Join us

Munjya movie review: 'मुंजा'ने मांडला हास्य-रहस्याचा डाव

By संजय घावरे | Published: June 07, 2024 4:58 PM

Munjya movie review: एका काळोख्या रात्री गोट्या आपल्या धाकट्या बहिणीला घेऊन चेटूकवाडीमध्ये जातो. तिथे मोठ्या वृक्षाखाली तंत्रविद्येच्या सहाय्याने मुन्नीला आपली करण्याचा प्रयत्न करतो. यासाठी तो आपल्या बहिणीचा बळी देणार असतो, पण...

Release Date: June 07, 2024Language: हिंदी
Cast: अभय वर्मा, शर्वरी, मोना सिंग, तरणजोत सिंग, सत्यराज, सुहास जोशी, अजय पूरकर, भाग्यश्री लिमये, श्रुती मराठे, रसिका वेंगुर्लेकर
Producer: दिनेश विजान, अमर कौशिकDirector: आदित्य सरपोतदार
Duration: 2 तास 30 मिनिटेGenre:
लोकमत रेटिंग्स

मुख्य भूमिकेत कॅाम्प्युटर जनरेटेड इमॅजिनरी म्हणजेच सीजीआय कॅरेक्टर असलेला हा चित्रपट कोकणातील गजालींमधल्या झाडावर वास्तव्य करणाऱ्या मुंजाची गोष्ट सांगणारा आहे. यात दिग्दर्शक आदित्य सरपोतदारने फँटसीच्या आधारे केलेली हॅारर-कॅामेडी आणि पटकथेचा ग्राफ क्षणाक्षणाला उत्सुकता वाढवतो.

कथानक : गोष्ट कोकणातील गोट्या नावाच्या लहान मुलाची आहे. गोट्याला त्याच्यापेक्षा वयाने मोठी असलेल्या मुन्नीशी लग्न करायचं असतं. या कारणावरून गोट्याची आई त्याला छडीने मारते. त्याची मुंज करते. एका काळोख्या रात्री गोट्या आपल्या धाकट्या बहिणीला घेऊन चेटूकवाडीमध्ये जातो. तिथे मोठ्या वृक्षाखाली तंत्रविद्येच्या सहाय्याने मुन्नीला आपली करण्याचा प्रयत्न करतो. यासाठी तो आपल्या बहिणीचा बळी देणार असतो, पण झटापटीत गोट्याचाच मृत्यू होतो. गोट्या मुंजा म्हणजेच ब्रह्मराक्षस बनून झाडाला लटकतो. त्यानंतर खरा खेळ सुरू होतो.

लेखन-दिग्दर्शन : कोकणामधील मुंजाच्या दंतकथांचा धागा पकडून योगेश चांदेरकरने लिहिलेल्या कथेवर निरेन भट्ट यांनी नाट्यमय वळणांचा स्क्रिनप्ले लिहिला आहे. त्यामुळे थोड्या फार अंतराने नवीन ट्विस्ट पाहायला मिळतो. त्यात मैत्री व प्रेमाचा सुरेख धागाही गुंफला आहे. संवाद अर्थपूर्ण आहेत. अगदी थोडक्यात पण कोणालाही समजेल अशा प्रकारे चित्रांद्वारे सांगितलेली मुंजाची गोष्ट महाराष्ट्राबाहेरीलही रसिकांना मुंजा समजून घेताना मदत करेल. कोकणातील शिमगा-संकासूराची झलक दाखवताना तिथलं निसर्गसौंदर्य, नागमोडी रस्ते, नारळ-फोफळीची झाडं, विस्तीर्ण समुद्रकिनारा, एसटीतील प्रवास कॅमेऱ्यात छान टिपला आहे. व्हिएफएक्सही चांगले आहेत. मुंजा जरी घाबरवणारा असला तरी चित्रपट मात्र हसत-खेळत मनोरंजन करतो. प्रत्येक गोष्ट पटवून देण्यात आली आहे. मुंजा संचारल्यानंतरचा गेटअप थोडा भडक वाटतो.

अभिनय : गोट्याच्या रूपात बालकलाकार आयुषने प्रभावी काम केलं आहे. अभय वर्माने निरागसपणे साकारलेला बिट्टू मनात घर करून राहतो. शर्वरीने थोडी अवखळ, पण मैत्रीला जागणारी बेला छान रंगवली आहे. सुहास जोशींनी आजीच्या छोट्याशा भूमिकेत सहजपणे जीव ओतला आहे. मोना सिंगने साकारलेली कणखर आईही चांगली झाली आहे. अजय पूरकरने वठवलेला काका आणि भाग्यश्री लिमयेच्या रूपातील रुक्कूही मस्त आहेत. सत्यराज यांचं एक वेगळंच रूप यात आहे. प्रथमच कॅमेरा फेस करणाऱ्या तरणजोत सिंगने चांगलं काम केलं आहे. छोट्याशा भूमिकेत श्रुती मराठेचं कडक रूप दिसतं. 

सकारात्मक बाजू : कथा, पटकथा, संवाद, अभिनय, दिग्दर्शन, गीत-संगीत, पार्श्वसंगीत, सिनेमॅटोग्राफी, वातावरण

नकारात्मक बाजू : काही दृश्यांमधील भडक मेकअप, हॅाररपट न आवडणाऱ्यांची निराशा होईल

थोडक्यात काय तर एका अलौकिक थीमवर बनवलेला हा चित्रपट अबालवृद्धांनी पाहण्यासारखा आहे. प्रासंगिक विनोदांचा वापर केल्याने हा चित्रपट केवळ घाबरवत नाही तर हसवतोही.

टॅग्स :सिनेमाबॉलिवूडअजय पुरकरमोना सिंगसेलिब्रिटी