Join us

भुतांच्या भीतीने नदी'पल्याड' राहणाऱ्या गावाची गोष्ट, कसा आहे गौरव मोरेचा 'अल्याड पल्याड' सिनेमा?

By संजय घावरे | Published: June 14, 2024 4:19 PM

फार पूर्वीपासून सांगितल्या जाणाऱ्या भुता-खेतांच्या गोष्टी आणि त्याला अनुसरून पडलेल्या प्रथांचं आजही कित्येक ठिकाणी पालन केलं जातं. दिग्दर्शक प्रितम एस. के. पाटीलने या चित्रपटात तोच धागा पकडून भुतांच्या भीतीने तीन दिवस नदीच्या पल्याड राहायला जाणाऱ्या गावाची कथा सादर केली आहे.

Release Date: June 14, 2024Language: मराठी
Cast: मकरंद देशपांडे, संदीप पाठक, सुरेश विश्वकर्मा, गौरव मोरे, सक्षम कुलकर्णी, भाग्यम जैन, अनुष्का पिंपुटकर, चिन्मय उदगीकर, प्रितम एस. के. पाटील
Producer: शैलेश जैन, महेश निंबाळकर Director: प्रितम एस. के. पाटील
Duration: २ तास ०९ मिनिटेGenre:
लोकमत रेटिंग्स

फार पूर्वीपासून सांगितल्या जाणाऱ्या भुता-खेतांच्या गोष्टी आणि त्याला अनुसरून पडलेल्या प्रथांचं आजही कित्येक ठिकाणी पालन केलं जातं. दिग्दर्शक प्रितम एस. के. पाटीलने या चित्रपटात तोच धागा पकडून भुतांच्या भीतीने तीन दिवस नदीच्या पल्याड राहायला जाणाऱ्या गावाची कथा सादर केली आहे.

कथानक : कोकणातील एका गावात तीन दिवस नदीच्या पलिकडे राहण्याची प्रथा असते. त्याप्रमाणे गावकरी नदीच्या पलिकडे राहायला जाण्याची तयारी करत असतात. त्याच दिवशी शहरातून चतूर आणि किश्श्या या मित्रांसोबत पंक्या गावी येतो. एकदा नदी पार केल्यानंतर गावकरी तीन दिवस पुन्हा फिरकत नसतात, पण पंक्या, चतूर आणि किश्श्या संध्याकाळच्या वेळेस दिल्याच्या होडीने पुन्हा गावात जातात. त्यांच्या होडीत लपून सरपंचांची मुलगी निधीही जाते. दोर सुटल्याने काठावरची होडी वाहून जाते. त्यानंतर काय घडतं ते सिनेमात आहे.

लेखन-दिग्दर्शन : चित्रपटाची वनलाईन आणि त्यावर लिहिलेही पटकथाही चांगली आहे, पण रहस्याचा उलगडा करणारी गोष्ट तितकीशी पटत नाही. कोकणातील निसर्गसौंदर्य सुरखेरीत्या कॅमेऱ्यात कैद करण्यात आलं आहे. रहस्य आणखी गडद करण्यात पार्श्वसंगीताचा मोठा वाटा आहे. नयनरम्य लोकेशन्स आहेत. व्हिएफएक्सही चांगले आहेत. पूर्वार्ध काहीसा संथ वाटतो, पण उत्तरार्ध गंमतीशीर आणि उत्कंठावर्धक आहे. बोलीभाषा हा सर्वात मोठा मायनस पॅाईट आहे. गाव कोकणातील असलं तरी गावकरी मात्र देशावरची भाषा बोलतात. मालवणी भाषेचा लवलेषही नाही. संवाद ठिकठाक आहेत. भूत पळवण्याचा मंत्र आणखी चांगला हवा होता. 

अभिनय : मकरंद देशपांडेने आपल्या शैलीत साकारलेला गूढ उकलणारा सिद्धयोगी साधू बऱ्याच ठिकाणी हसवतो. गौरव मोरेने मोठ्या पडद्यावरही बिनधास्त फटकेबाजी करत हसवाहसवी सुरू ठेवली आहे. सक्षम कुलकर्णीनेही किश्या चांगलाच रंगवला आहे. एक वेगळाच संदीप पाठक या चित्रपटात पाहायला मिळतो. भाग्यम जैनने आपल्या व्यक्तिरेखेला न्याय देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. अनुष्का पिंपुटकरने महत्त्वपूर्ण असलेली व्यक्तिरेखा सहजपणे साकारली आहे. सुरेश विश्वकर्माच्या रूपातील सरपंच कोकणातील वाटत नाही. चिन्मय उदगीरकरच्या रूपात मनाचा थरकाप उडवणारा खलनायक आहे. 

सकारात्मक बाजू : अभिनय, दिग्दर्शन, ध्वनी आरेखन, सिनेमॅटोग्राफी, लोकेशन्स, व्हीएफएक्सनकारात्मक बाजू : बोलीभाषा, पटकथा, संवाद, काही संदर्भ, वातावरणनिर्मिती थोडक्यात काय तर महाराष्ट्राच्या काही गावांमध्येही गावपळणीची प्रथा आजही पाळली जाते. त्याची झलक अनुभवायची असल्यास हा सिनेमा पाहायला हरकत नाही.

टॅग्स :मराठी अभिनेतामराठी चित्रपटसिनेमा