- श्वेता पांडे
सलमान खानच्या होम प्रॉडक्शनचा ‘लवयात्री’ हा सिनेमा आज शुक्रवारी रिलीज झाला. सलमानची बहीण अर्पिता खान हिचा पती आयुष शर्मा या चित्रपटाद्वारे बॉलिवूड डेब्यू करतोय. सोबतचं वरिना हुसैन ही अभिनेत्रीही आपल्या सिने करिअरची सुरूवात करतेय. अभिराज मीनावाला यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. सलमानच्या ‘सुल्तान’ या चित्रपटाच्या टीममध्ये अभिराज होता. अभिराजनेही या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनक्षेत्रात पाऊल ठेवले आहे. तेव्हा जाणून घेऊ यात, आयुष शर्मा व वरिना हुसैनचा हा डेब्यू सिनेमा कसा आहे तो...या चित्रपटाची कथा गुजरातच्या पार्श्वभूमीवर साकारण्यात आली आहे. सुश्रूत (आयुष शर्मा) मुलांना गरबा शिकवत असतो. डान्स आणि डान्स हेच त्याचे पॅशन असते. त्याने नोकरी करावी, अशी त्याच्या कुटुंबाची इच्छा असते. पण सुश्रूतला गरबा अॅकेडमी उघडायची असते. दुसरीकडे इंग्लडमध्ये राहणारी मिशेल (वरिना हुसैन) हिला तिच्या मायदेशी म्हणजे भारतात जायचे वेध लागलेले असतात. तिचे वडिल (रोनित रॉय) तिला परवानगी देतात आणि मिशेल थेट गुजरातमध्ये पोहोचते. गुजरातेत नवरात्रोत्सवाच्या नऊ दिवसांत सुश्रूत मिशेलच्या प्रेमात पडतो. यानंतर चित्रपटात अनेक ट्विस्ट येतात. सरतेशेवटी सुश्रूतला मिशेल मिळते की नाही, हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला चित्रपटचं बघावा लागेल. या चित्रपटाबद्दल एका वाक्यात सांगायचे तर यात पटकथेसारखी कुठलीही गोष्ट दिसत नाही. आयुष शर्माला लॉन्च करण्याच्या ढिसाळघाईत चित्रपटाच्या पटकथेकडे दुर्लक्ष झाल्याचे चित्रपट पाहतांना जाणवते. खरे तर चित्रपटाचा प्लॉट चांगला आहे. यावर एक चांगली कथा विणली जाऊ शकली असती. पण ढिसाळघाईने अख्खी कथाचं विस्कटली आहे. दिग्दर्शनाच्या बाबतीत म्हणायचे तर तेही कमजोर आहे. काही दृश्ये चांगली आहेत. पण तरिही चित्रपटात आत्माचं नसल्याने या दृश्यांचाही परिणाम जाणवत नाही. चित्रपटाचा पहिला भाग प्रेक्षक म्हणून आपण कदाचित सहन करूही. पण मध्यांतरानंतर चित्रपट झेलणे जीवावर येते. आयुष शर्मा व वरिनाचा अभिनयही जेमतेम आहे. दोघेही आपल्यातील सर्वोत्तम देण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न करतात. पण दोघांच्याही चेह-यावरचे भाव निराश करतात. अनेक दृश्यांत दोघांच्याही चेह-यांवर शून्य भाव दिसतात. राम कपूर, रोनित रॉय, प्रतीक गांधी यांनी त्यांच्या वाट्याला आलेल्या भूमिका नेटाने निभवल्या आहेत. चित्रपटाच्या शेवटी दिसणारे अरबाज खान आणि सोहेल खानही ठिक आहेत. या चित्रपटाची सर्वात जमेची बाजू म्हणजे याची गाणी. कोरिओग्राफर वैभवी मर्चंट हिची यासाठी प्रशंसा करायलाचं हवी. नवरात्रोत्सव तोंडावर असल्याने या नवरात्रीत ‘लवयात्री’ची गाणी धूम करतील, यात शंका नाही.हा चित्रपट पाहिल्यानंतर ९० च्या दशकातील काही चित्रपटांची प्रकर्षाने आठवण येते. त्याच धर्तीवर हा चित्रपट बनवला आहे. ९० च्या दशकातील चित्रपट आवडत असतील तर तुम्ही हा चित्रपटही बघू शकता.