेली बायको मिळते का? ज्या मुलीला त्याने बायको समजून घरी आणलं असतं ती कोण? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला 'लापता लेडीज' पाहून मिळतील. सिनेमा आपल्याला खळखळून हसतो अन् आणि काही प्रसंग पाहून डोळ्यांच्या कडाही पाणावतात.
लेखन - दिग्दर्शन: 'लापता लेडीज' सिनेमा पाहताना जाणवतं सर्वच स्तरांवर विशेष मेहनत केली गेलीय. १९९० - २००० चा काळ सिनेमात दिसतो. त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींवर काम केलेलं दिसतं. अगदी 'कहो ना प्यार है'चं रेट्रो पोस्टर, जुनी ट्रेनची तिकीट वैगरे वैगरे. त्यामुळे त्या काळाची वातावरण निर्मिती चांगली तयार केली गेलीय. याशिवाय सिनेमातली अगदी छोटी छोटी पात्रंही लक्षात राहतील, इतकी मेहनत त्यांच्यावर केली गेलीय.
'लापता लेडीज'ची महत्वाची बाब म्हणजे लेखन. सिनेमात संवाद आणि रुपके खूप छान वापरली आहेत. स्त्री मुक्त होत असताना नकळत तिच्या डोक्यावरचा पदर बाजूला जाणं असो किंवा सासू - सुनेची मैत्री असो! काही रुपकांचा हुशारीने वापर केला गेलाय. फक्त सिनेमात पेरलेली रुपकं प्रेक्षक म्हणून आपल्याला वेचावी लागतात. अशीच गंमत 'लापता लेडीज'च्या संवादामध्ये आहे. 'कुछ आदमी जैसे दिखते है वैसे होते नहीं, और कुछ जैसे होते है वैसे दिखते नहीं..", "आप मूर्ख हो कोई बात नहीं, लेकीन आपको अपनी मुर्खता पे गर्व है ये सही बात नहीं.." असे खूप सुंदर डायलॉग सिनेमात आहेत. 'लापता लेडीज' पाहत असताना काही संवाद नकळत इतके भिडतात की आपसूक तोंडून 'वाह' अशी दाद येते. दिग्दर्शक किरण रावचं यामुळे कौतुक करावं तितकं कमी. याशिवाय पटकथा आणि संवाद लिहिणाऱ्या लेखिका स्नेहा देसाईचा सुद्धा विशेष उल्लेख करावा लागेल. गाणी लक्षात राहत नाहीत, पण ती सिनेमा बघताना आपण एन्जॉय करतो.
अभिनय: अभिनयात अगदी छोट्यातल्या छोट्या कलाकारांकडून किरण रावने चांगलं काम करवून घेतलं आहे. प्रतिभा रंत, नितांशी गोयल, स्पर्श श्रीवास्तव यांनी अनुक्रमे जया, फुल आणि दीपकची भूमिका चांगली साकारली आहे. प्रेक्षकांसाठी हे नवोदित कलाकार असूनही सर्वांनी मन लावून त्यांच्या भूमिका निभावल्या आहेत. या सर्वांना सांभाळायचं आणि गंभीर विषय हलकाफुलका करायचं महत्वाचं काम रवी किशनने केलंय. रवी किशनने साकारलेला पोलीस अधिकारी श्याम मनोहर लाजवाब झालाय. छाया कदम या मराठमोळ्या अभिनेत्रीनेही सुंदर अभिनय केलाय. इतर कलाकारांनीही आपापल्या भूमिका प्रामाणिकपणे साकारल्या आहेत.
सकारात्मक बाजू: कथा, संवाद, अभिनय, दिग्दर्शन
नकारात्मक बाजू : एका क्षणी आपण पुढे काय होईल याचा अंदाज बांधतो आणि तो खरा निघतो
अनेकांना 'लापता लेडीज' पाहून वाटू शकेल की, काळ कितीही पुढे गेला तरीही आपण स्त्रियांवर होणारे अन्याय, त्यांना मिळणारी दुय्यम वागणूक तिथेच अडकलो आहोत अजून. पण दुर्दैव हेच आहे की, काळ विज्ञान तंत्रज्ञानाच्या दृष्टीने पुढे गेला असला तरीही समाज म्हणून आपण तिथेच आहोत. अजूनही काही भागात स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन तसाच मागासलेला आहे. त्यामुळे 'लापता लेडीज' सारखे सिनेमे येणं आणि ते बघणं ही काळाची गरज आहे. सिनेमात एक सुंदर प्रसंग आहे तो सांगून मी शेवट करतो.. अनेकदा घरातली बाई पुरुषांना विचारते की तुमच्या आवडीचं काय बनवू आज? पण कधी आपण तिला विचारलंय का? आज तुला जे आवडतं ते खायला बनव म्हणून!