गीतांजली आंब्रे
प्रेम हा इतका हळूवार आणि नाजूक विषय आहे. बॉलिवूडला या प्रेमाची भुरळ अनेकवेळा पडली आहे. आतापर्यंत प्रेमाच्या विविध छटा सिनेमाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर दाखवण्यात आला आहे. 11 वर्षांपूर्वी आलेल्या दीपिका पादुकोण आणि सैफ अली खानच्या लव्ह आज कल सिनेमाचा सिक्वल प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सिनेमाचा ट्रेलर आऊट झाल्यापासूनच कार्तिक आणि साराची केमिस्ट्रीने प्रेक्षकांचे लक्ष वेधले होते. अनेक बोल्ड सीन्समुळे हा सिनेमा चर्चेत होता.
ही गोष्ट आहे जोई (सारा अली खान) आणि रघुची (कार्तिक आर्यन). जोई ही 2020मधील मॉर्डन विचारांची मुलगी असते. 22 वर्षांच्या जोईला सिरिअस रिलेशनशीपवर विश्वास नसतो. तिला करिअरवर लक्षकेंद्रित करायचे असते. एका रात्री जोईची ओळख वीरशी होते. वीरचे म्हणणे असते त्याला 100 टक्के प्रेम पाहिजे अन्यथा नको. जोई वीरकडे आकर्षित होते. वीरचे जोईवर खऱं प्रेम असते. ते व्यक्त करण्यासाठी त्याला शरीराची गरज लागत नाही मात्र ही बाब जोईला खटकते. जोईच्या मागेमागे वीर तिच्या कामाच्या ठिकाणी पोहोचतो. त्या जागेचा मालक असतो रणदीप हुड्डा. जो जोईला त्याच्या प्रेमाची गोष्ट सांगून वीरचे तिच्यावर असलेल्या प्रेमाची जाणीव करुन देतो. नव्वदच्या दशकातला रघू(रणदीप हुड्डा युवावस्था) आणि उदयपूरमध्ये राहणारी लीना(आरुषी शर्मा) हे एकमेकांच्या प्रेमात इतके आकंठ बुडतात की पूर्ण उदयपूर शहरात बदनाम होतात. रघू आणि लीनाचे प्रेमाची गोष्ट ऐकून जोईला तिच्या प्रेमाची जाणीव होते. मात्र पुन्हा ती करिअर आणि प्रेम यांच्यामध्ये जाऊन फसते आणि एका वेगळ्या वळणावर निघून जाते. तर तिकडे रघू आणि लीनाचे प्रेम देखील वाढत्या वयाबरोबर आपले रंग बदलते.
सिनेमाच्या कथेत फारसा काही दम नाही. दिग्दर्शक इम्तियाज अलीचे भूतकाळ आणि वर्तमानकाळातील प्रेम दाखवण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला आहे. भूतकाळ आणि वर्तमानकाळाची गोष्ट कथेतील गोंधळ जास्त वाढवतो. कार्तिक आर्यनने साकारलेली भूमिका ही त्याच्या करिअरचा टर्निंग पाईंट ठरू शकते. साराच्या वाटेला आलेल्या भूमिकेत काही सीन्समध्ये तिचा अभिनय खूप खटकतो. अॅक्टिंगचा ओव्हर डोस वाटू लागतो. कार्तिकच्या अभिनयापुढे साराचा अभिनय तग ठरु शकला नाहीय. रणदीप हुड्डाला सिनेमात करण्यासारखे काहीच नाही. आयुषी शर्माने लीनाची भूमिका सुंदर रेखाटली आहे. काहीवेळानंतर सिनेमा कटांळवाणा वाटू लागतो. सिनेमाचा स्क्रिनप्ले खूपच कमकूवत आहे. मात्र सिनेमाचे संगीत, संवाद आणि सिनेमेटॉग्राफी ही 'लव्ह आज कल 2' ची जमेची बाजू आहे. 'शायद' आणि 'हा में गलत' ही गाणी दमदार आहेत. 'लव्ह आज कल 2' गाणी सिनेमा रिलीज होण्याआधी प्रेक्षकांच्या ओठावर रुळू लागली होती. लव्ह आज कल सिनेमा पाहून तुमच्या ज्या अपेक्षा पूर्ण झाल्या होत्या त्या लव्ह आज कल 2 पाहून होतीलच असे नाही.