आजपर्यंत तुम्ही भारतीय क्रिकेट टीम, फुटबॉल टीम, हॉकी टीम यांच्या कथा ऐकल्या असतील. पण 'मैदान'मधून भारतीय फुटबॉल टीमला घडवणाऱ्या सय्यद रहीम या प्रशिक्षकाची कथा मोठ्या पडद्यावर दाखविण्यात आली आहे. ही गोष्ट आहे तेव्हाची जेव्हा देशाच्या गल्लीत क्रिकेट बरोबरच फुटबॉलही खेळला जायचा...ही गोष्ट आहे एका अशा व्यक्तीची ज्याने इंडियन फुटबॉल टीमला त्याचं सर्वस्व दिलं...
कथानक : १९५२ मधील ऑलिम्पिकपासून सिनेमाची सुरुवात होते. स्वातंत्र्यानंतर अवघ्या ५ वर्षांनी ऑलिम्पिकमध्ये सहभाग घेतलेल्या भारतीय टीमला अनेक अभांवामुळे पराभवाचा सामना करावा लागतो. त्यानंतर १९५६ च्या ऑलिम्पिकसाठी सय्यद रहीम स्वतः टीम निवडतात. पण, १९५६ आणि १९६० मध्ये पुन्हा ऑलिम्पिकमध्ये पराभव झाल्यानंतर मात्र इंडियन फुटबॉल टीमच्या प्रशिक्षक पदावरुन सय्यद रहीम यांची उचलबांगडी होते. यादरम्यानच सय्यद रहीम यांना फुप्फुसाचा कॅन्सर झाल्याचं समजतं. एकीकडे जीवन मरणाशी झुंज देणारे सय्यद इंडियन फुटबॉल टीमला नवीन आयुष्य देण्याचा प्रयत्न करत असतात. फुटबॉल टीमची कामगिरी खराब झाल्यामुळे पुन्हा २ वर्षांनी सय्यद यांना इंडियन फुटबॉल टीमच्या प्रशिक्षकाची जबाबदारी मिळते. मृत्यूच्या दारात उभे असलेले सय्यद २ वर्षांनी पुन्हा इंडियन फुटबॉल टीमला नव्याने उभं करण्यासाठी सज्ज होतात. केवळ सय्यद रहीम यांचीच नाही तर १९६२ सालातील फुटबॉल टीममधील खेळाडूंची गोष्टही यातून मांडण्यात आली आहे. सय्यद रहीम यांच्या कुटुंबाचा आधार घेत थोडा भावनिक टच देण्याचाही प्रयत्न केला गेला आहे. वडिलांच्या पावलावर पाऊल टाकू पाहू इच्छिणाऱ्या सय्यद यांच्या लेकालाही फुटबॉल टीममध्ये खेळण्याची इच्छा होते. आता त्याची ही इच्छा पूर्ण होते का? इंडियन फुटबॉल टीमचा चेहरा मोहरा बदलण्यात सय्यद रहीम यशस्वी होतात का? हे जाणून घेण्यासाठी हा सिनेमा तुम्हाला पहावा लागेल.
दिग्दर्शन : सिनेमा जरी मोठा असला तरी तो शेवटपर्यंत तुम्हाला गुंतवून ठेवतो. इंडियन फुटबॉल टीमच्या सामन्यांबरोबरच असोसिएशनमध्येही अनेक घडामोडी घडतात. पण, एका मागोमाग एक पटापट घडत जाणाऱ्या घडामोडींमुळे सिनेमा थिएटरमध्ये बघताना काही गोष्टी निसटून जाण्याची भीती वाटते. इंडियन फुटबॉल टीमच्या जडणघडणतील १० वर्षांचा काळ ३ तासात मांडण्यात दिग्दर्शकाची थोडी दमछाक झाल्याचं जाणवतं. पण, सिनेमात फुटबॉलचे सामने पाहताना तुम्हाला थिएटरमध्ये असल्याचं जाणवत नाही. फुटबॉल सामने सुरू असताना सिनेमात केलेली कॉमेंट्री लाजवाब आहे. यामुळेच खरं तर सिनेमाला जास्त रंगत आली आहे. सिनेमातील गाणी आणि साऊंडमुळे चांगली वातावरणनिर्मिती करण्यात दिग्दर्शक यशस्वी झाला आहे. यासाठी अमित शर्मा यांना दाद द्यावी लागेल.
अभिनय : सय्यद रहीम यांची भूमिका अजय देवगणने उत्कृष्टरित्या साकारली आहे, याबद्दल शंकाच नाही. पण, केवळ अजय देवगणचं कौतुक करून चालणार नाही. तर या सिनेमात काम केलेल्या प्रत्येकाने त्याच्या वाट्याला आलेल्या भूमिकेला न्याय दिला आहे. मग तो चुन्नी गोस्वामी असो किंवा सिनेमात रंगत आणणारे कॉमेंटीटर...अभिनेत्री प्रियामणी हिने सिनेमात सय्यद रहीम यांच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. छोट्याशा भूमिकेतही प्रियामणीने लक्ष वेधून घेतलं आहे. त्याबरोबरच गजराज राव, रुद्रनील घोष यांच्या भूमिकाही लक्षवेधी ठरल्या आहेत.
सकारात्मक गोष्टी : इंडियन फुटबॉल टीमच्या इतिहासातील सोनेरी पान या सिनेमातून उलगडण्याचा प्रयत्न केला गेला आहे. हा सिनेमा तुम्हाला सकारात्मक दृष्टीकोन देऊन जातो.
नकारात्मक गोष्टी : सिनेमा काही ठिकाणी खूप वेगाने पुढे सरकतो. तर मध्येच अगदीच संथगतीने घडामोडी घडतात. त्यामुळे सिनेमा पुढे सरकतच नसल्याचं जाणवतं. पण, जेव्हा घडामोडींना वेग येतो तेव्हा पुन्हा गोष्टी भरकन पुढे निघून गेल्याचं जाणवतं.
थोडक्यात काय तर इंडियन फुटबॉल टीमसाठी संपूर्ण आयुष्य देणाऱ्या सय्यद रहीम यांच्याबद्दल जाणून घेण्यासाठी नक्कीच हा सिनेमा पाहायला हवा.