जान्हवी सामंत आयुष्यात प्रत्येकाच्या वाट्याला तीन पर्याय येतात. एक योग्य, एक अयोग्य आणि एक मध्यम. अनेकदा निर्णय घ्यायला आपल्याकडे वेळ नसतो. नेमका हा अटीतटीचा हा क्षण तिथेच थांबवून टाकता आला असता तर? काही क्षण विचार करण्याचा वेळ आपल्याला मिळाला तर? चित्रपटाचा शेवट ठरवायला स्वातंत्र्य देणारे पर्याय खुप कमी चित्रपट प्रेक्षकांना देतात. कथानक प्रेक्षकांना या निमित्ताने वास्तवाचे भान मिळवून देते. ‘मान्सून शूटआऊट’ या चित्रपटाचे कथानक उत्कंठावर्धक आहे. कथानकाच्या सुरूवातीला क्राईम ब्रँचमध्ये नवनियुक्त पोलिस अधिकारी म्हणून आदि (विजय वर्मा) कामावर रूजू होतो. आदि हा एक आदर्श तत्वांचे पालन करणारा पोलिस अधिकारी असतो. यंत्रणेत काम करत असताना तत्त्वांना कुठल्याही प्रकारची मुरड घालणे त्याला आवडत नाही. त्याच्याकडे त्याची पहिली केस येते. शहरातील एका जोडप्याचा माफियाकडून खुन होतो. केस सोडवत असताना त्याला लक्षात येते की, त्याचे विचार आणि तत्त्वं हे सुपिरियर खान (नीरज काबी) यांच्यासोबत जुळत नाहीत. केस सोडवण्याची त्यांची पद्धत ही अन्यायाकडे झुकणारी आहे. दरम्यान, आदि आणि खान हे एका जंक्शनच्या ठिकाणी पोहोचतात जिथे त्यांना गुन्हेगाराची झलक पाहायला मिळते. गुन्हेगाराचा पाठलाग करत असताना आदि हा शिवा (नवाजुद्दीन सिद्दीकी) ला पकडण्यासाठी त्याच्या दिशेने बंदुक रोखतो. आणि हाच तो क्षण असतो जिथे त्याला परिस्थिती तीन पर्याय देते. एक म्हणजे योग्य, दुसरे म्हणजे चुकीचा मार्ग आणि तिसरे म्हणजे मधलाच पर्यायी मार्ग. याक्षणी चित्रपटही प्रेक्षकांकडे हा मार्ग निवडण्याचा पर्याय देते. अमित कुमार दिग्दर्शित हा चित्रपट एक क्राईम थ्रीलर ड्रामा आहे. नव्वदीच्या दशकातील ‘सत्या’, ‘अब तक छप्पन’,‘कंपनी’ यासारख्या चित्रपटांची हे कथानक आठवण करून देते. अन्याय, अत्याचार, खुन, मारामारी, पोलिस आणि गुंडागिरी, राजकारणी तसेच डान्स बार सीन्स, बलात्कार हे सगळे क्राईम सीन्स आपण याअगोदरही चित्रपटात पाहिले आहेत. चार वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर या महिन्यात हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. दृश्यात्मकरित्या ठरवायचे झाले तर या चित्रपटाचे शूटिंगही ‘चांदणी बार’ आणि ‘वास्तव’ यांच्याप्रमाणेच झाल्याचे जाणवते. त्यामुळे चित्रपटात नवे काही असे पाहायला मिळत नाही. चित्रपटाचे कथानक हे अत्यंत कंटाळवाण्या पद्धतीने पुढे सरकते. त्याचबरोबर नवाज पुन्हा एकदा सिरीअल किलरच्या व्यक्तिरेखेत दिसतो आहे. ‘बाबुमोशाय बंदुकबाज’ आणि ‘रमण राघव’ या दोन चित्रपटात नवाज जसा दिसला तसाच तो याही चित्रपटात दिसणार यामुळे त्यातही फार काही विशेष वाटत नाही. थोडक्यात काय तर तुम्ही गँगस्टर चित्रपटाचे फॅन असाल, तरच तुम्ही चित्रपट एन्जॉय करू शकता, अन्यथा नाही.