प्रतीक्षा अखेर संपली. ‘द फॅमिली मॅन’ या लोकप्रिय वेबसीरिजचा दुसरा सीझन अर्थात ‘द फॅमिली मॅन 2’ अॅमेझॉन प्राईमवर रिलीज झाला. मनोज वाजपेयीची मध्यवर्ती भूमिका असलेल्या या सीरिजचा दुसरा सीझन कधी एकदा येतो, असे चाहत्यांना झाले होते. अखेर हा सीझन आला. आता हा सीझन कसा आहे? हे जाणून घेण्यास तुम्ही उत्सुक असाल तर खिळवून ठेवणारा, असे दोन शब्दांत उत्तर देता येईल...
कहाणी- पहिल्या सीझनमध्ये श्रीकांतने (मनोज वाजपेयी) दिल्लीला गॅस अटॅकपासून वाचवले होते. आता श्रीकांत एनआयएच्या TASC टीममधून बाहेर पडला आहे आणि एका आयटी कंपनीत नोकरी करतोय. श्रीकांत स्वत:पेक्षा अर्ध्या वयाच्या बॉसच्या ऑर्डर फॉलो करतोय, त्याच्या शिव्या खातोय. आयुष्यातले थ्रील संपल्याने ते एकदम कंटाळवाणे झालेय. पण तरिही पत्नीला (प्रियामणी) अधिकाधिक खूश करण्याचा प्रयत्न करतोय. अशात तळपदे त्याला वडापावची आठवण करून देतो. पण श्रीकांत वेळोवेळी स्वत:च्या मनाला मारून मुटकून समजावत असतो. अर्थात तळपदेकडून टास्क अपडेट घेण्याची त्याची सवय सुटत नाहीच. अशात काही असे घडते की, श्रीकांतला पुन्हा एकदा अॅक्शनमध्ये यावे लागते. तो पुन्हा मिशनवर निघतो. तामिळनाडू, श्रीलंकेमार्गे ही कथा लंडनमध्ये पोहोचते. यादरम्यान त्याला राजी नावाच्या क्रूर शत्रूचा सामना करावा लागतो. राजीची ही भूमिका सामंथा अक्कीनेनीने साकारली आहे. दुस-या सिझनमध्ये जेवढी श्रीकांत तिवारी म्हणजेच मनोज वाजपेयीबद्दल उत्सुकता आहेत तेवढीच साऊथ स्टार सामंथाबद्दलही आहे. ती पहिल्या सिझनमध्ये नव्हती. दुस-या सिझनमध्ये मात्र तिची दमदार भूमिका आहे. श्रीकांत राजीला कशी मात देतो, मिशनचा शेवट कसा होतो, यासाठी अर्थातच तुम्हाला 9 एपिसोडची ही सीरिज पाहावी लागेल.
‘द फॅमिली मॅन 2’मध्ये श्रीकांतची भूमिका साकारणा-या मनोज वाजपेयीच्या चेह-यावर वाढत्या वयाच्या खुणा दिसू लागल्या आहेत. पण श्रीकांतच्या कॅरेक्टरमध्ये तो अगदी फिट बसला आहे. मुख्य भूमिका साकारणारा मनोज वाजपेयी अख्ख्या सीरिजमध्ये तुम्हाला खिळवून ठेवतो. ‘द फॅमिली मॅन 2’चे सर्वात खास वैशिष्ट्य म्हणजे, ही टिपिकल स्पाय थ्रीलर जॉनरची सीरिज नाही. यात तुम्हाला अनेक विनोदी प्रसंगही पाहायला मिळतात. ‘द फॅमिली मॅन 2’कडून प्रेक्षकांना अनेक अपेक्षा होत्या आणि या अपेक्षांवर हा सीझन खरा उतरला असेच महणायला हवे. श्रीकांतच्या फॅमिली लाईफवर या सीझनमध्ये जरा अधिक फोकस केला गेला आहे आणि कथेच्यादृष्टीने ती गरज आहे. पण म्हणून थ्रील आणि सस्पेन्सचीही कमतरता नाही.
दिग्दर्शक मास्टर राज व डीके यांनी या सीझनचे फक्त चार एपिसोड दिग्दर्शित केले आहेत. यात पहिल्या, दुस-या, सहाव्या व नवव्या एपिसोडचा समावेश आहे. उर्वरित पाच एपिसोड सुपर्ण एस. वर्मा यांनी दिग्दर्शित केले आहे. प्रत्येक एपिसोड दमदार आहे. एक संपला की, दुसरा पाहण्याची इच्छा अनावर होते, हेच दिग्दर्शकाचे यश आहे.
मनोज वाजपेयीची भूमिकाशानदार आहे. पण सामंथा अक्कीनेनीनेही विलेनची भूमिका अगदी जीव तोडून जिवंत केली आहे. अन्य कलाकारांनीही त्यांच्या वाट्याच्या भूमिकांना पूरेपूर न्याय दिला आहे. शारिब हाशमीचे कामही जबरदस्त आहे. क्लायमॅक्स जबरदस्त आहे. सीरिजमध्ये काही तामिळ संवाद आहेत, ते काही जणांना खटकू शकतात. पण एकूण सीरिज म्हणाल तर त्याची तारीफ करायलाच हवी. हा सीझन पाहिल्यानंतर निश्चितपणे तुम्ही तिस-या सीझनची प्रतीक्षा कराल.