आपल्या नायिकेसाठी नायकाने बदला घेणे ही कथा आजवर आपण अनेक बॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये पाहिली आहे. तशीच काहीशी कथा आपल्याला मलंग या चित्रपटात पाहायला मिळते. त्यामुळे चित्रपटाच्या पूर्वाधात आपल्याला काही रस वाटत नाही. पण उत्तरार्धात मिळालेल्या ट्विस्ट अँड टर्न्समुळे प्रेक्षक खुर्चीवर खिळून राहातो.
चित्रपटाच्या सुरुवातीला अद्वैत (आदित्य रॉय कपूर) पोलिसांना फोनवर पूर्वकल्पना देत एक एक पोलिस ऑफिसरचा खून करताना आपल्याला दिसतो. त्याचवेळात फ्लॅशबॅकमध्ये आपल्याला अद्वैत आणि सारा (दिशा पटानी) यांची कथा पाहायला मिळते. पाच वर्षांपूर्वी हे दोघे गोव्याला एकटेच फिरायला आलेले असतात. आपल्या मर्जीप्रमाणे आयुष्य जगणारे हे दोघे पहिल्याच भेटीत एकमेकांच्या जवळ येतात. त्यांच्यात शारीरिक संबंध झाले असले तरी त्यांच्यात प्रेम नसते. कोणत्याही बंधनात अडकायचे नाही असे दोघांनीही ठरवेलेले असते. गोव्यात मजा मस्ती करत ते काही दिवस एकत्र राहातात. पण त्यांच्या आयुष्यात घडलेल्या काही घडामोडींमुळे त्यांचे आयुष्य संपूर्णपणे बदलते. याच कारणामुळे अद्वैत खून करत असतो. पण अद्वैत कोणत्या गोष्टीचा बदला घेत असतो. त्याच्या आणि साराच्या आयुष्यात काय घडलेले असते या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला या चित्रपटात मिळतात.
चित्रपटाच्या सुरुवातीला आपण जिंदगी ना मिलेगी दोबारा पाहात आहोत का असा प्रश्न नक्कीच पडतो. कारण दिशाच्या काही बकेट लिस्ट असतात आणि त्या ती अद्वैतसोबत आपल्याला पूर्ण करताना दिसतात. तसेच बदला घेणारा नायक पाहाताना आपल्याला मरजावाँ, काबिल, एक व्हिलन यांसारखे बॉलिवूडमधील असंख्य चित्रपट आठवतात. त्यामुळे या चित्रपटाच्या कथेच काहीच नावीन्य नाहीये असेच सुरुवातीला जाणवते. तसेच दिशा आणि अद्वैत ड्रग्सचे सेवन करत असल्याचे चित्रपटाच्या अनेक सीनमध्ये दाखवण्यात आलेले आहे. ड्रग्स घेणे हे चुकीचे आहे अशी त्यांना जाणीव झाल्याचे चित्रपटात कुठेच दाखवण्यात आलेले नाही. त्यामुळे ही गोष्ट नक्कीच खटकते. चित्रपट प्रेक्षकांवर मध्यांतरानंतर पकड घेतो. मध्यांतरानंतर चित्रपटाला चांगलीच कलाटणी मिळते. चित्रपटातील गुपितं उलगडल्यानंतर आपल्याला एकामागोमाग एक धक्के नक्कीच बसतात.
कलाकारांच्या अभिनयाबद्दल म्हणायचे तर आदित्य रॉय कपूर, कुणाल खेमू, एली अव्रराम यांनी या चित्रपटात चांगले काम केले आहे. पण खरी बाजी मारली आहे अनिल कपूरने...अनिल कपूरने चित्रपटात भन्नाट अभिनय केला आहे. दिशा पटानी या चित्रपटात ग्लॅमरस दिसली असली तरी तिचा अभिनय मनाला भावत नाही. पण दिशा आणि आदित्यची चित्रपटात केमिस्ट्री मस्त जमून आली आहे. चित्रपटातील गाणी चांगली असून ती ओठावर रुळतात. या चित्रपटात रोमान्स, अॅक्शन, सस्पेन्स या सगळ्याच गोष्टींचा भरणा असल्याने हा चित्रपट नक्कीच मनोरंजन करतो.