Join us

अखेरपर्यंत खिळवून ठेवणारी मर्डर मिस्ट्री, कसा आहे अमेय वाघ-अमृता खानविलकरचा 'लाईक आणि सबस्क्राईब'?

By संजय घावरे | Published: October 18, 2024 3:39 PM

अमेय वाघ-अमृता खानविलकरची भूमिका असलेला 'लाईक आणि सबस्क्राईब' कसा आहे? वाचा Review (amey wagh, like aani subsribe)

Release Date: October 18, 2024Language: मराठी
Cast: अमेय वाघ, अमृता खानविलकर, जुई भागवत, शुभंकर तावडे, विठ्ठल काळे, राजसी भावे, पुष्कराज चिरपुटकर, शिवराज वायचळ, गौतमी पाटील
Producer: नितीन प्रकाश वैद्य, अभिषेक मेरुकरDirector: अभिषेक मेरूकर
Duration: दोन तास २२ मिनिटेGenre:
लोकमत रेटिंग्स

हि आजच्या तरुणाईची गोष्ट आहे. सोशल मीडिया आणि रील्सच्या या जमान्यात लाईक आणि सबस्क्राईबला खूप महत्त्व प्राप्त झालं आहे. लाईक्सच्या नादात सोशल मीडियावरील काही व्हिडीओ ब्लॉगर कोणत्याही थराला जातात. तोच धागा पडकून दिग्दर्शक अभिषेक मेरूकरने हा चित्रपट बनवला आहे.

कथानक : स्ट्रगलर अभिनेत्री खुशी लाईव्ह ब्लॅागिंगद्वारे आपला दिनक्रम चाहत्यांसोबत शेअर करण्यासाठी व्हिडिओ शूट करत असते. मावळत्या सूर्याचा सीन शूट करण्यासाठी ती समुद्रकिनारी पोहोचते. तिथे तिला एक पिशवी मिळते. त्या पिशवीत फळे, पाॅकेट आणि लाँड्रीचं बिल असतं. बिलावरील पत्त्याच्या आधारे ती रोहित नावाच्या तरुणाच्या घरापर्यंत पोहोचते. हे सर्व व्हिडीओद्वारे तिच्या चाहत्यांपर्यंत पोहोचत असतं. खुशी जेव्हा रोहितच्या घरी जाते, तेव्हा तो मृतावस्थेत दिसतो. हे सर्व लाईव्ह व्हिडीओमध्ये शूट होतं. त्यानंतर काय घडतं ते चित्रपटात आहे.

लेखन-दिग्दर्शन : एका घटनेच्या आधारे लिहिलेली रहस्यमय पटकथा शेवटपर्यंत खिळवून ठेवते. ठराविक अंतराने येणारी नाट्यमय वळणे उत्सुकता वाढवतात. संवाद तरुणाईला आवडण्याजोगे आहेत. हत्या कोणी केली हे रहस्य अखेरपर्यंत उलगडत नाही. हत्या करणारी व्यक्ती कायम डोळ्यांसमोर असूनही, तिच्यावर संशय येत नाही हेच लेखक म्हणून अभिषेकचं यश आहे. हत्येचा प्रसंग आणि व्हिडिओच्या वेळेचा ताळमेळ नीट जमलेला नाही. रोहित आणि फैजलच्या गावाकडच्या आठवणीच्या प्रसंगांमध्ये थोडी गती मंदावल्यासारखी वाटते. काही गंमतीशीर प्रसंगही आहेत. सिनेमॅटोग्राफी खूप चांगली आहे. 

अभिनय : सर्वांचाच अभिनय वाखाणण्याजोगा आहे. खुशीच्या भूमिकेत जुई भागवतने प्रभावित केलं. पहिल्याच चित्रपटात ती आत्मविश्वासाने कॅमेऱ्यासमोर वावरली आहे. अमेय वाघने साकारलेला रोहित त्याच्या यापूर्वीच्या व्यक्तिरेखांपेक्षा वेगळा असून, त्यासाठी त्याने मेहनत घेतली आहे. अमृता खानविलकरचा नॅान ग्लॅमरस लुकही लक्ष वेधून घेतो. शुभंकर तावडेची व्यक्तिरेखा सुरुवातीपासूनच काहीशी गूढ वाटते. विठ्ठल काळेनेही आपली भूमिका छान रंगवली आहे. इतर कलाकारांनीही चांगली साथ दिली आहे.

सकारात्मक बाजू : पटकथा, संवाद, नाट्यमय प्रसंग, दिग्दर्शन, अभिनय, सिनेमॅटोग्राफी, वेशभूषानकारात्मक बाजू : मध्यंतरापूर्वी मंदावलेली गतीथोडक्यात काय तर हत्येचा गुंता सुटला असे वाटल्यानंतरही खऱ्या हत्याऱ्याचे न उलगडलेलं रहस्य जाणून घेण्यासाठी हा चित्रपट अवश्य बघायला हवा.

टॅग्स :अमेय वाघअमृता खानविलकरमराठी अभिनेतामराठी चित्रपट