प्राजक्ता चिटणीसजगात देव आहे का? पूजापाठ का केले जातात? प्रत्येक गोष्ट ही रितीरिवाजानुसारच झाली पाहिजे का? यांसारखे धर्म, जातीबाबतचे असंख्य प्रश्न आपल्याला पडतात. या प्रश्नांची उत्तरं देखील शोधण्याचा आपण नेहमीच प्रयत्न करत असतो. पण आपल्या मनाला ती उत्तरे पटतातच असे नाही. अशाच काही प्रश्नांची उत्तरे आपल्याला मंत्र हा चित्रपट नकळतपणे देऊन जातो. देव, मन, आपले रोजचे आयुष्य यांचा काय संबंध आहे यावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. मंत्र या चित्रपटात पौरोहित्य, देवपूजा, त्यांचा आपल्या जीवनाशी असलेला संबंध अशा अनेक गोष्टी मांडण्यात आलेल्या आहेत.निरंजनच्या (सौरभ गोगटे) कुटुंबातील सगळेच पौरोहित्य करत असले तरी त्याला त्याच्यात कधीच रस नसतो. तो सीएच्या परीक्षेची तयारी करत असतो. पण अचानक पौरोहित्य करण्याच्या हेतूने त्याला जर्मनीला जाण्याची संधी मिळते. सुरुवातीला तो या गोष्टीकडे कानाडोळा करतो. पण त्याचा मित्र डेव्हिड याच्यासोबतीने जर्मनीला गेल्यावर एक व्यवसाय करायचे असे तो ठरवतो आणि जर्मनीला जायचे पक्कं करतो. जर्मनीला जाण्यासाठी वडील (मनोज जोशी) यांच्याकडून पौरोहित्य शिकायला लागतो. तसेच जर्मनीला जायचे तर जर्मन भाषाही यायला पाहिजे म्हणून जर्मनचे क्लासेसही लावतो. तिथे त्याची भेट अंतरा (दीप्ती देवी) सोबत होते. अंतरा ही अतिशय मॉर्डन, खुल्या विचारांची असते. देव या संकल्पनेवरच तिचा विश्वास नसतो. अंतरा आणि निरंजन यांचा स्वभाव एकमेकांपेक्षा पूर्णपणे वेगळा असला तरी निरंजन तिच्या प्रेमात पडतो. पण आपण पौरोहित्य करतो हे तिला कळले तर ती आपल्यापासून दूर होणार याची सतत भीती त्याच्या मनात असल्याने तो त्याची खरी ओळख अंतरापासून लपवून ठेवतो. पण अंतराला त्याची खरी ओळख कळल्यानंतर काय होते? तो तिच्या प्रश्नांना उत्तरे देऊ शकतो का? या सगळ्यात त्याच्या मनाची घालमेल काय होते? हे दिग्दर्शकाने खूप चांगल्याप्रकारे मांडले आहे.मंत्र या चित्रपटाची कथा चांगली असली तरी चित्रपट खूपच ताणला गेल्यासारखा वाटतो. तसेच एडिटिंग तितकेसे चांगले झाले नसल्याने काही वेळा चित्रपटात काय सुरू आहे हे कळत नाही. चित्रपटात मनोज जोशी, सौरभ गोगटे, शुभंकर एकबोटे यांनी कामं चांगली केली आहेत. पुष्कराज चिरपुटकरने काशिनाथ ही व्यक्तिरेखा खूपच चांगल्या प्रकारे साकारली आहे. सौरभने तर शेवटच्या काही दृश्यांमध्ये जबरदस्त अभिनय केला आहे.