बॉलिवूडमध्ये तसे गेल्याकाही वर्षांपासून चांगले आणि कौतुकास्पद एक्सपरिमेंट होताना दिसत आहेत. २०१३ मध्ये भारतीय सिनेमाच्या १०० वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी 'बॉम्बे टॉकिज' हा सिनेमा तयार करण्यात आला होता. या एकाच सिनेमात ४ वेगवेगळ्या कथा रेखाटण्यात आल्या होत्या. या ४ कथा चार वेगवेगळ्या दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केल्या होत्या. आता पुन्हा एकदा ४ दिग्दर्शकांनी मिळून ४ वेगवेगळ्या कथा नेटफ्लिक्स सीरिजसाठी दिग्दर्शित केल्या आहेत. 'लस्ट स्टोरीज' असं या सीरिजला नाव देण्यात आलं असून यातून लैंगिकतेवर भाष्य करण्यात आलं आहे.
कथा आणि अदाकारी
'लस्ट स्टोरीज'मधील सर्वात पहिली कथा ही शिक्षिका कालिंदी(राधिका आपटे) आणि विद्यार्थी(आकाश ठोसर) ची आहे. या दोघांमध्ये प्रेमाचं नातं असतं, पण सोबतच या नात्यात अनेक चढ-उतारही असतात. ही कथा अनुराग कश्यपने दिग्दर्शित केली आहे. अनुरागची स्टाइल असलेल्या रिअल फ्रेममध्ये ही कथा शूट करण्यात आली आहे. दोघांच्या मनातील द्विधा मानसिक स्थिती अनुरागने फार उत्तम उतरवली आहे. दिग्दर्शन चांगलं झालंय, पण आणखी चांगली करता आलं असतं. सोबत एडिटींगही आणखी चांगलं करायला वाव होता. कलाकारांबाबत सांगायचं तर आकाश ठोसर या भूमिकेसाठी मिसफिट वाटतो आणि त्यांचं भूमिका साकारतानाचं अवघडलेपण दिसून येतं. या कथेतील डायलॉग्स इंटरेस्टींग आहेत आणि त्यामुळे हसूही येतं. राधिकाने नेहमीप्रमाणे आपल्या भूमिकेतून सिक्सर लगावला आहे.
सीरिजची दुसरी कथा झोया अख्तरने दिग्दर्शित केली आहे. ही कथा मुंबईतील मध्यमवर्गीय बॅचलर अजित(नील भूपलम) आणि त्याच्या घरात काम करणारी तरुणी सुधा(भूमी पेडणेकर) ची आहे. दोघांमध्ये एक वेगळ्या प्रकारचं समीकरण आहे. कथेत ट्विस्ट तेव्हा येतो जेव्हा अजितचे आई-वडील मेरठहून मुंबईला येतात आणि अजितचं लग्न जुळवतात. कथा चांगली आहे. भूमी पेडणेकरने मस्त काम केलंय. नील भूपलमनेही चांगलं काम केलं आहे. पण या कथेचा क्लायमॅक्स आणखी बेटर होऊ शकला असता असं मनात येतं. दिग्दर्शन, कॅमेरा वर्क आणि कथा सांगण्याची पद्धत चांगली आहे.
तिसऱ्या कथेत पती-पत्नी आणि तो असा त्रिकोण दाखवण्यात आलाय. पती सलमान(संजय कपूर), पत्नी रीना(मनिषा कोईराला) आणि तो सुधीर(जयदीप अहलावत) आहे. सलमान आणि सुधीर यांचं काय नातं आहे आणि लव्ह-लस्टचं काय गणित आहे. याचं कोडं सीरिज बघूनच कळेल. या कथेचं दिग्दर्शन दिबाकर बॅनर्जी याने केलंय. या कथेचं त्याने केलेलं दिग्दर्शन चांगलं आहे. पण थोडं बुचकळ्यात टाकणारं आहे. काम सर्वांनीच चांगलं केलं आहे. खासकरुन मनीषाने फार उत्तम काम केलंय.
चौथी कथा ही करण जोहरने दिग्दर्शित केली आहे. या कथेत लव्ह, लस्टसोबतच ड्रामा, इमोशन, कॉमेडी आणि मनोरंजनही आहे. असेही म्हणता येईल की, या सीरिजमधील ही सर्वात चांगली आणि इंटरेस्टिंग कथा आहे. शाळेची लायब्ररी सांभाळणारी रेखा(नेहा धुपिया) ही मेघा वर्मा(कियारा अडवाणी) या शिक्षिकेला बोल्ड होण्याचा पाठ पढवत असते. अशातच मेधा लग्नासाठी मुलं बघत असते. आणि तिची भेट पारस(विक्की कौशल) सोबत होते. यादरम्यान कथेत अनेक इंटरेस्टिंग वळणं येतात. ते काय हे तुम्ही बघण्यात जास्त मजा आहे. कियारा आणि विक्की कौशल दोघांनीही अफलातून काम केलं आहे. दिग्दर्शन, सिनेमटोग्राफी आणि गाण्यांसोबत बॅकग्रांउड स्कोर सगळंच मस्त जमून आलं आहे.