Join us

Mercury Movie Review : डायलॉगविना खिळवून ठेवणारा थ्रिलर - ‘मर्क्युरी’

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2018 6:04 AM

कार्तिक सुब्बाराज यांची कथा आणि दिग्दर्शन असलेल्या मर्क्युरी या सिनेमाची कथा कोडाईकनाल विषारी रसायन दुर्घटनेच्या बॅकड्रॉपवर रंगते. पाच मित्र जे सर्व मूकबधीर आहेत, ते आपल्यातील एकाच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन करण्यासाठी कोडाईकनाल इथे येतात.

Release Date: April 13, 2018Language: हिंदी
Cast: प्रभू देवा, सनाथ रेड्डी, दीपक परमेश, शशांक पुरुषोत्तम
Producer: कार्तीकेयां सानाथानंDirector: कार्तिक सुब्बाराज
Duration: दोन तासGenre:
लोकमत रेटिंग्स
सुवर्णा जैन डायलॉगविना सिनेमा असू शकतो का? केवळ हातवारे, चेह-यावरील हावभाव यातून रुपेरी पडद्यावर कलाकार अभिनय करु शकतात का? अशा एक ना अनेक प्रश्नांची उत्तरं अभिनेता प्रभूदेवाची प्रमुख भूमिका असलेल्या मर्क्युरी या सिनेमातून मिळतील. कार्तिक सुब्बाराज यांची कथा आणि दिग्दर्शन असलेल्या मर्क्युरी या सिनेमाची कथा कोडाईकनाल विषारी रसायन दुर्घटनेच्या बॅकड्रॉपवर रंगते. पाच मित्र जे सर्व मूकबधीर आहेत, ते आपल्यातील एकाच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन करण्यासाठी कोडाईकनाल इथे येतात. मात्र त्याचवेळी या सगळ्यांसोबत अशी काही घटना घडते की त्यामुळे सिनेमाची कथा रंजक वळणावर पोहचते. अंध आणि मुक्याच्या भूमिकेतील प्रभूदेवा या पाचही मित्रांचं जगणं कठीण करतो. काय असतं त्या मागचं कारण, या पाचही जणांसोबत काय होतं, प्रभूदेवाचा या पाच मित्रांशी काय संबंध अशा एक ना अनेक प्रश्नांची उत्तरं मर्क्युरी या सिनेमातून मिळतील. या सिनेमात कोणतेही डायलॉग नसले तरी कलाकारांचं साईन लॅन्गवेज (हातवारे आणि हावभाव) आणि वेगाने कथेत घडणा-या घडामोडी यामुळे पूर्वाधापासूनच रसिक त्यांच्या सीटवर खिळून राहिल. यांत कलाकारांचे हावभाव, हातवारे तांत्रिकदृष्ट्या किती बरोबर किती चूक हा संशोधनाचा विषय असला तरी मर्क्युरी सिनेमात त्यांनी जे काही करण्याचा प्रयत्न केला तो नक्कीच समजतो. यांत कलाकारांपेक्षा सिनेमाच्या तांत्रिक टीमचं करावं तितकं कौतुक कमीच आहे. सिनेमात डायलॉग नसले तरी सिनेमातील बॅकग्राउंड स्कोर(पार्श्वसंगीत)ने सिनेमात जान आणली आहे. बॅकग्राउंड स्कोरचा सिनेमात किती उत्तमरित्या वापर करण्यात आला आहे हे मर्क्युरी सिनेमा पाहताना अनेक सीन्समध्ये जाणवेल. या सगळ्याचं श्रेय संतोष नारायणन यांना द्यावं लागेल. यासोबतच सिनेमाची आणखी एक लक्षवेधी बाब म्हणजे सिनेमॅटोग्राफी. यातील अनेक सीन्स तुमच्या अंगावर काटा आणतील आणि रोमांचही निर्माण करतील. पाच जणांनी (चार तरुण आणि १ तरुणी) आपापल्या भूमिकांना पुरेपूर न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. प्रभूदेवाने अभिनेता म्हणून आपलं वेगळेपण दाखवून दिलंय. त्याचे स्टंट्स आणि धडकी भरवणारा अभिनय यांचं निश्चितच कौतुक करावे लागेल. वरील सगळ्या गोष्टी एकत्रितपणे जुळवून आणण्यात दिग्दर्शक कार्तिक सुब्बाराव यांना यश आलं आहे. विना डायलॉगचा सिनेमा बनवण्याचा धोका त्यांनी पत्करला. मात्र डायलॉगविना जे काही सांगायचं ते सांगण्यात सुब्बाराव यशस्वी झालेत. तांत्रिकदृष्ट्या मर्क्युरी सिनेमा कमाल असला तरी कथेतील काही गोष्टी खटकणा-या आहेत. काही तरी वेगळं करण्याच्या नादात कल्पने पलीकडील गोष्टी सिनेमात दाखवण्यात आल्यात. हे सगळे सीन दाखवताना दिग्दर्शकाला वास्तवाचं भान नव्हता का असं प्रश्न तुम्हाला पडेल. पूर्वाधात कथेने पकडलेला वेग अखेरपर्यंत कायम ठेवण्यात दिग्दर्शकाला अपयश आले आहे. विशेषतः क्लायमॅक्समध्ये दिग्दर्शकाकडून निराशा होते. त्यातच सिनेमाच्या सुरुवातीला हा सिनेमा राजा हरिश्चंद्र आणि पुष्पक या मूकपटांना ट्रिब्यूट असल्याचे दाखवण्यात येते. मात्र मर्क्युरी सिनेमात डायलॉग नसले तरी बॅकग्राउंड स्कोरचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे मर्क्युरी सिनेमाला मूकपट म्हणणं संयुक्तिक होणार नाही. मात्र या काही बाबी सोडल्या तर तांत्रिक कमाल अनुभवण्यासाठी मर्क्युरी सिनेमा थिएटरमध्ये जाऊन नक्कीच पाहावा असा आहे.